कोल्हापूर : शाहू छत्रपती यांना ‘डी. लिट.’, अरुणकुमार अगरवाल ‘डी. एस्सी.’ ने सन्मानित; डी. वाय. पाटील विद्यापीठाचा सहावा दीक्षान्त समारंभ उत्साहात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2018 04:05 PM2018-01-20T16:05:16+5:302018-01-20T16:28:20+5:30
आम्ही तुमच्याकडे देशातील लोककल्याणाचे काम सोपवत आहोत. यात विशेष करुन आपण देशाचे भविष्य असणाऱ्या बालकांच्या आरोग्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. जर, आपण बालकांची काळजी घेतली, तर तेच उद्या प्रौढ बनतील आणि पर्यायाने देशाची, येथील प्रत्येक जीवित व्यक्तीची काळजी घेतली, असे प्रतिपादन माजी केंद्रीय वित्त व गृहमंत्री पी. चिदंबरम् यांनी शनिवारी येथे वैद्यकीय पदवीधरांना केले.
कोल्हापूर : आम्ही तुमच्याकडे देशातील लोककल्याणाचे काम सोपवत आहोत. यात विशेष करुन आपण देशाचे भविष्य असणाऱ्या बालकांच्या आरोग्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. जर, आपण बालकांची काळजी घेतली, तर तेच उद्या प्रौढ बनतील आणि पर्यायाने देशाची, येथील प्रत्येक जीवित व्यक्तीची काळजी घेतली, असे प्रतिपादन माजी केंद्रीय वित्त व गृहमंत्री पी. चिदंबरम् यांनी शनिवारी येथे वैद्यकीय पदवीधरांना केले.
डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाच्या सहाव्या दीक्षान्त समारंभात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. कदमवाडी येथील डॉ. डी. वाय. पाटील हॉस्पिटलच्या प्रांगणातील या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अभिमत विद्यापीठाचे कुलपती डॉ. विजय भटकर, तर बिहारचे माजी राज्यपाल डॉ. डी. वाय. पाटील, विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. पी. बी. बेहेरे, डी. वाय. पाटील एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील, उपाध्यक्ष व आमदार सतेज पाटील प्रमुख उपस्थित होते.
यावेळी कुलपती डॉ. भटकर यांच्या हस्ते शाहू छत्रपती यांना सन्मानदर्शक ‘डॉक्टर आॅफ लेटर्स’ (डी. लिट.), तर नवी दिल्लीतील मौलाना आझाद मेडिकल कॉलेजचे माजी अधिष्ठाता डॉ. अरुणकुमार अगरवाल यांना सन्मानदर्शक ‘डॉक्टर आॅफ सायन्स’ (डी. एस्सी.) पदवीने गौरविण्यात आले. शानदार, उत्साही वातावरणातील या समारंभात २३० स्नातकांना पदवी प्रदान करण्यात आली.
माजी केंद्रीय वित्त व गृहमंत्री पी. चिदंबरम् म्हणाले, लोकसंख्या तज्ज्ञाच्या मतानुसार २०४५ ते २०५० पर्यंत भारताची लोकसंख्या स्थिर होईल. त्यावेळी एकूण लोकसंख्या १६० कोटीपर्यंत असेल तेव्हा यापुढे काय? असा प्रश्न आपणासमोर असेल. माझ्या मतानुसार स्थिर लोकसंख्या या ध्येयासोबत निरोगी लोकसंख्या असे ध्येय असावे.
यासाठी बालकांच्या आरोग्याकडे लक्ष देणे खूप महत्त्वाचे आहे. प्रत्येक मुलाची निरोगी वाढ झाली पाहिजे. ते निरोगी प्रौढ बनावे. या प्रौढ व्यक्तीने शिक्षण घेतले पाहिजे. त्याने कौशल्य, गरजेतून स्वत:ला उत्पादक बनवून लोकांच्या उपयोगाला आले पाहिजे.
कुलपती डॉ. भटकर म्हणाले, शैक्षणिक, संशोधन आणि आरोग्य सेवेतील विद्यापीठाची कामगिरी, वाटचाल ही अभिमानास्पद आहे. आरोग्याची काळजी घेण्यासाठी विशेष प्रयत्न आवश्यक आहे. आरोग्यपूर्ण समाज घडविण्याची जबाबदारी आपल्यावर आहे.
या दीक्षान्त समारंभाच्या प्रारंभी परीक्षा नियंत्रक डॉ. ए. सी. पवार हे ‘ज्ञानदंड’ घेऊन प्रमुख पाहुणे, अधिष्ठातांसह दीक्षान्त मंडपात आले. या कार्यक्रमास याज्ञसेनीराणी साहेब, शांतादेवी डी. पाटील, खासदार संभाजीराजे, महापौर स्वाती यवलुजे, माजी आमदार मालोजीराजे, संयोगिताराजे, मधुरिमाराजे, वैजयंती पाटील, प्रतिमा पाटील, राजश्री काकडे, आदी उपस्थित होते. विद्यापीठाच्या गीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली. कुलगुरू डॉ. पी. बी. बेहेरे यांनी विद्यापीठाच्या कामगिरीचा आढावा घेतला. रचना पावसकर व चैतन्या पाटील यांनी सूत्रसंचालन केले.