कोल्हापूर: शिक्षक बँकेतील सत्तांतराचे ‘कोजिमाशि’त हादरे, सत्तारूढ, विरोधी गटाच्या रणनीतीत बदल
By ऑनलाइन लोकमत | Published: July 6, 2022 12:27 PM2022-07-06T12:27:21+5:302022-07-06T12:27:43+5:30
‘कोजिमाशि’मध्ये गेली १७ ते १८ वर्षे दादासाहेब लाड यांची एकहाती सत्ता आहे
राजाराम लोंढे
कोल्हापूर : प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेतील सत्तांतराचे हादरे आता ‘कोजिमाशि’ पतसंस्थेच्या राजकारणाला बसत आहेत. त्यामुळेच सत्तारूढ व विरोधी गटाने आपल्या रणनीतीमध्ये बदल केला असून, आता ताकही फुंकून पिण्यास सुरुवात झाली आहे.
शिक्षक बँकेला आर्थिक अरिष्टातून बाहेर काढत सुस्थितीत आणण्यात शिक्षक संघाचे राज्याध्यक्ष राजाराम वरुटे यांचे योगदान मोठे आहे. त्या बळावरच तेरा वर्षे सत्ता त्यांच्याकडे राहिली. कारभारावर सभासद पुन्हा सत्ता देतील, असा विश्वास त्यांना असल्याने सर्वच्या सर्व नवीन चेहरे देण्याचा प्रयोग केला. मात्र, त्यात त्यांना अपयश आले.
सुरुवातीला राजाराम वरुटे हे एकहाती सत्ता घेतील, असे वाटत असतानाच शेवटच्या टप्प्यात निवडणूक फिरवण्यात विरोधकांना यश आले. या निकालाने सत्तारूढ गटाला धक्का बसलाच; मात्र त्याचे हादरे ‘कोजिमाशि’च्या राजकारणाला बसत आहेत. ‘पुढच्यास ठेच मागला शहाणा’ याप्रमाणे आपल्या काही चुका झाल्या का? त्या दुरुस्त करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
- ‘कोजिमाशि’मध्ये गेली १७ ते १८ वर्षे दादासाहेब लाड यांची एकहाती सत्ता आहे. त्यांच्या काळात पतसंस्थेच्या उलाढालीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली, हे जरी खरे असले तरी विरोधकांनी बांधलेली मोट पाहता त्यांना सत्ता ताब्यात ठेवण्यासाठी निकराची लढाई करावी लागणार आहे.
- लाड यांनी पॅनल बांधताना तालुक्यांचा समतोल राखण्याचा प्रयत्न केला असला तरी मागील निवडणुकीतील त्यांच्यासोबत असणारे काही शिलेदार बाजूला गेले आहेत. त्याची भरपाई त्यांनी विरोधातील एका गटाला सोबत घेऊन करण्याचा प्रयत्न केला आहे.
- विरोधी आघाडी आता नाही तर कधीच नाही, या इराद्याने रिंगणात उतरली आहे. आरोप-प्रत्यारोप सुरू असले तरी शिक्षक बँकेच्या निकालाने सत्तारूढ गट सावध झाला आहे, मात्र विरोधकांनीही आपल्या रणनीतीमध्ये बदल करून आक्रमक भूमिका घेतली आहे.
आसगावकर, लाड यांच्यात अस्तित्वाची लढाई
ही निवडणूक दुरंगी होत असली तरी शिक्षक आमदार जयंत आसगावकर व दादासाहेब लाड यांच्यातच खरा सामना होत आहे. लाड यांनी थेट आसगावकर यांच्यावर हल्ला चढवला आहे. आसगावकर यांनी लाड यांचे एकेकाळचे शिलेदार प्रा. एच. आर. पाटील हे अस्त्र त्यांच्यावर सोडले आहे. त्यामुळे ‘कोजिमाशि’मध्ये आसगावकर, लाड यांची अस्तित्वाची लढाई सुरू आहे.