कोल्हापूर, सातारा जिल्ह्यात मध्यरात्री पावसाच्या सरी, देवगडात वीज वाहिन्या तुटल्या :आंबा बागायतदार चिंतेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 19, 2018 01:18 PM2018-11-19T13:18:38+5:302018-11-19T16:44:18+5:30
कोल्हापूर शहर व परिसर तसेच साताऱ्या जिल्हायातील पाटण कपईड येथे सोमवारी मध्यरात्री पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या.
कोल्हापूर/सातारा : कोल्हापूर शहर व परिसर तसेच साताऱ्या जिल्हायातील पाटण कपईड येथे सोमवारी मध्यरात्री पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या. त्यामुळे रात्री अचानाक कोसळलेल्या पावसामुळे काही ठिकाणी सकल भागात पाणी साचल्याचे चित्र कोल्हापूरमध्ये दिसत होते. यामध्ये काही ठिकाणी शेतकºयांनी सुकत ठेवलेले पिकलेले पिक भिजल्याने नुकसान झाले. तर दिवाळीत काहींनी बाहेर लावलेले आकाशकंदील, रंगीबेरंगी विद्युत रोषणाईच्या माळा या देखिल भिजून गेल्या.
वीजेच्या कडकडाट्यासह पाऊस : गुºहाळे, वीट व्यवसायकांचे मोठे नुकसान
कोल्हापूर : जिल्ह्यात सोमवारी अवकाळी पावसाने हजेरी लावली. विजेच्या कडकडाट्यासह अनेक ठिकाणी जोरदार पाऊस झाल्याने गुºहाळे, वीट व्यवसायकांचे मोठे नुकसान झाले. कोल्हापूर शहरातही सकाळी नऊच्या सुमारास जोरदार पाऊस सुरू झाल्याने नागरिकांची तारांबळ उडाली. आगामी दोन-तीन दिवस ढगाळ वातावरणासह हलक्या पावसाचा अंदाज हवामाना खात्याने वर्तवला आहे.
सातारा : जिल्ह्यातील कºहाड, पाटणसह दुष्काळी माण आणि खटाव तालुक्यात अनेक ठिकाणी सोमवारी पहाटेपासून अवकाळी पाऊस झाला. यामुळे कही खुशी कही गम असे चित्र असलेतरी दुष्काळी भागात पेरण्या अल्प प्रमाणात झाल्याने या पावसाचा फायदा होणार नाही.
बंगालच्या उपसागरात गाजा चक्रीवादळ निर्माण झाले आहे. यामुळे दक्षिणेकडील तामिळनाडू राज्यात चांगला पाऊस होत आहे. तर सातारा जिल्ह्यात चार दिवसांपासून ढगाळ वातावरण आहे. रविवारी पाऊस येईल अशी स्थिती होती. पण, रात्री उशिरापर्यंत पाऊस झाला नाही. मात्र, पहाटेच्या सुमारास माण तालुक्यातील अनेक ठिकाणी पावसाने सुरूवात केली. अगदी सकाळपर्यंत पाऊस पडत होता. वरकुटे मलवडी, कुकुडवाड, धामणी, नरवणे, पळशी आदी गावांत कमी अधिक फरकाने पाऊस झाला. तसेच खटाव तालुक्यातील काही गावांत पावसाने हजेरी लावली. काही ठिकाणी पाणी वाहिले. पण, पावसाचा फायदा होणार नाही.
दुष्काळी तालुक्यात रब्बी हंगामातील पेरण्या अल्प प्रमाणात झाल्या आहेत. काही ठिकाणी तर उगवलेले पीक वाळून गेले आहे. या पावसाने पेरणीचे क्षेत्र वाढणार नाही. फक्त पाऊस झाला असेच म्हणता येणार आहे. तसेच कºहाड आणि पाटण तालुक्यातही पाऊस झाला आहे.
देवगडात अवकाळी पावसाची हजेरी -वीज वाहिन्या तुटल्या :आंबा बागायतदार चिंतेत
सिंधुदुर्ग : देवगड तालुक्यात सोमवारी पहाटे अवकाळी पावसाने हजेरी लावली यातच जामसंडे भटवाडी रोड येथे पहाटे ५ वा.सुमारास विद्युत वाहिनी तुटल्यामुळे देवगड जामसंडे शहरातील वीजपुरवठा खंडित झाला. वीज वितरणाचे अधिकारी व कर्मचारी यांच्या अथक परिश्रमाने सकाळी १० वा.सुमारास वीज पुरवठा सुरळीत सुरू करण्यात आला.तसेच पावसाच्या अधून मधून हलक्या सरी पडत असल्यामुळे आंबा बागायतदार चिंतेत पडला आहे.
रत्नागिरी -अरबी समुद्रात हवेचा कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने रत्नागिरी, लांजा, संगमेश्वरमध्ये पाऊस.
रत्नागिरी : अरबी समुद्र्रात तीव्र कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने ऐन थंडीच्या मोसमात सोमवारी सकाळी १० वाजल्यापासून पावसाने हजेरी लावल्याने आंबा व काजू बागायतदार चिंताग्रस्त झाले आहेत. जिल्ह्यातील संगमेश्वर, लांजा, रत्नागिरी, राजापूर आदी भागात म्हणजे दक्षिण रत्नागिरीत हा पाऊस झाला.
रत्नागिरी परिसरात सकाळपासूनच वातावरण ढगाळ होते. सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास रिमझिम पावसाला सुरुवात झाली. त्यानंतर सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास मुसळधार पाऊस झाला. पावसामुळे नागरिकांची एकच त्रेधातिरपीट उडाली. दिवसभर वातावरण ढगाळच होते. लांजा परिसरातही सकाळी १० वाजल्यापासून जोरदार पावसाला सुरुवात झाली.
मागील एक, दोन दिवस झालेल्या उष्म्यावाढीनंतर सोमवारी राजापूर तालुक्यातही जोरदार पावसाने सर्वत्र ढगांच्या गडगडाटासह हजेरी लावली. दिवसभर तो बरसतच होता. या पावसामुळे कुठे नुकसान झाल्याचे वृत्त नाही. संगमेश्वर तालुक्यातही अनेक ठिकाणी पावसाने हजेरी लावली. त्यामुळे एकच पळापळ झाली. पावसामुळे काही ठिकाणी रस्त्यावर पाणी साचले होते.