कोल्हापूर : पोस्टाचा सर्व्हर अद्याप संथच, गेले तीन दिवस संपुर्ण यंत्रणा कोलमडली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2018 03:13 PM2018-02-24T15:13:10+5:302018-02-24T15:13:10+5:30
चेन्नई येथील मुख्य सर्व्हर डाऊन झाल्याने गेले तीन दिवस पोस्टाची संपुर्ण यंत्रणा कोलमडली आहे. शनिवारी सकाळ पासून कोल्हापूरातील सर्व्हर पुर्ववत झाला असला तरी त्याला गती नसल्याने पोस्टाची कामे अद्याप संथ गतीनेच सुरू असल्याचे चित्र आहे.
कोल्हापूर : चेन्नई येथील मुख्य सर्व्हर डाऊन झाल्याने गेले तीन दिवस पोस्टाची संपुर्ण यंत्रणा कोलमडली आहे. शनिवारी सकाळ पासून कोल्हापूरातील सर्व्हर पुर्ववत झाला असला तरी त्याला गती नसल्याने पोस्टाची कामे अद्याप संथ गतीनेच सुरू असल्याचे चित्र आहे.
चेन्नई येथील मुख्य सर्व्हर डाऊन झाल्याने देशभरातील पोस्ट कार्यालयातील कामकाज गुरूवार सकाळ पासून ठप्प झाले. सर्व्हर शिवाय कर्मचाऱ्यांना काहीच काम करता येत नसल्याने कर्मचारी हैराण झाले आहेत.
पोस्टात बचत खात्यांसह विविध व्यवहार केले जातात. पण गुरूवार पासून सर्व्हर डाऊन झाल्याने सगळे कामच ठप्प झाले आहे. शुक्रवारी सकाळी दहा -पंधरा मिनिटे तेवढाच सर्व्हर सुरू झाला, पण नंतर पुन्हा बंद झाल्याने कामकाज होऊ शकले नाही.
शनिवारी सकाळ पासून रमणमळा येथील मुख्यकार्यालयात संथ गतीने का असेना पण सर्व्हर सुरू झाल्याने कामकाज थोडे सुरळीत झाले. पण ‘आरडी’चे काम ठप्पच राहिले. इतर कार्यालयातील सर्व्हर डाऊनच राहिल्याचे सांगण्यात आले.
‘एटीएम’ ग्राहकांना दिलासा
गेले तीन दिवस पोस्टातून पैसे भरणे, काढणे बंद असल्याने ग्राहकांची कोंडी झाली होती. पण ज्यांच्याकडे पोस्टाचे एटीएम आहे, त्यांना किमान दहा हजार रूपयापर्यंतची रक्कम मिळत आहे. पोस्टाची जिल्ह्यात तीन-चार एटीएम सेंटर असली तरी त्यांचे कार्ड कोणत्याही एटीएम मशीनला चालत असल्याने या ग्राहकांना त्याची फारशी झळ बसत नाही.