हाऊसफुल्ल गर्दीने कोल्हापुरात फुटबॉल हंगामाचा किक-ऑफ, शिवाजी तरुण मंडळाची विजयी सलामी
By ऑनलाइन लोकमत | Published: December 28, 2022 01:13 PM2022-12-28T13:13:40+5:302022-12-28T13:15:33+5:30
पहिल्याच सामन्यात खेळाडूंमध्ये हाणामारी
कोल्हापूर : शाहू छत्रपती केएसए फुटबॉल लीगमधील शिवाजी तरुण मंडळ आणि खंडोबा तालीम मंडळ या तुल्यबळ संघांतील लढत पाहण्यासाठी फुटबॉल शौकिन, समर्थकांनी छत्रपती शाहू स्टेडियममध्ये हाऊसफुल्ल गर्दी केली. इतक्या मोठ्या प्रमाणावरील गर्दीने पहिल्यांदाच फुटबॉल हंगामाचा किक-ऑफ झाला. त्यामुळे उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. चुरशीच्या पहिल्या सामन्यात शिवाजी तरुण मंडळाने विजयी सलामी दिली. हंगामाच्या पहिल्याच दिवशी तिकीट विक्रीतून १ लाख ४८ हजार रुपये इतकी रक्कम जमा झाली.
या स्पर्धेचे उद्घाटन शाहू छत्रपती यांच्या, तर चषकाचे अनावरण जिल्हा पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी महापालिकेच्या प्रशासक कादंबरी बलकवडे, ऑल इंडिया फुटबॉल फेडरेशनचे सदस्य मालोजीराजे, मधुरिमाराजे, उद्योजक तेज घाटगे, केएसएचे माणिक मंडलिक, नितीन जाधव, दीपक शेळके, राजेंद्र दळवी, नंदकुमार बामणे, दिग्विजय राजेभोसले, यशराजराजे छत्रपती, आदी उपस्थित होते.
तुतारीचा निनाद, हलगी-खैताळ या पारंपरिक वाद्यांच्या गजराने उद्घाटन कार्यक्रमातील उत्साह वाढविला. बालकल्याण संकुलातील विद्यार्थ्यांनी ७५ फुगे हवेत सोडून शाहू छत्रपती यांना अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या. ‘शिवाजी’ आणि ‘खंडोबा’ संघांतील २२ खेळाडूंनी प्रत्येक एक फुटबॉलला प्रेक्षक गॅलरीच्या दिशेने किक मारून उपस्थितांना अनोखी भेट दिली.
चुरशीच्या सामन्यात ‘शिवाजी’ची विजयी सलामी
चढाया-प्रतिचढाया, लक्षवेधक बचाव अशा चुरशीने रंगलेल्या सामन्यात शिवाजी तरुण मंडळाने खंडोबा तालीम मंडळावर ३-१ अशा गोलने मात करत विजयी सलामी दिली. स्टेन्ली ईजी याने नोंदविलेल्या ४ गोलच्या जोरावर फुलेवाडी फुटबॉल क्रीडा मंडळाने संध्यामठ तरुण मंडळावर एकतर्फी मात केली.
‘शिवाजी’ आणि ‘खंडोबा’ या दोन्ही संघांनी सामन्यात सुरुवातीपासून आक्रमक खेळीत करत गोल नोंदवून आघाडी मिळविण्याचा प्रयत्न केला. त्यात ‘खंडोबा’ची बचावफळी भेदण्यात ‘शिवाजी’च्या आघाडीच्या फळीतील खेळाडू यशस्वी ठरले. त्यातील संकेत साळोखे याने विक्रम शिंदे याच्या पासवर सामन्याच्या ३५ व्या मिनिटाला चेंडूला गोलजाळीत धाडून संघाचे खाते उघडले. त्याची परतफेड करण्यासाठी ‘खंडोबा’च्या अबुबखर हसन, दिग्विजय आसनेकर यांनी केलेल्या चढायांना यश आले नाही. पूर्वार्धात १-० अशा गोलने ‘शिवाजी’ची आघाडी राहिली.
उत्तरार्धात गोल नोंदवून सामन्यात आघाडी घेण्यासाठी ‘शिवाजी’, तर गोलची परतफेड करण्यासाठी ‘खंडोबा’ने खेळ केला. त्यात ‘शिवाजी’च्या परदेशी खेळाडू कोफी कुसाई याने संदेश कासार याच्या पासवर सामन्याच्या ६० व्या मिनिटाला गोल करून संघाला २-० अशा गोलने आघाडी मिळवून दिली.
खेळाडूंमध्ये हाणामारी
त्यानंतर तीन ते चार मिनिटांनी अचानकपणे मैदानात या दोन्ही संघातील खेळाडूंमध्ये हाणामारी सुरू झाली. पंच, प्रशिक्षक, व्यवस्थापकांनी मध्यस्थी करत वाद मिटविला आणि सामना पुन्हा सुरू झाला. त्यानंतर आक्रमक पवित्रा घेतलेल्या ‘खंडोबा’च्या अबूबकर हसन या परदेशी खेळाडूने सामन्याच्या ८२ व्या मिनिटाला चेंडूला गोलजाळीची दिशा दाखवित संघावरील आघाडी एका गोलने कमी केली. सामन्याच्या ८८ व्या मिनिटाला ‘शिवाजी’च्या रोहित जाधव याने मोठ्या डीच्या बाहेरून गोल नोंदविला. अखेर ‘शिवाजी’च्या संघाने ३-१ अशी आघाडी घेत विजय मिळविला. ‘शिवाजी’च्या संदेश कासार, रोहन आडनाईक, गोलरक्षक मयूरेश चौगुले यांनी, तर ‘खंडोबा’च्या संकेत मेढे, प्रभू पोवार यांनी चांगला खेळ केला.