कोल्हापूर सलाईनवर!
By admin | Published: June 2, 2016 01:36 AM2016-06-02T01:36:26+5:302016-06-02T01:36:26+5:30
कुंभी, तुळशीचा दिलासा : काळम्मावाडी, राधानगरीतून पुरवठा बंद
कोल्हापूर : ‘आधीच कमी त्यात पुन्हा उशीर’अशी गत झालेल्या पावसाने आता मात्र कोल्हापूरकरांच्या तोंडचे पाणी पळविले आहे. जिल्ह्यातील काळम्मावाडी आणि राधानगरी या महत्वाच्या धरणातील पाणी साठी अगदी कमी झाल्यामुळे लोकांना पिण्यासाठी पाणी उपलब्ध करुन देताना जलसंपदा विभागाला चांगलीच कसरत करावी लागत आहे. गेल्या कित्त्येक वर्षांनी राधानगरी धरणातील पाणी कोल्हापूर शहरवासियांना मिळणे आता बंद झाल्याने चिंतेत अधिक भर पडली आहे.
शहरातील लोकांच्या पिण्याच्या पाण्याची गरज भागविण्यासाठी दोन दिवसापासून तुळशी व कुंभी धरणातील पाणी भोगावती नदीत सोडण्यात आले आहे. हे पाणी पुढे पंचगंगा नदीवरील शिंगणापूर बंधाऱ्यावर बुधवारी पोहचले. त्यामुळे पाण्याची पातळी योग्य प्रमाणात राखली गेली. जलसंपदा विभागाने नियोजनपूर्वक तुळशीचे पाणी नदी पात्रात सोडल्यामुळे शहरातील पाणी पुरवठ्यावर फारसा परिणाम अजून तरी झालेला नाही. आता पावसाळा सुरु होऊन धरणक्षेत्रात पाणी साठा होईपर्यंत कोल्हापूरकरांना तुळशी व कुंभी या दोन धरणावरच अवलंबून रहावे लागणार आहे.
शहरात सध्या एक दिवस आड पाणी पुरवढा करण्यात येत असून त्यामध्ये बदल करण्यात आलेला नाही. आणखी पंधरा दिवस तरी शहरवासियांना सध्याच्या नियोजनाप्रमाणे पाणी दिले जाईल, असे मनपा जलअभियंता मनिष
पवार यांनी सांगितले. सध्याच्या पाणी पुरवठ्यात कपात करण्याबाबात अद्याप जलसंपदा विभागाकडून सुचना आलेली
नाही, त्यामुळे दररोज ८० ते ८५ एमएलडी पाणी उपसा केला जात असल्याचेही त्यांनी सांगितले. एक दिवस आड आणि तेही पूरेशा प्रमाणात पाणी मिळत असल्याने शहरात कोठे टॅँकर फिरतानाही दिसत नाहीत. मात्र पाऊस जर लांबला तर परिस्थिती बिकट होऊ शकते. (प्रतिनिधी)