कोल्हापूर : शालिनी सिनेटोनची जागा आता ‘हेरिटेज’च्या यादीत, आयुक्तांची अधिसूचना : कारभाऱ्यांचे मनसुबे उधळले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2018 11:45 AM2018-01-17T11:45:18+5:302018-01-17T11:49:39+5:30
कोल्हापुरातील रंकाळा तलावाच्या रम्य परिसरात ४७ एकरांत वसलेल्या ऐतिहासिक शालिनी सिनेटोन या स्टुडिओची जागा प्लॉट पाडून विक्री करण्याचा घाट संबंधितांकडून घातला गेला होता; पण ही जागा आता कोल्हापूर शहराच्या ऐतिहासिक वारसास्थळांच्या (हेरिटेज) यादीत समावेश करण्याबाबतची अधिसूचना मंगळवारी महापालिकेचे आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांनी काढल्याने अनेक कारभाºयांचे मनसुबे उधळले.
कोल्हापूर : कोल्हापुरातील रंकाळा तलावाच्या रम्य परिसरात ४७ एकरांत वसलेल्या ऐतिहासिक शालिनी सिनेटोन या स्टुडिओची जागा प्लॉट पाडून विक्री करण्याचा घाट संबंधितांकडून घातला गेला होता; पण ही जागा आता कोल्हापूर शहराच्या ऐतिहासिक वारसास्थळांच्या (हेरिटेज) यादीत समावेश करण्याबाबतची अधिसूचना मंगळवारी महापालिकेचे आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांनी काढल्याने अनेक कारभाऱ्यांचे मनसुबे उधळले.
कोल्हापुरातील रंकाळा तलावाच्या रम्य परिसरातील ऐतिहासिक शालिनी सिनेटोन या स्टुडिओची जागा प्लॉट पाडून विक्री करण्याचा घाट संबंधितांकडून घातला होता. त्याबाबत महापालिकेतील काही कारभाºयांनी मोठी सुपारी घेतल्याची चर्चा होती.
मराठी चित्रपट क्षेत्रातील कलाकार, तंत्रज्ञ यांनी आंदोलन करून ही जागा स्टुडिओसाठीच राखीव ठेवावी यासाठी आंदोलन केले. त्याच्या दबावापोटी संबंधितांनी १३ हजार ८०० चौरस मीटर व २० हजार चौरस मीटर असे दोन भूखंड राखीव ठेवले.
या भूखंडावर स्टुडिओचे आरक्षण कायम करावे म्हणून महापालिका प्रशासनाने महासभेसमोर प्रशासकीय प्रस्ताव ठेवला होता. तथापि, हा प्रस्ताव महासभेने एकमताने नामंजूर केला; पण त्यावेळी हा प्रस्ताव काय आहे, हे खुद्द नगरसेवकांनाच माहीत नव्हते.
कोल्हापूर शहरातील ऐतिहासिक वारसास्थळांचे जतन व संवर्धन करण्याच्या हेतूने शासन निर्णयानुसार २०१५ मध्ये कोल्हापूर शहरासाठी हेरिटेज कॉन्झर्व्हेशन कमिटी स्थापन केली आहे.
तिच्या डिसेंबर २०१६ मध्ये झालेल्या बैठकीत शालिनी सिनेटोनच्या जागेचा सिनेटोनखेरीज अन्य वापर करण्यात येऊ नये, असा निर्णय घेण्यात आलेला आहे. जून २०१७ च्या बैठकीत हेरिटेज स्थळाच्या यादीत या जागेचा समावेश करण्याबाबत शासनाला कळविण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे.
हेरिटेज कॉन्झर्व्हेशन कमिटीची बैठक गेल्या मंगळवारी (दि. ९) रोजी होऊन शालिनी सिनेटोनचे ए वॉर्ड रि.स.नं. ११०४ पैकी भूखंड क्र. ५चे क्षेत्र ६३१०.६० चौ.मी., भूखंड क्र. ६ चे क्षेत्र १६१०१.६० चौ. मी. व अॅमिनिटी स्पेस क्षेत्र ६४८१.०० चौ. मी. या क्षेत्रफळाची जागा ऐतिहासिक परिसर म्हणून ऐतिहासिक वारसा स्थळाच्या यादीत (हेरिटेज) समावेश करण्यासाठी मंजुरी देण्यात आली आहे.
त्यामुळे या जागेचा ऐतिहासिक परिसर म्हणून कोल्हापूर शहराच्या ऐतिहासिक वारसा स्थळाच्या ग्रेड-३ यादीत समावेश करण्याबाबतची अधिसूचना आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांनी मंगळवारी प्रसिद्ध केली. त्यामुळे महापालिकेत खळबळ उडाली. या अधिसूचनेमुळे अनेक कारभाऱ्यांचे मनसुबे उधळले आहेत.
तीस दिवसांत हरकती
शालिनी सिनेटोनच्या जागेचा ‘हेरिटेज’मध्ये समावेश करण्याबाबत अधिसूचना काढण्यात आली. या अधिसूचनेवर ३० दिवसांत हरकती, सूचना मागविण्यात येत आहेत. याबाबतच्या हरकती व सूचना सहायक संचालक, नगररचना, नगररचना विभाग, कोल्हापूर महानगरपालिका बागल मार्केट, दुसरा मजला, राजारामपुरी पहिली गल्ली, कोल्हापूर या कार्यालयाकडे सादर कराव्यात, असे आवाहन केले आहे.
आयुक्तांना अधिकार
कोल्हापूर शहरासाठी शासनाने ‘ड’ वर्ग विकास नियंत्रण व प्रोत्साहनात्मक नियमावली मंजूर केली आहे. ती २९ सप्टेंबर २०१६ रोजी लागू केली आहे. त्यानुसार हेरिटेज कमिटीच्या सल्ल्याने व नियमानुसार प्रक्रिया राबवून ऐतिहासिक वारसा स्थळांच्या यादीत वाढ अथवा सुधारणा करण्याचे अधिकार महापालिका आयुक्तांना देण्यात आलेले आहेत.