कोल्हापूर ‘ सतेज-अमल लढत नक्की

By admin | Published: September 25, 2014 01:32 AM2014-09-25T01:32:52+5:302014-09-25T01:32:52+5:30

कोल्हापूर ‘दक्षिण’चे राजकारण : अमल महाडिक यांचा अखेर ‘भाजप’मध्ये प्रवेश

Kolhapur 'Satej Amal' | कोल्हापूर ‘ सतेज-अमल लढत नक्की

कोल्हापूर ‘ सतेज-अमल लढत नक्की

Next

कोल्हापूर : काँग्रेसचे विधान परिषदेतील आमदार महादेवराव महाडिक यांचा मुलगा व जिल्हा परिषद सदस्य अमल महाडिक यांनी आज, बुधवारी अखेर भारतीय जनता पक्षात रीतसर प्रवेश केला. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते विनोद तावडे यांच्या मुंबईतील निवासस्थानी हा पक्षप्रवेश झाला. त्यामुळे गेले पंधरा दिवस सुरू असलेल्या पक्षप्रवेशाच्या चर्चेला पूणविराम मिळाला.
आता कोल्हापूर दक्षिण मतदारसंघातून ‘गृहराज्यमंत्री सतेज पाटील विरुद्ध अमल महाडिक’ अशी लढत होईल. गेल्या निवडणुकीत सतेज पाटील विरुद्ध धनंजय महाडिक अशी चुरशीची लढत
होऊन त्यामध्ये पाटील ५७६७ मतांनी विजयी झाले होते.
जिल्हा परिषदेत मुलगा अमल याला संधी असूनही सतेज पाटील यांच्या विरोधामुळे अध्यक्षपद मिळू शकले नाही, याचा राग आमदार महाडिक यांना होता. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत खासदार धनंजय महाडिक व सतेज पाटील यांचे मनोमिलन झाले; परंतु आमदार महाडिक मात्र त्यापासून अलिप्तच राहिले. तेव्हापासूनच महाडिक गटाकडून विधानसभेच्या दृष्टीने हालचाली सुरू होत्या. या मतदारसंघातून भाजपकडून लढण्यासाठीही सक्षम उमेदवार नव्हता. त्यामुळे आमदार चंद्रकांतदादा पाटील यांनीच अमल महाडिक यांना उमेदवारी द्यावी, असा आग्रह धरला होता. भाजप उमेदवारी द्यायला तयार होता; परंतु ती स्वीकारावी की नाही, याबद्दल महाडिक संभ्रमावस्थेत होते. महादेवराव महाडिक हे काँग्रेसचे आमदार असल्याने व तोंडावर राजाराम कारखाना व ‘गोकुळ’ची निवडणूक असल्याने काही राजकीय अडचणी येतील का, असा अंदाज घेण्यात येत होता. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पी. एन. पाटील यांनीही आमदार महाडिक यांची भेट घेऊन भाजपकडून निवडणूक लढवू नये, असे आवाहन केले होते.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही तसे सुचविले होते. त्यामुळे महाडिक कोणता निर्णय घेतात, याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले होते; परंतु त्यांनी त्यांच्या स्वभावानुसार मुलग्याला भाजपतर्फे रिंगणात उतरविण्याचा निर्णय घेतला. आज, बुधवारी सायंकाळी अमल यांचा विनोद तावडे यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये पक्षप्रवेश झाला. यावेळी सांगलीचे खासदार संजयकाका पाटील, आमदार चंद्रकांतदादा पाटील, सुरेश हाळवणकर, आदी मान्यवर उपस्थित होते.

‘लोकमत’चे वृत्त...
कोल्हापूर दक्षिण मतदारसंघातून भाजपकडून अमल महाडिक यांचे नाव पुढे आल्याचे वृत्त ‘लोकमत’नेच पहिल्यांदा ११ सप्टेंबरला प्रसिद्ध केले. त्यानंतर त्यांनी भाजपचे राष्ट्रीय नेते नितीन गडकरी व राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांची कोल्हापूर विमानतळावर जाऊन भेट घेतली व निवडणूक लढविण्याची इच्छा व्यक्त केली होती.

महाडिक यांच्या राजीनाम्याची शक्यता..
अमल महाडिक यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने आमदार महादेवराव महाडिक हे आमदारकीचा राजीनामा देण्याची शक्यता व्यक्त होत आहे. काँग्रेसकडून त्यांच्यावर येणारा संभाव्य दबाव विचारात घेऊन त्यांनी हे पाऊल उचलण्याचा निर्णय घेतल्याचे सांगण्यात येते. त्यांच्या आमदारकीची मुदत २०१६ पर्यंत आहे.

सातजणांचे काय?...
अमल महाडिक यांच्याशिवाय या मतदारसंघातून भाजपकडून सातजणांनी उमेदवारी मागितली होती. त्यामध्ये प्रा. जयंत पाटील, निवास साळोखे, चंद्रकांत जाधव, राजू माने, माणिक पाटील, प्रताप कोंडेकर, बी. जी. मांगले यांचा समावेश होता. आता अमल यांना उमेदवारी मिळाल्याने हे सर्वजण महाडिक यांनाच पाठिंबा देतात की आणखी काही वेगळी भूमिका घेतात, हे औत्सुक्याचे असेल.

एक नजर २००९ च्या निकालावर
सतेज पाटील (काँग्रेस) -
८६ हजार ९४९
धनंजय महाडिक (अपक्ष) -
८१ हजार १८२
सूर्यकांत पाटील (भाजप) -
१० हजार ०८
दिग्विजय खानविलकर (अपक्ष)- ७ हजार ८६८

‘गोकुळ’चे काय?...
कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध संघात (गोकुळ) मध्ये सध्या आमदार महाडिक, माजी आमदार पी. एन. पाटील व सतेज पाटील यांची सत्ता आहे. विधानसभा निवडणुकीनंतर संघाची निवडणूक होणार आहे. त्यावेळी कदाचित भाजपचेच सरकार सत्तेवर आलेले असेल. त्यामुळे आता विधानसभेला त्यांना मदत करून त्या जोरावर पुन्हा संघाची सत्ता मिळवता येऊ शकेल, असाही विचार त्यांनी केला असल्याचे सांगण्यात येते.

Web Title: Kolhapur 'Satej Amal'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.