कोल्हापूर :  कर्मचाऱ्यांभोवती आवळतोय सावकारी पाश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 7, 2018 11:36 AM2018-11-07T11:36:54+5:302018-11-07T11:38:02+5:30

कोल्हापूर : कौटुंबिक गरज म्हणून दहा टक्के व्याजाने पैसे घेतले खरे; मात्र हा कर्जाचा सावकारी पाश महानगरपालिका कर्मचाऱ्यांभोवती दिवसेंदिवस ...

Kolhapur: Savarkar loop surrounded by employees | कोल्हापूर :  कर्मचाऱ्यांभोवती आवळतोय सावकारी पाश

कोल्हापूर :  कर्मचाऱ्यांभोवती आवळतोय सावकारी पाश

googlenewsNext
ठळक मुद्देकर्मचाऱ्यांभोवती आवळतोय सावकारी पाशमहापालिकेच्या कर्मचाऱ्यांची पासबुके, एटीएम कार्डे सावकारांच्या ताब्यात

कोल्हापूर : कौटुंबिक गरज म्हणून दहा टक्के व्याजाने पैसे घेतले खरे; मात्र हा कर्जाचा सावकारी पाश महानगरपालिका कर्मचाऱ्यांभोवती दिवसेंदिवस अधिकच आवळत चालला आहे. मुद्दलीपेक्षा अधिक व्याज घेतल्यानंतरसुद्धा सावकारांची व्याजाची भूक काही भागत नाही. शेकडो कर्मचाऱ्यांची बॅँक पासबुके, एटीएम कार्डे; एवढेच काय, तर चेकबुकेसुद्धा सावकारांच्या ताब्यात आहेत. पगाराच्या दिवशीच हे कर्मचारी रिकाम्या हाताने घरी परततात. त्यामुळे सावकाराचे व्याज भागवता-भागवता संसार उघड्यावर पडण्याची वेळ कर्मचाऱ्यांवर आली आहे.

कोल्हापूर महानगरपालिकेच्या आरोग्य विभागातील असंख्य कर्मचारी खासगी सावकारांच्या कर्जात अडकले असून, त्यांच्याकडून व्याजवसुलीची यंत्रणा मात्र अतिशय दहशतीखाली सुरू आहे. महानगरपालिकेतील आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांचे पगार साधारणपणे प्रत्येक महिन्याच्या सात ते दहा तारखेदरम्यान होत असतात.

या दरम्यान ठरावीक बॅँकांच्या दारात हे सावकार उभे राहिलेले असतात. कर्ज घेणारा कर्मचारी आला की, त्याच्या हातात बॅँक पासबुक, एटीएम कार्ड द्यायचे. त्याचा सगळा पगार काढायचा. त्याच ठिकाणी तो सावकार त्याचे सगळे व्याज काढून घेतो आणि राहिलेली रक्कम त्या कर्मचाऱ्यांच्या हातावर टिकवितो. काही कर्मचाऱ्यांच्या ‘एटीएम’चे पासवर्डसुद्धा सावकारांना माहीत असून ते स्वत:च कर्मचाऱ्यांचा पगार काढतात.

सावकारांच्या अशा वसुलीच्या पद्धतीमुळे कर्मचाऱ्यांची अवस्था अतिशय दयनीय झाली आहे. महिनाभर राबूनही त्यांच्या हातात पगार पडत नाही, याचे शल्य त्यांच्या चेहऱ्यांवर स्पष्ट दिसते. आरोग्य कर्मचारी कौटुंबिक कारणांनी हातउसने म्हणून व्याजाने पैसे घेतात. पाच हजार रुपयांपासून एक लाखापर्यंत पत पाहून सावकार कर्मचाऱ्यांना प्रत्येक महिन्याला दहा टक्के व्याजाने पैसे देतात.

