कोल्हापूर : किरण लोहार यांना सक्तीच्या रजेवर पाठवून चौकशी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2018 12:25 PM2018-09-12T12:25:43+5:302018-09-12T12:28:26+5:30
वारंवार लेखी देऊनही बैठकांना अनुपस्थित राहणारे, पंचायत राज समितीच्या दौऱ्यावेळीही गायब असणारे प्रभारी शिक्षण उपसंचालक आणि माध्यमिक शिक्षणाधिकारी किरण लोहार यांना सक्तीच्या रजेवर पाठवून त्यांची चौकशी करण्याचा निर्णय जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेमध्ये घेण्यात आला. त्यांच्या कारभाराचा पाढाच सदस्यांनी वाचला.
कोल्हापूर : वारंवार लेखी देऊनही बैठकांना अनुपस्थित राहणारे, पंचायत राज समितीच्या दौऱ्यावेळीही गायब असणारे प्रभारी शिक्षण उपसंचालक आणि माध्यमिक शिक्षणाधिकारी किरण लोहार यांना सक्तीच्या रजेवर पाठवून त्यांची चौकशी करण्याचा निर्णय जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेमध्ये घेण्यात आला. त्यांच्या कारभाराचा पाढाच सदस्यांनी वाचला.
लोहार यांच्या कार्यपद्धतीबाबत आणि माध्यमिक शिक्षण विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या उर्मटपणाबद्दल यावेळी सभागृहात जोरदार चर्चा झाली.
सदस्य राजवर्धन निंबाळकर यांनी माध्यमिक शिक्षणाधिकारी आज का उपस्थित नाहीत, अशी विचारणा करत या विषयाला तोंड फोडले. ते स्थायीच्या बैठकीला नव्हते, सर्वसाधारण बैठकीला नाहीत. पाच, सहा महिन्यांपूर्वी पत्र देऊनही त्यांच्याकडून माहिती मिळाली नाही, असा आरोप निंबाळकर यांनी केला.
प्रवीण यादव म्हणाले, नोटीसही न देता कारवाई करून आयुष्यातून उठवण्याची धमकी लोहार यांनी ज्यांना दिली होती. ते सभागृहाबाहेर रॉकेल ओतून घेऊन आत्मदहन करण्यासाठी आले आहेत. त्यांच्याकडे काय मागणी केली याचीही माहिती घ्या.
ज्येष्ठ सदस्य अरुण इंगवले म्हणाले, लोहार यांनी आल्यापासून किती शिक्षकांना मान्यता दिली, त्यांच्या शाळा, नावे आणि पत्ते मी मागितले होते. अजूनही ही माहिती मिळाली नाही. पंचायत राज समितीवेळीही ते हजर नव्हते. चार आमदार त्यांच्यावर हक्कभंग दाखल करणार आहेत. त्यांच्याबाबतीत आत्ताच जो काही निर्णय घेणार तो घ्या. समिती स्थापन करा, चौकशी करा. अन्यथा त्यांना कार्यालयात येऊ देणार नाही आणि सभागृहही चालू देणार नाही, असा इशाराच इंगवले यांनी दिला.
यानंतर सदस्य आणि अधिकाऱ्यांची समिती नेमण्याचा निर्णय घेण्यात आला. याआधी मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल यांनी नोटीस देऊन त्यांना संधी देण्याची विनंती केली होती; मात्र ती अमान्य करण्यात आली. राहुल आवाडे यांच्यासह अन्य सदस्यांनीही यावेळी कारवाईची मागणी केली.
चहापेक्षा किटली गरम
माध्यमिक शिक्षण विभागातील कारभार म्हणजे ‘चहापेक्षा किटली गरम’अशी परिस्थिती असल्याचा आरोप राजवर्धन निंबाळकर यांनी यावेळी केला. पदाधिकाऱ्यांनीही बोलावल्यानंतरही बैठकीसाठी लोहार येत नसल्याचे सांगत सदस्यांनी यावेळी कर्मचाऱ्यांच्या वागणुकीचाही पंचनामा केला.