कोल्हापूर : निम्म्या शहरात पाण्याचा ठणठणाट, बालिंगा जलशुद्धीकरण केंद्रात शॉर्टसर्किट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 4, 2018 05:06 PM2018-08-04T17:06:17+5:302018-08-04T17:09:41+5:30

कोल्हापूर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या बालिंगा जलशुद्धीकरण केंद्रात शुक्रवारी सायंकाळपासून शनिवारी सकाळपर्यंत तब्बल तीन वेळा शॉर्टसर्किट होऊन विद्युतपुरवठा खंडित झाल्यामुळे जलशुद्धीकरण केंद्र बंद राहिले. परिणामी, शनिवारी निम्म्या शहराचा पाणीपुरवठा झाला नाही.

Kolhapur: Settlement of water in half the city, Shortcourt in Baliga Water Purification Center | कोल्हापूर : निम्म्या शहरात पाण्याचा ठणठणाट, बालिंगा जलशुद्धीकरण केंद्रात शॉर्टसर्किट

कोल्हापूर : निम्म्या शहरात पाण्याचा ठणठणाट, बालिंगा जलशुद्धीकरण केंद्रात शॉर्टसर्किट

Next
ठळक मुद्दे निम्म्या कोल्हापूर शहरात पाण्याचा ठणठणाट, बालिंगा जलशुद्धीकरण केंद्रात शॉर्टसर्किट

कोल्हापूर : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या बालिंगा जलशुद्धीकरण केंद्रात शुक्रवारी सायंकाळपासून शनिवारी सकाळपर्यंत तब्बल तीन वेळा शॉर्टसर्किट होऊन विद्युतपुरवठा खंडित झाल्यामुळे जलशुद्धीकरण केंद्र बंद राहिले. परिणामी, शनिवारी निम्म्या शहराचा पाणीपुरवठा झाला नाही. मनपा प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे उद्भवलेल्या या प्रकारामुळे नागरिकांची मात्र ऐन पावसाळ्यात चांगलीच गैरसोय झाली.

कोल्हापूर शहरातील नागरिकांना पाणीपुरवठा करण्याकरिता भोगावती नदीवर बालिंगा येथे उपसा केंद्र, तसेच जलशुद्धीकरण केंद्र बांधण्यात आले आहे. गेल्या अनेक वर्षांपासून दोन्ही केंद्रे अव्याहतपणे सुरू आहेत.

या जलशुद्धीकरण केंद्रातून चंबुखडी येथील पाण्याच्या टाकीत पाणी नेऊन तेथून निम्म्या शहराला पाणीपुरवठा केला जातो. त्यामध्ये काही उपनगरे, तसेच संपूर्ण ‘सी’ व ‘डी’ वॉर्डाचा समावेश आहे.

जलशुद्धीकरण केंद्राला वीजपुरवठा करणाऱ्या वाहिन्यांना त्याखालील झाडांच्या फांद्यांचा स्पर्श होत होता. हा स्पर्श झाला की, विद्युतपुरवठा आणि जलशुद्धीकरण केंद्र बंद पडायचे. शुक्रवारी सायंकाळी पावणेपाच ते रात्री साडेअकरा या वेळेत पहिल्यांदा विद्युतपुरवठा खंडित झाला.

त्यानंतर मध्यरात्री एक ते पहाटे तीन आणि शनिवारी सकाळी पावणेसात ते सकाळी सव्वानऊ अशा तीन वेळा विद्युतपुरवठा खंडित झाला. त्यामुळे जलशुद्धीकरणाची प्रक्रियाही बंद राहिली.
झाडांच्या फांद्यांचा स्पर्श झाला की, शॉर्टसर्किट होत असल्याने या फांद्या तोडण्याचे काम हाती घेण्यात आले. त्यामुळे पुन्हा सकाळी अकरा ते दुपारी दोन वाजेपर्यंत विद्युतपुरवठा बंद ठेवावा लागला.

तीन वेळा जलशुद्धीकरण केंद्र बंद पडल्याने त्याचा परिणाम शहरातील दैनंदिन पाणीपुरवठ्यावर झाला. चंबुखडीची टाकी पूर्ण क्षमतेने भरली की, व्यवस्थित पाणीपुरवठा होतो; पण वारंवार वीजपुरवठाच खंडित होत राहिल्याने चंबुखडी येथील टाकी भरलीच नाही. त्यामुळे पाणीपुरवठ्याचे वेळापत्रक पूर्णपणे कोलमडले.

शनिवारी सकाळी ज्या भागात पाणी देण्यात येते तेथे पाणीच आले नाही. त्यामुळे नागरिकांची गैरसोय झाली. अनपेक्षित पाणी गायब झाल्याने नागरिक हैराण झाले. घरात पाण्याचा ठणठणाट जाणवू लागला. शनिवारी सायंकाळनंतर कोठे पाणी आले आणि कोठे आले नाही, अशी विचित्र परिस्थिती निर्माण झाली.

चंबुखडी पाण्याच्या टाकीतून फुलेवाडी रिंगरोड, लक्षतीर्थ वसाहत, कणेरकरनगर, सानेगुरुजीनगर, आपटेनगर, राजोपाध्येनगर, तुळजाभवानी कॉलनी, शिवाजी पेठेचा काही भाग, तसेच संपूर्ण ‘सी’ व ‘डी’ वॉर्ड परिसरातील पाणीपुरवठा विस्कळीत झाला.

रंकाळा टॉवर ते आझाद चौक आणि शुक्रवार पेठ ते दसरा चौक परिसरात विस्तारलेल्या ‘सी’ आणि ‘डी’ वॉर्डात लोकवस्ती मोठी आहे. परिणामी, निम्मे शहर चंबुखडी टाकीवर अवलंबून आहे. त्यामुळे पाणीपुरवठा खंडित झाल्याचा परिणाम झाला. प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे ही घटना घडली आहे. परिणामी, झाडांच्या फांद्या वेळोवेळी तोडल्या असत्या, तर शॉर्टसर्किट झालेच नसते.

 

Web Title: Kolhapur: Settlement of water in half the city, Shortcourt in Baliga Water Purification Center

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.