कोल्हापूर :शिवसेनेच्या भूमिकेमुळे राष्ट्रवादीचे महत्त्व वाढणार, लोकसभेचे राजकारण, विधानसभेला मात्र सेनेची होणार दमछाक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2018 01:55 PM2018-01-24T13:55:46+5:302018-01-24T14:04:08+5:30
लोकसभा व विधानसभा निवडणूक स्वबळावर लढणाच्या शिवसेनेच्या निर्णयामुळे कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारीस कमालीचे महत्त्व येणार आहे. शिवसेना एकटी असेल तर त्या पक्षाची उमेदवारी संजय मंडलिक घेण्याची शक्यता धूसर आहे. त्यामुळे ते राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारीसाठी ताकद पणाला लावतील. परिणामी विद्यमान खासदार धनंजय महाडिक व मंडलिक यांच्यात निवडणुकीपूर्वीच उमेदवारीसाठीही जोरदार रस्सीखेच होण्याची शक्यता आहे.
विश्वास पाटील
कोल्हापूर : लोकसभा व विधानसभा निवडणूक स्वबळावर लढणाच्या शिवसेनेच्या निर्णयामुळे कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारीस कमालीचे महत्त्व येणार आहे. शिवसेना एकटी असेल तर त्या पक्षाची उमेदवारी संजय मंडलिक घेण्याची शक्यता धूसर आहे. त्यामुळे ते राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारीसाठी ताकद पणाला लावतील. परिणामी विद्यमान खासदार धनंजय महाडिक व मंडलिक यांच्यात निवडणुकीपूर्वीच उमेदवारीसाठीही जोरदार रस्सीखेच होण्याची शक्यता आहे.
सद्य:स्थितीत खा. महाडिक, संजय मंडलिक व विजय देवणे अशा संभाव्य लढतीचे चित्र दिसते. कुणाचा कोणता पक्ष हे स्पष्ट व्हायला कांही कालावधी जावे लागेल. हातकणंगले मतदारसंघात भाजप व शिवसेनेची ताकदही मर्यादित असल्याने खासदार राजू शेट्टी विरोधात कोण लढणार, हीच उत्सुकता आहे.
शिवसेनेचा स्वबळाचा निर्णय विधानसभेला मात्र विद्यमान आमदारांच्या अडचणी वाढविणारा आहे. गतनिवडणुकीतही या पक्षाने स्वबळावर लढूनच सहा जागा मिळविल्या असल्या तरी यावेळेला परिस्थिती वेगळी आहे.
शिवसेना-भाजपच्या वाटा गत विधानसभा निवडणुकीतच वेगळ्या झाल्या आहेत. त्यामुळे ते आगामी लोकसभेला एकत्र येणार का हीच उत्सुकता होती; परंतु ते देखील मंगळवारी चित्र स्पष्ट झाले. दुसऱ्या बाजूला दोन्ही काँग्रेस मात्र एकत्र येण्याचीच शक्यता जास्त आहे. त्या पार्श्वभूमीवर जिल्ह्याच्या राजकारणाचा विचार करता राष्ट्रवादीच्या उमेदवारीचा तिढा पुन्हा सन २००९ प्रमाणे चिघळण्याची चिन्हे आहेत.
गत निवडणुकीत राष्ट्रवादीचे नेते आमदार हसन मुश्रीफ यांनीच धनंजय महाडिक यांना पक्षात घेऊन उमेदवारी देण्यासाठी आग्रह धरला व आता त्यांनीच महाडिक यांना बाजूला करण्यासाठी उघड मोर्चेबांधणी सुरू केली आहे. पक्षाचा विद्यमान खासदार असताना विरोधी उमेदवार मंडलिक यांच्या विजयासाठी जीवाचे रान करू, असे त्यांनी जाहीर केले. त्यामुळे पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आहेत की मुश्रीफ हेच लोकांना समजले नाही.
मुश्रीफ यांनी विरोधात घेतलेली भूमिका महाडिक यांनाही अडचणीची ठरणार आहे. सद्य:स्थिती पाहता महाडिक यांची उमेदवारी सर्वच उमेदवारांत सक्षम आहे; परंतु त्यांची राजकारणाची स्टाईल अडचणी निर्माण करणारी आहे. महाडिक सन २००४ ला शिवसेनेचे उमेदवार होते. त्यावेळी पराभव झाल्यावर दुसऱ्या दिवसापासून त्यांनी शिवसेना सोडून दिली.
