कोल्हापूर : शाही दसरा सोहळा आज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 29, 2017 08:35 PM2017-09-29T20:35:23+5:302017-09-29T20:36:10+5:30
कोल्हापूर : आसुरांचा संहार करणाºया आदिशक्तीचा जागर करणाºया शारदीय नवरात्रौत्सवातील मुख्य सोहळा असलेली विजयादशमी म्हणजेच दसºयाचा सोहळा आज, शनिवारी ऐतिहासिक दसरा चौकात होणार
कोल्हापूर : आसुरांचा संहार करणाºया आदिशक्तीचा जागर करणाºया शारदीय नवरात्रौत्सवातील मुख्य सोहळा असलेली विजयादशमी म्हणजेच दसºयाचा सोहळा आज, शनिवारी ऐतिहासिक दसरा चौकात होणार आहे. म्हैसूरनंतर संस्थानकालीन दसरा परंपरेची साक्ष देणाºया या सोहळ्यात सायंकाळी ६ वाजून २० मिनिटांनी शाहू छत्रपती यांच्या हस्ते शमीपूजन होईल. यानिमित्त दसरा चौकात सभामंडप उभारण्यात आला आहे.
स्त्रीशक्तीचा गौरव, घटाच्या रूपाने होणार सर्जनशीलतेची उपासना आणि देवीचा जागर करणाºया नवरात्रौत्सवाचा मुख्य सोहळा म्हणजे शाही दसरा. देवींच्या साडेतीन शक्तिपीठांपैकी एक देवता असलेल्या करवीरनिवासिनी अंबाबाईचा दसरा या नवरात्रौत्सवाचे हे आणखी एक वैशिष्ट्य. म्हैसूर, ग्वाल्हेर आणि कोल्हापूर संस्थान या राजघराण्यांना देवीच्या उपासनेशी जोडण्यात आल्याने येथील शाही दसरा देशभरातील भाविकांसाठी आकर्षणाचे केंद्र आहे.
यानिमित्त आज अंबाबाई आपला विजयोत्सव साजरा करण्यासाठी निघाली, हे दर्शविणारी रथातील पूजा बांधण्यात येते.
सायंकाळी पाच वाजता तोफेच्या सलामीनंतर अंबाबाईची उत्सवमूर्ती असलेली पालखी, जुना राजवाड्यातील श्री तुळजाभवानीच्या पादुका व शिवाजी महाराजांची मूर्ती असलेली पालखी, तसेच गुरुमहाराजांची पालखी भवानी मंडपातून सीमोल्लंघन सोहळ्यासाठी निघतील. दसरा चौकात या पालख्यांचे आगमन होईल. येथे सायंकाळी ६ वाजून २० मिनिटांनी शाहू छत्रपती, युवराज संभाजीराजे, मालोजीराजे यांच्या हस्ते शमीपूजन होईल. आरती होईल. त्यानंतर सीमोल्लंघनाचा सोहळा होईल.या सोहळ्यानंतर श्री अंबाबाईची पालखी सिद्धार्थनगरात व त्यानंतर पंचगंगा नदीघाटावर जाईल. तेथे भक्तांकडून होणारी पूजा स्वीकारत सायंकाळी उशिरा अंबाबाई मंदिरात परतेल. त्यानंतर रात्री साडेनऊ वाजता देवीची पालखी काढण्यात येईल.
जुना राजवाडा कमानीस मंगल तोरण
हिल रायडर्स अॅन्ड हायकर्स ग्रुपच्या वतीने आज, शनिवारी जुना राजवाड्याच्या नगारखान्याच्या कमानीला सकाळी साडेनऊ वाजता तांब्याच्या कलशाचे मंगल तोरण बांधण्यात येणार आहे. पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील व अंजली पाटील यांच्या हस्ते हा कार्यक्रम होईल. यावेळी कोल्हापुरचे नाव उज्ज्वल केलेले खेळाडू व कलाकारांचा सत्कार करण्यात येणार आहे.
आज, शनिवारी होणाºया शाही दसरा सोहळ्यासाठी शुक्रवारी ऐतिहासिक दसरा चौकाच्या कमानीला पानांचे तोरण लावण्यात आले. (छाया : आदित्य वेल्हाळ)