कोल्हापूर : लक्ष्मीपुरीतील रस्त्यांसाठी शिवसेना रस्त्यावर, रास्ता रोको
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2019 04:10 PM2019-01-14T16:10:01+5:302019-01-14T16:13:40+5:30
कोल्हापूर येथील लक्ष्मीपुरी बाजारपेठ व परिसरातील रस्त्यांची गेल्या ३० वर्षांत डागडुजी केली नसल्याने या रस्त्यांची चाळण झाली आहे. त्यामुळे संतप्त शिवसैनिक आणि व्यापाऱ्यांनी सोमवारी दुपारी महापालिका प्रशासनाचा निषेध नोंदवत लक्ष्मीपुरीतील मुख्य रस्त्यावर सुमारे अर्धा तास रस्ता रोको आंदोलन केले. गजबजलेल्या भर वस्तीत हे आंदोलन झाल्याने वाहतुकीची मोठी कोंडी झाली होती. आंदोलनाचे नेतृत्व आमदार राजेश क्षीरसागर यांनी केले.
कोल्हापूर : येथील लक्ष्मीपुरी बाजारपेठ व परिसरातील रस्त्यांची गेल्या ३० वर्षांत डागडुजी केली नसल्याने या रस्त्यांची चाळण झाली आहे. त्यामुळे संतप्त शिवसैनिक आणि व्यापाऱ्यांनी सोमवारी दुपारी महापालिका प्रशासनाचा निषेध नोंदवत लक्ष्मीपुरीतील मुख्य रस्त्यावर सुमारे अर्धा तास रस्ता रोको आंदोलन केले. गजबजलेल्या भर वस्तीत हे आंदोलन झाल्याने वाहतुकीची मोठी कोंडी झाली होती. आंदोलनाचे नेतृत्व आमदार राजेश क्षीरसागर यांनी केले.
शहराच्या मध्यवर्ती भागात असणाऱ्या लक्ष्मीपुरी बाजारपेठ, तसेच परिसरातील रस्त्यांची चाळण झाली आहे. परिसरात व्यापारी पेठ, भाजी मंडई, कॉमर्स कॉलेज, बिंदू चौक, आदी महत्त्वाची ठिकाणे येत असून, नेहमी वर्दळीचे ठिकाण म्हणून मानले जाते.
रास्ता रोको आंदोलनानंतर आमदार राजेश क्षीरसागर यांनी महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त श्रीधर पाटणकर, शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत यांच्याशी चर्चा केली.(फोटो -दीपक जाधव)
या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडल्याने नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण होत आहे. या रस्त्यांचे गेल्या ३० वर्षांत डांबरीकरण न केल्याने, तसेच गटर्सचीही दुरवस्था झाल्याने संतप्त झालेल्या शिवसैनिक व व्यापाऱ्यांनी आंदोलनाची हाक दिली होती. यावेळी दुपारी लक्ष्मीपुरी येथील जयधवन बिल्ंिडग चौकात शिवसैनिकांनी रास्ता रोको आंदोलन केले.
यावेळी शिवसेना विजयाच्या घोषणा देताना महापालिका प्रशासनाचा निषेधही नोंदविला. यावेळी परिसरातील व्यापाऱ्यांनी रस्त्याबाबत अनेक संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या. भगवे झेंडे, गळ्यात स्कार्प घेऊन शिवसैनिक रस्त्यावर उतरले होते. सुमारे अर्धा तास या परिसरातील वाहतूक ठप्प झाली होती.
आंदोलनात, परिवहन समिती सभापती राहुल चव्हाण, माजी नगरसेवक बाळासाहेब मुधोळकर, कमलाकर किलकिले, सुनील कुराडे, अजित गायकवाड, सुरेश संकपाळ, सुनील खोत, सुशील कोरडे, रियाज कवठेकर, विशाल पाटील, पूजा भोर, पूजा कामते, सुनीता भोपळे, मुबारक बागवान, गजानन तोडकर, रवी पाटील, राजू वाली, अशोक मोरे, प्रदीप मोहिते, आदी आंदोलनात सहभागी झाले होते.
शिवसेना, व्यापाऱ्यांची महापालिकेत २१ ला बैठक
आंदोलनस्थळी महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्तश्रीधर पाटणकर, शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत, उपशहर अभियंता एस. के. माने यांनी भेट देऊन नगरोत्थान योजनेतून हा रस्ता नव्याने करण्याबाबत महापालिकेच्या सभेत ठराव केल्याचे सांगितले. त्यावेळी आमदार राजेश क्षीरसागर यांनी, फक्त आश्वासने नकोत, प्रत्यक्ष काम कधी सुरू करणार, असा जाब विचारला. त्यावेळी पाटणकर यांनी, लक्ष्मीपुरीतील व्यापारी आणि शिवसैनिक यांची सोमवारी (दि. २१) महापालिकेत आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांच्यासोबत एकत्रित बैठक घेण्याचे मान्य मान्य केले. तत्पूर्वी परिसरातील रस्ते गटर्सचा सर्व्हे करू, असेही आश्वासन दिले.