'शक्तिपीठ'वरून महायुतीतच दोन मार्ग; कोल्हापुरात मुश्रीफ-क्षीरसागर यांची परस्पर विरोधी भूमिका
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2025 11:44 IST2025-02-11T11:43:40+5:302025-02-11T11:44:07+5:30
कोल्हापूर : शक्तिपीठ महामार्गाला गैरसमजातून विरोध होत आहे. विकासासाठी हा मार्ग गरजेचा असून याबाबतचे गैरसमज दूर करून सर्वांना विश्वासात ...

'शक्तिपीठ'वरून महायुतीतच दोन मार्ग; कोल्हापुरात मुश्रीफ-क्षीरसागर यांची परस्पर विरोधी भूमिका
कोल्हापूर : शक्तिपीठ महामार्गाला गैरसमजातून विरोध होत आहे. विकासासाठी हा मार्ग गरजेचा असून याबाबतचे गैरसमज दूर करून सर्वांना विश्वासात घेऊन महामार्गाचा प्रश्न मार्गी लावू, असा विश्वास राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी व्यक्त केला. शक्तिपीठ महामार्गासंदर्भात क्रीडाईच्या वतीने सोमवारी ‘समज, गैरसमज, गरज’ या विषयावरील चर्चासत्रात ते बोलत होते.
आमदार क्षीरसागर म्हणाले की, जागतिक महासत्ता बनण्याच्या दृष्टीने देशाची पावले पडत असताना, यात राज्याचा वाटा महत्त्वाचा असणार आहे. राज्याचा व पर्यायाने देशाचा विकास होण्यासाठी शासन नवनवीन उपाययोजना राबवीत आहे. चांगल्या दळणवळण सुविधा निर्माण झाल्यास औद्योगिक, आयटी क्षेत्रासह पर्यटन विकासालाही चालना मिळणार आहे. या महामार्गामुळे अठरा तासांचे अंतर आठ तासांवर येणार आहे.
क्रीडाईचे अध्यक्ष के. पी. खोत म्हणाले की, राज्यात शासनाच्या वतीने करण्यात येणारा हा महामार्ग जिल्ह्याच्या विकासात मैलाचा दगड ठरणारा आहे. यामुळे जिल्ह्यात रोजगार निर्मितीसह व्यापारवाढीला चालना मिळणार आहे. या महामार्गाबाबत नागरिकांचे प्रबोधन करणे आवश्यक आहे. त्यामुळे हा महामार्ग झाल्यास कोल्हापुरात गुंतवणूक वाढीस चालना मिळू शकते.
क्रीडाई महाराष्ट्र उपाध्यक्ष विद्यानंद बेडेकर, सचिन ओसवाल, गौतम परमार, संदीप मिरजकर, संजय शेटे, श्रीकांत पोतनीस, संदीप पाटील, विश्वजित देसाई उपस्थित होते.
राजकीय रंग नको
महामार्गामुळे होणाऱ्या नुकसानापेक्षा विकास अधिक असून त्याचा फायदा स्थानिकांनाच होणार आहे. समृद्धी महामार्गाला असाच विरोध झाला. पण, यामुळे उत्तर महाराष्ट्र व विदर्भात औद्योगिक गुंतवणूक वाढली. कोल्हापूरची क्षमता असतानाही येथे प्रकल्प न झाल्याने जिल्ह्याची पीछेहाट झाली. शक्तिपीठ हा राजकीय मुद्दा न करता विकासासाठी एकत्र या, असे आवाहन आमदार क्षीरसागर यांनी केले.
बैठकीत कशावर झाली चर्चा..
- प्रकल्पात बाधित होणाऱ्यांचे प्राधान्याने पुनर्वसन किंवा त्यांना योग्य दराप्रमाणे आर्थिक मोबदला द्या.
- महामार्गाजवळ व्यापारासाठी स्थानिकांनाच प्राधान्य द्या.
- प्रकल्पाच्या कामात स्थानिक मनुष्यबळाचा वापर प्राधान्याने करा.
- महामार्गाला सेमी हायस्पीड रेल्वे मार्गाची कनेक्टिव्हिटी ठेवा.
- कोल्हापूर-शिर्डी, कोल्हापूर-गुजरात सीमा भाग जोडण्यासाठी प्रयत्न करा.
- महामार्गामध्ये नद्यांचा संगम क्षेत्र येत असल्याने पुरामुळे शेतीचे नुकसान होऊ नये याची दक्षता घ्या.
शक्तीपीठास शेतकऱ्यांचा विरोधच - हसन मुश्रीफ
कोल्हापूर : शक्तीपीठ महामार्ग कोल्हापूर जिल्ह्यातून जाणार नाही, हे आपण आधीच सांगितले आहे. त्यामुळे आधी जो लेआऊट काढला होता तो रद्द झाल्याची अधिसूचना आहे. राजेश क्षीरसागर हे शहरी भागात राहणारे आमदार आहेत, या महामार्गाला शेतकऱ्यांचा विरोधच आहे, अशा शब्दात वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी ठणकावले.
शक्ती महामार्गाबाबत शेतकऱ्यांचा गैरसमज असल्याने सर्वांना विश्वासात घेऊन महामार्गाचा प्रश्न मार्गी लावणार असल्याचे आमदार राजेश क्षीरसागर यांनी ‘क्रिडाई’ सोबतच्या बैठकीत सांगितले. याबाबत, मंत्री मुश्रीफ यांना विचारले असता, या महामार्गाला शेतकऱ्यांमधून विरोध असल्याने संबंधित अधिसूचना रद्द केलेली आहे.
अलमट्टी धरणाची उंची वाढवली जाणार नाही, याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वेळोवेळी सांगितले आहे. याबाबत, मुख्यमंत्री फडणवीस कोल्हापूर दौऱ्यावर असताना चर्चा झाली आहे. राज्य शासनाचा आक्षेप नसल्याचे पत्र आल्याचे केंद्र सरकारचे म्हणणे असेल तर आजच्या कॅबिनेटमध्ये यावर चर्चा केली जाईल. मात्र, कोणत्याही परिस्थितीत अलमट्टी धरणाची उंची वाढवू दिली जाणार नाही.