कर्मचाऱ्यांना व्याजाने पैसे देणारे आठ ते दहा सावकार आहेत. त्यांपैकीच एक रघुनाथ केंबळे आहे. त्याच्यावर सोमवारी (दि. ५) सावकारकीचा गुन्हा दाखल झाला आणि महापालिकेतील सावकारकी चर्चेत आली. केंबळेला जसा आत घातला तशी कारवाई अन्य सावकारांवरही केली जावी, अशी मागणी अन्यायग्रस्त कर्मचाऱ्यांतून केली जात आहे.

आबा सावकाराची मोठी वसुली

‘आबा’ नावाचा एक सावकार आहे. एकेकाळी महापालिकेत नोकरीस असलेल्या आबाने स्वेच्छानिवृत्ती घेतली आणि सावकारकीचा धंदा सुरू केला. या आबाचे आणि रघुनाथ केंबळेचे साटेलोटे असल्याची चर्चा आहे. त्याच्या खिशात काही डायऱ्या असतात. कोणाला किती रक्कम दिली, तिचे व्याज किती मिळाले, येणे बाकी किती आहे याच्या सगळ्या नोंदी तो डायरीत करतो. त्याच्याकडे कर्जबाजारी कर्मचाऱ्यांची पासबुके, एटीएम कार्डे आहेत. कर्मचारी बॅँकेत पगार काढायला आला की मगच तो त्यांना कार्ड देतो. व्याजाची रक्कम जागेवरच कापून घेतो. त्याची बायकोही त्याला या कामात मदत करते.

राहतं घर काढून घेतलं

आबाकडून गौरा नावाच्या एक महिला कर्मचाऱ्याने व्याजाने पैसे घेतले होते. काही महिने व्यवस्थित व्याज भागविल्यावर पुढे ते थकत गेले. कर्मचारी पतसंस्थेत कर्ज मिळत नाही, वसुली होत नाही म्हटल्यावर आबाने चक्क घर काढून घेतले आणि त्या महिलेला रस्त्यावर आणले. व्याज देऊन थकून गेलेल्या त्या महिलेजवळ गप्प बसण्याशिवाय दुसरा पर्याय राहिला नाही. मात्र त्याची चर्चा आरोग्य विभागात जोरात झाली. कोणीही तिच्या मदतीला धावले नाही.

आधी स्टॅम्प करून घेतले जातात

मुजोर सावकार आधी कर्मचाऱ्यांची कुंडली काढतात. तो आपले व्याज आणि मुद्दल व्यवस्थित देईल का? त्याच्या हातात किती पगार येतो? याची माहिती महापालिकेतून काढतात. त्यानंतर कर्ज घेणाऱ्या व्यक्तीच्या पत्नीची, आईची संमती घेतली जाते. त्यानंतर १०० रुपयांचा स्टॅम्प केला जातो. स्टॅँपवर दहा टक्के व्याजाचा कोठेही उल्लेख नसतो. मात्र ‘भिशी भागविण्यासाठी, घरखर्चाससाठी हातउसने’अशी कारणे स्टॅम्पवर नमूद केली जातात.

रघुनाथ, आबा, प्रकाश, बाळू

रघुनाथ केंंबळे याच्याविरुद्ध थेट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. त्यामुळे आबा, प्रकाश, बाळू नावांचे सावकार चर्चेत आले आहेत. आबा सेवानिवृत्त झाला असला तरी प्रकाश हा मुकादम म्हणून, तर बाळू हा घंटागाडीवर असल्याची चर्चा आहे. रघुनाथ हा एकेकाळी खासगी बॅँकेतून कर्मचाऱ्यांना कर्ज मिळवून द्यायचा. त्यातून त्याला कर्मचाऱ्यांकडून मोठे कमिशन मिळत होते. कमिशन मिळवता-मिळवता तोच आता मोठा सावकार झाला, असे सांगितले जाते. आठ ते दहा सावकारांनी आरोग्य विभागातील असंख्य कर्मचाऱ्यांना लाचार बनवून गुलामगिरीत ढकलले आहे.

 

Web Title: Kolhapur: Savarkar loop surrounded by employees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.