कोल्हापूर : अशास्त्रीय वृक्षारोपणाची संभाजीराजेंनी घेतली दखल, महापालिकेच्या आयुक्तांना दिले पत्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 6, 2018 01:05 PM2018-04-06T13:05:51+5:302018-04-06T13:05:51+5:30
केंद्र शासनाच्या ‘अमृत’ योजनेअंतर्गत झालेल्या अशास्त्रीय वृक्षारोपणाची खासदार संभाजीराजे यांनी दखल घेऊन याबाबत आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांना त्यांनी पत्र दिले आहे.
कोल्हापूर : केंद्र शासनाच्या ‘अमृत’ योजनेअंतर्गत झालेल्या अशास्त्रीय वृक्षारोपणाची खासदार संभाजीराजे यांनी दखल घेऊन याबाबत आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांना त्यांनी पत्र दिले आहे.
‘लोकमत’ने या योजनेअंतर्गत अशास्त्रीय पद्धतीने झाडे लावल्याबाबतचे वृत्त ३ आणि ४ एप्रिल रोजी प्रकाशित केले होते. पहिल्या वर्षी झाडे लावण्यासाठी मिळालेला एक कोटीचा निधी, सध्या तीन ठिकाणी एक कोटी ६२ लाख रुपये खर्चून लावली जात असलेली झाडे आणि आता पुन्हा पाच ठिकाणी दोन कोटी रुपये खर्चून लावण्यात येणारी झाडे याबाबतची सविस्तर मांडणी या मालिकेत केली होती.
या वृत्ताची दखल घेऊन खासदार संभाजीराजे यांनी बुधवारी (दि. ४) आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांना पत्र पाठविले आहे. कोल्हापूर शहरामध्ये वृक्षारोपण आणि हरितपट्टे तयार करण्याचे काम सुरू आहे.
जैवविविधता मंडळ आणि वृक्ष प्राधिकरण समिती व त्यावर या विषयातील तज्ज्ञ असताना, या प्रकल्पांचे या तज्ज्ञांसमोर सादरीकरण न करता, त्यांचा सल्ला न घेता हे काम हाती घेतल्याचे दिसते, असे पत्रात नमूद करण्यात आले आहे.
शास्त्रीय पद्धतीने या झाडांची योग्य ऋतूमध्ये लागवड करणे गरजेचे असल्याने ही अशास्त्रीय पद्धतीने लागवड होत असल्याने यातील किती झाडे जोपासली जातील, याबाबत त्यांनी पत्रामध्ये शंका व्यक्त केली आहे.
झाडांची योग्य लागवड आणि जोपासना होण्यासाठी तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली हे काम केल्यास शहराच्या जैवविविधतेत भर पडेल व पर्यावरणाचा समतोल राखला जाईल, असेही या पत्रकात नमूद करण्यात आले आहे.
खासदारांच्या उलट स्थायी सदस्यांची भूमिका
एकीकडे खासदार संभाजीराजे यांनी हे वृक्षारोपण शास्त्रीय पद्धतीने व्हावे, अशी भूमिका घेतली असताना दुसरीकडे स्थायी समितीच्या सदस्यांनी मात्र याबाबत योग्य आणि स्पष्ट भूमिका मांडणाऱ्या डॉ. मधुकर बाचूळकर यांच्याविषयीच वेगळी भूमिका घेतली आहे. ‘जिथे काम सुरू आहे तेथे काही चुकीचे झाले असेल तर त्यात दुरुस्ती करू,’ अशी भूमिका घेण्याऐवजी थेट या क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्तीबाबत विरोधाची भूमिका घेणे अनाकलनीय ठरणारे आहे.
आयुक्त काय करणार?
जैवविविधता समिती आणि वृक्षप्राधिकरण या समित्यांवर या क्षेत्रातील जे तज्ज्ञ आहेत, त्यांच्या मार्गदर्शनाखाली ही झाडे लावली जावीत, अशी स्पष्ट भूमिका महापालिकेचे आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांनी घेतली होती. मात्र तसे न होता, परस्पर, नेमकी भर उन्हाळ्यातच, पावलापावलांच्या अंतरावर ही झाडे लावण्यात आली आहेत! त्यामुळे आता या प्रकरणात आयुक्त नेमकी काय भूमिका घेणार, याकडे लक्ष लागून राहिले आहे. त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तो होऊ शकला नाही.