कोल्हापूर : सुरक्षा रक्षकांचे काठी आपट आंदोलन, सहा. कामगार आयुक्त कार्यालयासमोर निदर्शने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2019 04:16 PM2019-01-14T16:16:55+5:302019-01-14T16:20:27+5:30
कोल्हापूर : राज्यातील १४ सुरक्षा रक्षक मंडळे एकत्रीकरण करावे, पगारवाढ करावी, दर्जेदार खाकी गणवेश असावा आदी मागण्यांसाठी महाराष्ट्र सुरक्षा रक्षक ...
कोल्हापूर : राज्यातील १४ सुरक्षा रक्षक मंडळे एकत्रीकरण करावे, पगारवाढ करावी, दर्जेदार खाकी गणवेश असावा आदी मागण्यांसाठी महाराष्ट्र सुरक्षा रक्षक महासंघाच्यावतीने सोमवारी सकाळी शाहुपूरीतील सहायक कामगार आयुक्त कार्यालयासमोर सुरक्षा रक्षकांनी रस्त्यावर काठी आपट आंदोलन निदर्शने केले.
सहायक कामगार आयुक्त अनिल गुरव यांच्याशी चर्चा करताना त्यांनी, पगारवाढीची नोटीस पाठवली असून सुरक्षा रक्षकांच्या पगारामध्ये भरघोस वाढ होईल असे आश्वासन दिले. तसेच इतर मागण्यांबाबत वरिष्ठ स्तरावर पाठपुरावा करु असे सांगितले. यावेळी सुरक्षा रक्षक राज्य सल्लागार समितीचे सदस्य अॅड. विशाल मोहिते हेही प्रमुख उपस्थित होते.
राज्यातील सुरक्षा रक्षक मंडळातील रक्षकांना खाकी गणवेश देण्याबाबतचा निर्णय राज्य सुरक्षा रक्षक सल्लागार मंडळाच्या बैठकीत गेल्याच वर्षी झाला. त्यानुसार मंडळाकडील ८० लाखाचे शिल्लक असलेले कापड गणवेशसाठी निश्चित केले. पण तरीही निळ्या कापडासाठी निवीदा का काढली? असा प्रश्न सुरक्षा रक्षकांना पडला.
सुरक्षा रक्षक कार्यरत असताना अतिक्रमण झालेली आस्थापने रद्द करावीत आदी मागण्यासाठी सोमवारी सकाळी शाहूपुरीतील सहायक कामगार आयुक्त कार्यालयासमोर सुरक्षा रक्षकांनी भारतीय मजदूर संघ सलग्न सुरक्षा रक्षक महासंघाच्यावतीने रस्त्यावर काठी आपटत निदर्शने केली. यावेळी आंदोलकांनी गळ्यात भगवे स्कॉर्प व भगवे झेंडे घेतले होते.
त्यानंतर महासंघाच्या शिष्ठमंडळाने सहायक कामगार आयुक्त अनिल गुरव यांची भेट घेऊन त्यांना मागण्यांचे निवेदन दिले. यावेळी सुरक्षा रक्षक राज्य सल्लागार समिती सदस्य अॅड. विशाल मोहितेही प्रमुख उपस्थित होते. यावेळी सुरक्षा रक्षकांच्या मागण्यांबाबत वरिष्ठ पातळीवर पाठपुरावा करण्याचे आश्वासन देण्यात आले. याशिवाय सुरक्षा रक्षकांच्या पगारवाढीबाबत नोटीस काढली असून लवकरच पगार १७५० ते २०५० रुपयेपर्यत वाढ होईल असे आश्वासन दिले.
आंदोलनात भारतीय मजदूर संघाचे जिल्हाध्यक्ष एस.एन. पाटील, जिल्हा सरचिटणीस अभिजीत केकरे, कार्याध्यक्ष मुकूंदराव जोशी, राज्य सुरक्षा रक्षक महासंघाचे उपाध्यक्ष संदिप पाटील, अॅड. अनुजा धरनगावकर, प्रमोद बागडी, राम बोडके, महमंद शिदवणकर, अभिजीत पाटील, शिवाजी पाटील, नितेश पाटील, रमेश पाटील, प्रकाश भारमल, प्रफुल्ल मेढे आदी उपस्थित होते.
सुरक्षा रक्षकांच्या मागण्या...
- राज्यातील १४ सुरक्षा रक्षक मंडळे एकत्रीकरण करावे,
- सल्लागार मंडळाच्या बैठकीतील निर्णयानुसार दर्जेदार खाकी गणवेश मिळावा
- पगार प्रत्येक महिन्याच्या ७ तारखेला मिळावा, पगारवाढ मिळावी
- सुरक्षा रक्षकांना नोंदणीक्रमांक मिळावा
- ई.एस.आय.सी. आणि ग्रॅज्युटीची अंमलबजावणी करावी