कोल्हापूर : जीवन मुक्ती सेवा संस्थेतर्फे सोमवारी ‘शहीद दिन’, बल्साडच्या सलीम शेख यांना ‘व्हाईट आर्मी शौर्य पुरस्कार’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 20, 2017 06:33 PM2017-12-20T18:33:00+5:302017-12-20T18:38:45+5:30
कोल्हापूर : जीवन मुक्ती सेवा संस्थातर्फे (व्हाईट आर्मी) वीर जवान अभिजित सूर्यवंशी स्मृतिदिन आणि संस्थेच्या वर्धापनदिनानिमित्त सोमवारी (दि. २५) सायंकाळी सहा वाजता शहीद दिनाचा कार्यक्रम होणार आहे. यात शहीद जवानांना अभिवादन, मशाल ज्योत मिरवणूक आणि पुरस्कार वितरण होईल. यामध्ये यावर्षी बलसाड (गुजरात) येथील बसचालक सलीम गफूर शेख यांना ‘व्हाईट आर्मी शौर्य पुरस्कार’ देऊन सन्मानित केले जाणार आहे, अशी माहिती ‘जीवन मुक्ती’चे संस्थापक-अध्यक्ष अशोक रोकडे यांनी बुधवारी येथे पत्रकार परिषदेत दिली.
संस्थापक-अध्यक्ष रोकडे म्हणाले, या कार्यक्रमास अदृश काडसिद्धेश्वर स्वामी आणि विधि सेवा प्राधिकरणाचे सचिव उमेशचंद्र मोरे प्रमुख उपस्थित असणार आहेत. अमरनाथ यात्रेकरूंच्या बसवर अतिरेक्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्यातून स्वत:च्या जिवाची पर्वा न करता बसमधील सर्व यात्रेकरूंना सुरक्षित स्थळी नेऊन बसचालक सलीम गफूर शेख यांनी त्या सर्वांचा जीव वाचविला. त्यांना यावर्षीचा ‘व्हाईट आर्मी शौर्य पुरस्कार’ देऊन सन्मानित केले जाणार आहे.
स्मृतिचिन्ह व रोख रक्कम असे पुरस्काराचे स्वरूप आहे. जगातील विविध नैसर्गिक आणि मानवनिर्मित आपत्ती आणि अतिरेकी, दहशतवादी हल्ल्यांमध्ये बळी पडलेले निरपराध लोक आणि देशसंरक्षणासाठी बलिदान दिलेल्या शहीद जवानांना अभिवादन केले जाणार आहे.
यावेळी बिंदू चौकामध्ये बालकल्याण संकुल, अंधशाळा, हेल्पर्स आॅफ दि हॅँडिकॅप्ड, चेतना विकास मंदिर, अवनी, स्वयम, करुणालय, जिज्ञासा या संस्थांमधील विद्यार्थ्यांच्या हस्ते श्रद्धादीप प्रज्वलित केला जाईल. तत्पूर्वी व्हाईट आर्मीच्या जवानांची मिरजकर तिकटी, बिनखांबी गणेश मंदिर, महाद्वार रोड, शिवाजी चौक ते बिंदू चौक मार्गावर मशाल ज्योत मिरवणूक काढण्यात येणार आहे. या पत्रकार परिषदेस सचिन भोसले, अझरुद्दीन शेख उपस्थित होते.