कोल्हापूर :‘शेकाप’ची सायकल रॅली, पेट्रोल, डिझेल दरवाढीचा निषेध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2018 11:38 AM2018-05-31T11:38:32+5:302018-05-31T11:38:32+5:30
सामान्य जनता दररोज वाढणाऱ्या पेट्रोल, डिझेलच्या दरवाढीमुळे होरपळत आहे. दरवाढ नियंत्रणात आणण्यासाठी सरकार कोणतीही उपाययोजना करत नाही, या दरवाढीविरोधात भारतीय शेतकरी कामगार पक्षाच्यावतीने शहरातील प्रमुख मार्गांवरून सायकल रॅली काढून सरकारचा तीव्र निषेध केला.
कोल्हापूर : सामान्य जनता दररोज वाढणाऱ्या पेट्रोल, डिझेलच्या दरवाढीमुळे होरपळत आहे. दरवाढ नियंत्रणात आणण्यासाठी सरकार कोणतीही उपाययोजना करत नाही, या दरवाढीविरोधात भारतीय शेतकरी कामगार पक्षाच्यावतीने शहरातील प्रमुख मार्गांवरून सायकल रॅली काढून सरकारचा तीव्र निषेध केला.
टेंबे रोड येथील शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यालय येथून दुपारी सायकल रॅलीस प्रारंभ झाला. याप्रसंगी ‘अच्छे दिन’च्या नावाने जनतेला फसविणाऱ्या मोदी व फडणवीस सरकारचा निषेध असो’, ‘खोटी जाहिरातबाजी करणाऱ्या सरकाचा निषेध असो’ अशा जोरदार घोषणा देऊन मोदी सरकारचा तीव्र निषेध करण्यात आला. बैलगाडीमध्ये मोटारसायकल ठेवून प्रतीकात्मक निषेध ही यावेळी नोंदविला.
मिरजकर तिकटी, खरी कॉर्नर, महाद्वार रोड, पापाची तिकटी, महानगरपालिका मार्ग शिवाजी चौक येथे या सायकल रॅलीची सांगता झाली. यावेळी बोलताना पक्षाचे शहर चिटणीस बाबूराव कदम म्हणाले, भाजप सरकारने निवडणुकीपूर्वी दिलेली आश्वासने फसवी निघाली आहेत.
पेट्रोल व डिझेल दरवाढीचा भडका उडाला आहे. सामान्य माणूस या भडक्यात अक्षरश: होरपळून निघाला आहे. मात्र, सरकार फक्त जाहिरातबाजी करून जनतेची फसवणूक करत आहे. या निषेधात ही सायकल रॅली काढण्यात आली आहे.
आंदोलनात संभाजी जगदाळे, टी. एस. पाटील, स्वप्निल पाटोळे, महेश चव्हाण, विश्वजित देवकर, मधुकर हरेर, संग्राम माने, सुभाष सावंत, महेश लोढे, चंद्रकांत सूर्यवंशी यांच्यासह पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.