कोल्हापूर, सांगलीला वळवाने झोडपले
By admin | Published: April 27, 2015 11:30 PM2015-04-27T23:30:36+5:302015-04-28T00:32:56+5:30
गारांचा खच : विजांचा कडकडाट, जोरदार पावसाने वीजपुरवठा खंडित
कोल्हापूर : सोसाट्याचे वारे, टपोऱ्या गारा, विजांचा कडकडाट व आडव्या-तिडव्या पावसाने सुमारे अर्धा तास कोल्हापूर शहराला अक्षरश: झोडपून काढले. जोरदार पावसाने शहरातील सखल भागांत पाणी तुंबल्याने वाहतुकीवर, तर वीज खंडित झाल्याने कामकाजावरही परिणाम झाला. ग्रामीण भागातही जोरदार पाऊस झाला असून, हा पाऊस पिकांना पोषक आहे.
गेले आठ-दहा दिवस जिल्ह्यात उन्हाचा तडाखा वाढला आहे. सकाळी आठपासूनच अंगाची लाही-लाही करणाऱ्या उष्म्याने नागरिक अक्षरश: मेटाकुटीला आले आहेत. दुपारी बारानंतर तर घराबाहेर पडणे मुश्कील झाले आहे, इतका तापमानाचा पारा वाढला आहे. सोमवारी सकाळपासून कमालीचा उष्मा वाढला होता. सायंकाळी पावणेसहा वाजता पाऊस सुरू झाला. सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस सुरू झाला. त्यानंतर लहान लहान गारांचाही शिडकावा सुरू झाल्याने नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली.
दहा मिनिटे जोरात वारे वाहत होते. वाऱ्याला कमालीची गती असल्याने झाडांचा अक्षरश: पाळणा झाला. अनेक ठिकाणच्या
घरांवरील पत्रेही उडून केले, तर शहरात विविध ठिकाणी लावलेले डिजिटल फलकही वाऱ्याने तुटले. पाऊस आडवा-तिडवा असल्याने अनेकांच्या घरांत, दुकानांत पाणी आल्याने त्रेधातिरपीट उडाली.
ग्रामीण भागातही जोरदार पाऊस झाला. हा पाऊस पिकांसाठी पोषक आहे. पाण्याअभावी करपणाऱ्या पिकांना या पावसाने थोडा दिलासा मिळाला आहे; पण वीट व्यावसायिकांचे नुकसान झाले आहे. (प्रतिनिधी)
ताकारी, बावचीत गारपीट
सांगली : साांगली जिल्ह्यात सोमवारी सायंकाळी ५.३0 च्या सुमारास जोरदार वाऱ्यासह पाऊस झाला. वाळव्यासह इस्लामपूर, बोरगाव, नेर्ले, कामेरी येथे अर्धा तास पाऊस झाला. ताकारी, गोटखिंडी, बावची येथे जोरदार गारपीट झाली. कामेरी येथे ग्रामदैवताच्या यात्रेसाठी आलेल्या भाविकांची व यात्रेकरुंची त्रेधा उडाली. मिरज पूर्व भागातील एरंडोली, मल्लेवाडी, सलगरे तसेच जत शहरासह संख, दरीबडची परिसरात तुरळक प्रमाणात पाऊस झाला. शिराळा तालुक्यात अर्धा तास झालेल्या पावसाने आंबा व मक्याचे नुकसान झाले.