Kolhapur: "शिवराज्याभिषेक सोहळा जागतिक स्तरावर पोहोचवणार", संभाजीराजे य़ांनी व्यक्त केला विश्वास

By संदीप आडनाईक | Published: May 24, 2024 11:26 PM2024-05-24T23:26:05+5:302024-05-24T23:26:52+5:30

Kolhapur News: छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३५० व्या राज्याभिषेक (Shivrajyabhishek ) सोहळ्याच्या वर्षपूर्तीचा यंदाचा रायगडावर होणारा सोहळा जागतिक स्तरावर पोहोचविण्याचा आणि हा सोहळा राष्ट्रीय सण म्हणून लोकोत्सव व्हावा, अशी अपेक्षा अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समितीच्या येथील नियोजन बैठकीत संभाजीराजे छत्रपती (Sambhaji Raje Chhatrapati) यांनी व्यक्त केली.

Kolhapur: Sambhaji Raje expressed confidence that the coronation ceremony of Shiva will reach the global level. | Kolhapur: "शिवराज्याभिषेक सोहळा जागतिक स्तरावर पोहोचवणार", संभाजीराजे य़ांनी व्यक्त केला विश्वास

Kolhapur: "शिवराज्याभिषेक सोहळा जागतिक स्तरावर पोहोचवणार", संभाजीराजे य़ांनी व्यक्त केला विश्वास

- संदीप आडनाईक

कोल्हापूर - छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३५० व्या राज्याभिषेक सोहळ्याच्या वर्षपूर्तीचा यंदाचा रायगडावर होणारा सोहळा जागतिक स्तरावर पोहोचविण्याचा आणि हा सोहळा राष्ट्रीय सण म्हणून लोकोत्सव व्हावा अशी अपेक्षा अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समितीच्या येथील नियोजन बैठकीत संभाजीराजे छत्रपती यांनी व्यक्त केली.

जुना राजवाडा येथील भवानी मंडपात शुक्रवारी समितीतर्फे रायगडावरील सोहळ्यासाठी नियोजन बैठक झाली. यावेळी संयोगिताराजे आणि शहाजीराजे उपस्थित हाेते. संभाजीराजे म्हणाले, समितीकडून २००७ पासून दरवर्षी रायगडावर हा राज्याभिषेक सोहळा उत्साहात साजरा केला जातो. यंदाही रायगडावर लाखोंच्या संख्येत शिवप्रेमींनी यासाठी हजेरी लावावी आणि त्यासाठी आधी नोदणी करावी.

रायगडावर शिवप्रेमींची गैरसोय होऊ नये यासाठी कार्यक्रमाची रूपरेषा, गडावर जाण्याचे व उतरण्याचे मार्ग, राहण्याची सोय, वैद्यकीय सेवा, अन्नछत्र, स्वच्छतागृहे, पाचाड आणि नव्याने बांधलेल्या एमटीडीसीच्या सभागृहात महिलांसाठी स्वतंत्र व्यवस्था, पायथ्याची वाहनतळे, अन्नछत्र याची सर्व माहिती व नकाशे क्यूआरकोडच्या माध्यमातून उपलब्ध करून द्यावेत, नगारखान्याजवळील तलावात पाण्याचा चांगला साठा झाला आहे, तो शिवप्रेमींना पिण्यासाठी उपलब्ध होईल, असे संभाजीराजे यांनी सांगितले. गडावर व पायथ्याशी पाण्याची सुविधा, वाहने पार्किंग सुविधा, वाहतूक कोंडी टाळण्याचे नियोजन, बस सुविधा, मदतकार्य मिळण्यासाठी पोलिस बंदोबस्त, महसूल, पोलिस, सार्वजनिक बांधकाम, पाणीपुरवठा, आरोग्य, स्वच्छता, अग्निशमन अशा विविध शासकीय यंत्रणांविषयी अनेकांनी सूचना केल्या.

बैठकीत नूतन अध्यक्षांसह दोन कार्याध्यक्ष, चार उपाध्यक्ष यांच्यासह ४० जणांची नवीन समिती निश्चित करण्यात आली. या बैठकीला हेमंत साळोखे, संजय पोवार, फत्तेसिंह सावंत, विनायक फाळके, विजय देवणे, दिलीप पवार, सतीशचंद्र कांबळे, विष्णू जोशीलकर, उदय घोटवडे, महादेव पाटील, रूपेश पाटील, दिलीप सावंत, भगवान चिले, प्रवीण उबाळे, बाबा महाडिक आदी उपस्थित होते.

पाचाड येथून सोहळ्यास प्रारंभ
पाचाड येथून जिजाऊंचे दर्शन घेऊन संभाजीराजे या सोहळ्यास प्रारंभ करतील अशी माहिती संयोगिताराजे यांनी दिली. महिलांसाठी यावेळी गडावर आणि पायथ्याला स्वतंत्र व्यवस्था केल्याची माहितीही त्यांनी दिली.
शिवराज्याभिषेक महोत्सव समिती : कार्याध्यक्ष : हेमंत साळोखे, सुखदेव गिरी, उपाध्यक्ष : अतुल चव्हाण (पुणे), सत्यजित भोसले (मुंबई), शशिकांत दगडू खुने (धाराशिव), चैत्राली कारेकर (कल्याण), कार्यकारणी सदस्य : फत्तेसिंह सावंत, इंद्रजित सावंत, सागर यादव आणि इंद्रसेन जाधव.

Web Title: Kolhapur: Sambhaji Raje expressed confidence that the coronation ceremony of Shiva will reach the global level.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.