कोल्हापूर : कचऱ्यासाठी जागेकरिता शिरोली, नागाव ग्रामपंचायतींनी प्रस्ताव द्यावेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2018 05:39 PM2018-07-21T17:39:13+5:302018-07-21T17:43:11+5:30
हातकणंगले तालुक्यातील शिरोली, नागाव येथे रस्त्यावरच कचरा टाकला जातो. यामुळे त्रास होत असल्याच्या भावना उद्योजकांनी जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांच्यासमोर शनिवारी व्यक्त केल्या. त्यावर कचरा टाकण्यासाठी जागा मागणीचा प्रस्ताव संबंधित ग्रामपंचायतींनी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून द्यावेत, असे निर्देशही जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी दिले.
कोल्हापूर : हातकणंगले तालुक्यातील शिरोली, नागाव येथे रस्त्यावरच कचरा टाकला जातो. यामुळे त्रास होत असल्याच्या भावना उद्योजकांनी जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांच्यासमोर शनिवारी व्यक्त केल्या. त्यावर कचरा टाकण्यासाठी जागा मागणीचा प्रस्ताव संबंधित ग्रामपंचायतींनी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून द्यावेत, असे निर्देशही जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्ह्यातील ‘एमआयडीसी’मधील समस्यांवर चर्चा करण्यासाठी आयोजित ‘उद्योग मित्र’ बैठकीत ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते.
महापालिका आयुक्त डॉ. अभिजित चौधरी, जिल्हा परिषदेच्या प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी सुषमा देसाई, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) राजेंद्र भालेराव, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक एस. बी. शेळके, स्मॅकचे अध्यक्ष राजू पाटील, आदींची प्रमुख उपस्थिती होती.
बैठकीत जिल्ह्यातील सर्व ‘एमआयडीसी’मधील अडचणी व विविध प्रश्नांचा आढावा घेण्यात आला. यामध्ये अंतर्गत रस्त्यांची स्थिती, ‘ईएसआय’ हॉस्पिटल, आदी प्रश्नांवर चर्चा झाली. तसेच शिरोली एमआयडीसीमधील उद्योजकांनी शिरोली व नागाव येथे रस्त्यावरच कचरा टाकला जात असल्याने त्रास होत असल्याचे निदर्शनास आणून दिले.
यावर काही तरी मार्ग काढावा, असे सांगितले. यावर जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित ग्रामपंचायतींच्या ग्रामविकास अधिकाऱ्यांना याबाबत विचारणा करून गावात उपलब्ध जागा आहे का अशी विचारणा केली. त्यावर गायरानाची जागा शिल्लक असल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात आले.
जागा उपलब्ध असेल तर कचरा टाकण्यासाठी जागा मागणीचा प्रस्ताव आपल्याकडे सादर करावा, असे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागाला दिले.
यावेळी ‘एमआयडीसी’, सार्वजनिक बांधकाम विभाग, महावितरण, जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांसह जिल्ह्यातील विविध एमआयडीसीचे पदाधिकारी व उद्योजक उपस्थित होते.