कोल्हापूर : कर्जमाफीच्या खात्यांचे उद्यापासून ‘आॅडीट’, ८० हजार खाती तपासणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2018 01:21 PM2018-05-29T13:21:17+5:302018-05-29T13:21:17+5:30
राज्य सरकारच्या कर्जमाफीतील लाभार्थी खात्यांचे लेखापरीक्षण (आॅडीट) उद्यापासून (दि. ३०) सुरू होणार आहे. जिल्ह्यातील ८० लेखापरीक्षकांच्या माध्यमातून सुमारे ८० हजार कर्जमाफी खात्यांची तपासणी केली जाणार आहे.
कोल्हापूर : राज्य सरकारच्या कर्जमाफीतील लाभार्थी खात्यांचे लेखापरीक्षण (आॅडीट) उद्यापासून (दि. ३०) सुरू होणार आहे. जिल्ह्यातील ८० लेखापरीक्षकांच्या माध्यमातून सुमारे ८० हजार कर्जमाफी खात्यांची तपासणी केली जाणार आहे.
केंद्र सरकारने २००८ मध्ये केलेल्या कर्जमाफीत मोठ्या प्रमाणात त्रुटी राहिल्या होत्या. ही कर्जमाफी देशभरात चर्चेत राहिली होती, अजूनही न्यायालयीन प्रक्रियेत ही कर्जमाफी अडकली आहे. ही कर्जमाफी पारदर्शक व पात्र शेतकऱ्यांनाच व्हावी, यासाठी आॅनलाईन अर्ज स्वीकारल्यापासून सरकारने दक्षता घेतली आहे.
जिल्ह्यात आतापर्यंत जिल्हा बॅँक व राष्ट्रीयकृत बॅँकांच्या माध्यमातून १ लाख ८५ हजार ५०० खातेदारांना ३५९ कोटींची कर्जमाफी झाली आहे. या खात्यांचे लेखापरीक्षण केले जाणार आहे. कर्जमाफीचे निकष, अर्ज व प्रत्यक्ष कर्जमाफीचा लाभ याची तपासणी केली जाणार आहे.
आजपासूनच कर्जमाफीच्या खात्यांची तपासणी केली जाणार होती, पण ‘जी. डी. सी. अॅण्ड ए.’ परीक्षेत सहकार खात्याचे अधिकारी गुंतले आहेत. त्यामुळे उद्यापासून लेखापरीक्षणाचे काम करण्याची तयारी सहकार व लेखापरीक्षण विभागाने केली आहे.
साडेचौदा हजार शेतकऱ्यांना प्रतीक्षा
कर्जमाफीत पात्र आहेत, पण कर्जमाफीच्या रकमेपेक्षा कमी-अधिक रक्कम आल्याने १४ हजार ५०० खात्यांना लाभ झालेला नाही. रकमा दुरुस्त केल्या पण सिस्टीम स्वीकारत नसल्याने हे शेतकरी अद्याप वंचित आहेत.