कोल्हापूर : विदयार्थ्यांच्या बॅगेतून निघाला साप, विदयार्थी- शिक्षकांची भंबेरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 30, 2018 04:43 PM2018-08-30T16:43:13+5:302018-08-30T16:55:06+5:30
सातवीच्या वर्गात तास सुरु असताना विदयार्थ्यांच्या बॅगेतून साप निघाल्याने विदयार्थी व शिक्षक यांची भीतीने भंबेरी उडाली. शेवटी चौथीत शिकणाऱ्या मदारी समाजातील विदयार्थ्यांने साप पकडल्यानंतर सर्वांनी सुटकेचा श्वास घेतला. ही घटना आज गुरुवार दि.३० रोजी माझी शाळा भोसलेवाडी येथे सकाळी १०.३० वा.घडली.
कोल्हापूर: सातवीच्या वर्गात तास सुरु असताना विदयार्थ्यांच्या बॅगेतून साप निघाल्याने विदयार्थी व शिक्षक यांची भीतीने भंबेरी उडाली. शेवटी चौथीत शिकणाऱ्या मदारी समाजातील विदयार्थ्यांने साप पकडल्यानंतर सर्वांनी सुटकेचा श्वास घेतला. ही घटना आज गुरुवार दि.३० रोजी माझी शाळा भोसलेवाडी येथे सकाळी १०.३० वा.घडली.
विस्तृत वृत्त असे - सकाळी विदयार्थी शाळेत आल्यानंतर पहिल्या तासाचे वही पुस्तक काढण्यासाठी इयत्ता सातवी ब च्या वर्गातील सर्वच विदयार्थी गडबडीत होते. याच वर्गातील सदर बाजार येथे राहणारा देवदीप अर्जुन गायकवाड यांनेही वही पुस्तक काढण्यासाठी आपल्या दप्तराची चेन उघडली असता दप्तरामध्ये चक्क साप दिसला.
घाबरलेल्या अवस्थेत या विदयार्थ्यांने वर्गशिक्षक संजय सुतार सर यांना दप्तरांत साप असल्याचे सांगितले. या सापाला पाहून वर्गांतील विदयार्थी व शिक्षक यांची भीतीने भंबेरी उडाली. वर्ग शिक्षकांनी परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेवून बॅगची चेन बंद केली व बॅग वर्गाबाहेर आणली.
याच शाळेत मदारी समाजाची मुले शिक्षण घेत असल्याने व त्या समाजातील मुलांना साप पकण्याची कला अवगत असल्याने इयत्ता चौथीत शिकणाऱ्या रेहान मदारी व अदिल मदारी या विदयार्थ्यांनी बॅगेतील सापाला मोठया धैर्यांने पकडून जवळच्या शेतात सोडले. सदरचा साप दोन फुट लांबीचा होता.
ज्या विदयार्थ्यांच्या दप्तरामध्ये साप आढळला त्याच्या कुटुंबाकडे चौकशी केली असता तो राहणाऱ्या परिसरातूनच तो साप त्याच्या बॅगेत आल्याचे सांगितले. यामुळे मोठा अनर्थ टळल्याने संस्थापक एम.एच.मगदुम, मुख्याध्यापिका सौ. अरुणा हुल्ले यांनी मदारी समाजातील विदयार्थ्याचा सत्कार केला.