कोल्हापूरच्या शाळकरी मुलाचा विहिरीत बुडून मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2021 04:32 AM2021-06-09T04:32:10+5:302021-06-09T04:32:10+5:30
पोहण्यासाठी गेलेल्या शाळकरी मुलाचा विहिरीत बुडून मृत्यू झाल्याची घटना निपाणी येथे मंगळवारी सकाळी घडली. रणवीर दीपक सूर्यवंशी (वय १५) ...
पोहण्यासाठी गेलेल्या शाळकरी मुलाचा विहिरीत बुडून मृत्यू झाल्याची घटना निपाणी येथे मंगळवारी सकाळी घडली. रणवीर दीपक सूर्यवंशी (वय १५) असे मृत शाळकरी मुलाचे नाव आहे. कोल्हापूर येथील महाराणा प्रताप चौकात रणवीर राहत होता. गेल्या महिनाभरापूर्वी तो निपाणी येथील मामाकडे आला होता.
या घटनेची अधिक माहिती अशी की, रणवीर हा महिनाभरापूर्वी त्याचे मामा सुभाष चव्हाण (साळुंखे गल्ली) यांच्याकडे आला होता. मंगळवारी सकाळी तो आणि सुभाष यांचा मुलगा प्रथमेश हे दोघे घरापासून काही अंतरावर असलेल्या श्रीमंत निपाणकर-सरकार वाड्यातील विहिरीवर पोहोण्यासाठी गेले होते. इनरच्या साह्याने पोहत असताना रणवीर याचा इनरवरील ताबा सुटला व तो विहिरीत बुडाला.
यानंतर प्रथमेश याने याची माहिती कुटुंबीयांना दिली. त्यानुसार तातडीने चव्हाण परिवारांसह नगराध्यक्ष जयवंत भाटले, श्रीमंत दादाराजे देसाई-निपाणकर यांच्यासह काही नागरिकांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. यावेळी रणवीर हा पाण्यात बुडाल्याचे लक्षात आले. याबाबतची माहिती निपाणी शहर पोलिसांना दिली.
घटनास्थळी शहर पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक अनिलकुमार कुंभार यांच्यासह सहकाऱ्यांनी भेट देऊन पाहणी केली. यानंतर कोल्हापूर येथील जीवरक्षक दिनकर कांबळे यांनी शंभर फूट विहिरीतील मृतदेह बाहेर काढला. घटनेची नोंद निपाणी शहर पोलीस ठाण्यात घटनेची नोंद झाली आहे. दुपारी शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. रणवीर हा एकुलता एक मुलगा असल्याने कुटुंबीयांनी आक्रोश केला होता.
फोटो : रणवीर सूर्यवंशी