कोल्हापुरातील गर्भलिंग निदान प्रकरण: शिरगावच्या म्होरक्यासह पोवार बंधूंना अटक, डिजिटल सोनोग्राफी मशीन जप्त
By ऑनलाइन लोकमत | Published: February 2, 2023 03:53 PM2023-02-02T15:53:18+5:302023-02-02T15:53:50+5:30
विक्रीसाठी बंदी असलेले डिजिटल सोनोग्राफी मशीन पोवार याला कुठून मिळाले, त्याचा शोध घेण्याचे काम पोलिसांकडून सुरू
कोल्हापूर : गर्भलिंग निदान आणि गर्भपात करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश केल्यानंतर आता पोलिस या रॅकेटच्या मुख्य सूत्रधारापर्यंत पोहोचले आहेत. राधानगरी पोलिसांनी बुधवारी (दि. १) टोळीचा म्होरक्या हिंदुराव ऊर्फ दिलीप बाळासोा पोवार (वय ४०) याच्यासह त्याचा भाऊ विजय बाळासोा पोवार (३८, दोघे रा. शिरगांव, ता. राधानगरी) यांना अटक केली. संशयितांकडून पोलिसांनी एक डिजिटल सोनोग्राफी मशीन जप्त केल्याची माहिती पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी दिली.
राधानगरीच्या पोलिस निरीक्षक स्वाती गायकवाड यांच्यासह एस. एम. यादव, उपनिरीक्षक विजयसिंह घाटगे, के. डी. लोकरे, हवालदार बी. डी. पाटील, सुरेश मेटिल, सचिन पारखे, गजानन गुरव, रोहित खाडे, आदींच्या पथकाने अटकेची कारवाई केली.
मशीन खरेदीची होणार चौकशी
विक्रीसाठी बंदी असलेले डिजिटल सोनोग्राफी मशीन पोवार याला कुठून मिळाले, त्याचा शोध घेण्याचे काम पोलिसांकडून सुरू आहे. या मशीनची किंमत सुमारे १५ ते २० लाख रुपये आहे. मशीन उपलब्ध करून देण्यात काही डॉक्टर किंवा औषध वितरकांचा सहभाग असावा, असा पोलिसांना संशय आहे.
१४ जणांना अटक
राधानगरी आणि भुदरगड पोलिसांनी या गुन्ह्यात आजपर्यंत १४ जणांना अटक केली. त्यात एका डॉक्टरसह काही बोगस डॉक्टर, एजंट आणि सोनोग्राफी मशीन चालवणाऱ्या व्यक्तींचा समावेश आहे.
पोवार बंधूंची कोट्यवधींची कमाई
मुख्य संशयित आरोपी पोवार बंधू यांचा शिरगावमध्ये दीड ते दोन कोटी रुपयांचा अलिशान बंगला आहे. त्याशिवाय काही महागड्या चारचाकी गाड्याही त्यांच्याकडे आहेत, अशी माहिती पोलिसांनी दिली. विशेष म्हणजे विजय पोवार याला यापूर्वीही याच गुन्ह्यात अटक झाली होती. मात्र, त्यानंतरही तो पुन्हा याच गुन्ह्यात सक्रिय आहे.