कोल्हापूर : शाहू जन्मस्थळ अखेर रखडलेच, कॉन्ट्रॅक्टरवरून मतभेद : दोन सदस्यांचा राजीनामा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 11, 2019 02:31 PM2019-01-11T14:31:10+5:302019-01-11T14:32:44+5:30
शाहू जन्मस्थळ वस्तुसंग्रहालयाच्या ठेकेदारावरीवरून झालेल्या मतभेदामुळे जन्मस्थळाचे काम आजअखेर रखडले आहे. शासनाने नेमलेल्या ठेकेदाराला समिती सदस्यांचा विरोध आहे, तर पुरातत्व खात्याकडून संग्रहालयाचे काम करता येणार नाही, असे शासनाने स्पष्ट केल्याने हा तिढा वाढला आहे. या वादांमुळे अमृत पाटील व उदय सुर्वे यांनी समिती सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे.
इंदूमती गणेश
कोल्हापूर : शाहू जन्मस्थळ वस्तुसंग्रहालयाच्या ठेकेदारावरीवरून झालेल्या मतभेदामुळे जन्मस्थळाचे काम आजअखेर रखडले आहे. शासनाने नेमलेल्या ठेकेदाराला समिती सदस्यांचा विरोध आहे, तर पुरातत्व खात्याकडून संग्रहालयाचे काम करता येणार नाही, असे शासनाने स्पष्ट केल्याने हा तिढा वाढला आहे. या वादांमुळे अमृत पाटील व उदय सुर्वे यांनी समिती सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे.
शाहू जन्मस्थळाच्या ए, बी, सी व डी या चार इमारती पूर्ण आहेत. या इमारतींमध्ये वस्तुसंग्रहालय साकारण्यासाठी अमित सैनी जिल्हाधिकारी असताना ज्येष्ठ इतिहास संशोधक प्रा. डॉ. जयसिंगराव पवार यांच्या अध्यक्षतेखाली शाहू जन्मस्थळ विकास समिती स्थापन करण्यात आली. यात सचिव म्हणून सातारा येथील संग्रहालयाचे उदय सुर्वे व सदस्य म्हणून इतिहास संशोधक इंद्रजित सावंत, डॉ. रमेश जाधव, वसंतराव मोरे, वसंतराव मुळीक, कोल्हापूर वस्तुसंग्रहालयाचे अभिरक्षक अमृत पाटील व यांचा समावेश आहे.
वस्तुसंग्रहालयाच्या कामासाठी शासनाकडून २ कोटींचा निधी आहे; मात्र गेली दोन अडीच वर्षे वारंवार निविदा काढूनही संग्रहालयाच्या कामासाठी ठेकेदारच मिळेना; त्यामुळे पुरातत्व खात्याकडूनच हे काम करण्यात यावे, असा प्रस्ताव पाठविण्यात आला होता; मात्र शासनाने प्रस्ताव नाकारून ठेकेदाराकडून काम करून घ्यावे, असे सांगितल्याने खुल्या निविदा काढण्यात आल्या. यात समितीच्या दृष्टीने ब्लॅक लिस्टेट असलेल्या ठेकेदारालाच कामाचा ठेका देण्यात आला आहे. तशी वर्क आॅर्डरही काढण्यात आली आहे; पण समितीने या ठेकेदाराला विरोधच केला आहे.
समितीच्या अपेक्षेनुसार आणि म्हणण्यानुसार ठेकेदाराने काम करायचे आहे. ठेकेदाराचा पूर्वानुभव व वादंगामुळे समितीने कामाचे स्वरूप ठेकेदाराला दिलेले नाही, त्यामुळे काम सुरूच झालेले नाही. जन्मस्थळाच्या विकासाबाबत कोणताच ठोस निर्णय होत नाही, काम रखडलेलेच आहे, या कारणावरून अमृत पाटील व उदय सुर्वे यांनी राजीनामा दिला आहे. या सगळ्या घडामोडींवर पुरातत्व खात्याने कोणतीही हालचाल केलेली नाही, हे खरे दुखणे आहे.
थेट कामाचा आदेशच..
तीन महिन्यांपूर्वी झालेल्या समितीच्या बैठकीत सर्व सदस्यांनी पुरातत्व खात्याचे संचालक गर्गे यांच्यासोबत समितीची बैठक आयोजित करावी, अशी मागणी केली होती. या बैठकीत समितीच्या अपेक्षा, कामातील अचडणी आणि उपाय यावर चर्चा करून निर्णय घेऊ, असे समितीचे म्हणणे होते. तसे पत्रही पुरातत्व खात्याला पाठविण्यात आले; मात्र त्या पत्राला कोणतेही उत्तर न देता खात्याकडून थेट कामाला सुरुवात करा, असा आदेश आला आहे. शासन पातळीवर समितीच्या अधिकृततेवर प्रश्नचिन्ह असल्याने हे पाऊल उचलल्याचे बोलले जात आहे. मग आमचे म्हणणेच विचारात घेणार नसाल, तर तुम्हाला हवे ते करा, आम्ही लक्ष घालणार नाही, असा पवित्रा समितीने घेतला आहे.
पालकमंत्र्यांनी लक्ष घालावे
जून महिन्यात शाहू जयंतीचा दिवस जवळ आला, की विषयाला तोंड फुटते आणि पुन्हा वर्षभर रखडते, असा आजवरचा अनुभव आहे. वस्तुसंग्रहालयाचे काम कोणत्याही ठेकेदाराला देण्याऐवजी पुरातत्व खात्याकडूनच करण्यात यावे, अशी आमची मागणी आहे; पण शासन त्यासाठी तयार नाही. हा तिढा सोडविण्यासाठी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी लक्ष घालावे, अशी अपेक्षा प्रा. डॉ. जयसिंगराव पवार यांनी व्यक्त केली आहे.