पुढे सन २००९ च्या निवडणुकीत ते राष्ट्रवादीत होते परंतु आपल्याला उमेदवारी मिळाली नाही म्हटल्यावर त्यांनी उघडपणे तत्कालीन बंडखोर उमेदवार दिवंगत सदाशिवराव मंडलिक यांना ताकद देऊन संभाजीराजेंचा व पर्यायाने राष्ट्रवादीचाच पराभव केला; पण त्याच राष्ट्रवादीने त्यांना पुन्हा सन २०१४ ला उमेदवारी दिली व ते निवडून आले.
आपण निवडून येण्यात महाडिक गट, युवा शक्ती, भागिरथी महिला संस्थेच्या माध्यमातून झालेले संघटन व त्यानंतर सगळ्यात शेवटी पक्ष असा त्यांचा व्यवहार राहिला.
खासदार म्हणून विजयी झाल्यानंतर कोणत्याच निवडणुकीत ते पक्षाशी प्रामाणिक राहिलेले नाहीत. आजही त्यांची जवळीक राष्ट्रवादीपेक्षा पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील व भाजपशी जास्त आहे. लांबचे कशाला परवाच्या त्यांच्या वाढदिवसातही राष्ट्रवादी कुठेच नव्हता. मध्यंतरी तर पालकमंत्री फक्त त्यांच्या उमेदवारीची घोषणाच करायचे बाकी राहिले होते; परंतु गेल्या सहा महिन्यांत भाजप व मुख्यत: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात जनमत नकारात्मक तयार झाल्यावर महाडिक यांचेही पाय थबकले आहेत.
त्यांच्या पुढे आजही भाजपच्या उमेदवारीचा पर्याय आहेच; परंतु भाजपबद्दल पुढच्या काळात नक्की वारे कसे राहते यावर ते याचा निर्णय घेतील, असे दिसते. त्यांच्या एकूण राजकीय भूमिकेच्या दृष्टीने पाहता तो त्यांच्यासाठी सुलभ पर्याय आहे. कारण नाही तर खासदार (तेही अर्धेच) वगळता बाकी सगळे महाडिक घराणे भाजपच्या सावलीत आहेच.
सध्या तरी महाडिक क्रियाशील खासदार अशी प्रतिमा निर्माण करण्यात यशस्वी झाले आहेत. त्यांनी किती प्रश्न मांडले व त्यातील नक्की किती सुटले, हा भाग वादाचा असला तरी कोल्हापूरचा खासदार सभागृहात बोलतो, धडपड करतो, ही त्यांची जमेची बाजू आहे शिवाय त्यांचे थेट पवार व सुप्रिया सुळे यांच्याशी चांगले संबंध आहेत. त्यामुळे त्यांना बाजूला करून दुसऱ्याला म्हणजे संजय मंडलिक यांना उमेदवारी द्यायची झाली तर ती देणार कशी, हा कळीचा मुद्दा आहे.
महाडिक पुन्हा राष्ट्रवादीचे उमेदवार असतील तर काँग्रेसचे आमदार सतेज पाटील व मुश्रीफही त्यांना मदत करणार नाहीत, हे वेगळे सांगायला नको. हे दोघे व जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष पी. एन. पाटील यांच्या शब्दावरच राष्ट्रवादीची उमेदवारी ठरणार आहे.
ती सन २००९ लाही अशीच सासने मैदानातून स्व. मंडलिक यांचा अमृतमहोत्सवी सत्कार करून शरद पवार हे पी. एन. यांच्या गाडीतून बसून गेले तेव्हा ठरली होती. त्यावेळी उमेदवारी कुणाला द्यायची यापेक्षा कुणाला द्यायची नाही याचा निर्णय अगोदर झाला होता. आता दहा वर्षांनंतर राष्ट्रवादीचे राजकारण पुन्हा त्याच वळणावर आले आहे.
संजय मंडलिक यांना राष्ट्रवादीची उमेदवारी देऊन विधानसभा पक्की करण्याचा मुश्रीफ यांचा प्रयत्न आहे. त्याशिवाय राष्ट्रवादीतील वर्चस्वाचा वादही मुश्रीफ-महाडिक संघर्षाला कारणीभूत आहे. संजय मंडलिक यांचा राष्ट्रवादीने विचार केल्यास महाडिक यांना भाजपचा पर्याय आहेच; परंतु मंडलिक यांना राष्ट्रवादीने संधी न दिल्यास त्यांच्यापुढे दुसरा चांगला पर्याय नाही. एकट्या शिवसेनेच्या बळावर जिंकणे सोपे नाही. भाजपकडे ते जाऊ शकत नाहीत. मग त्यांना लोकसभा सोडून कागल विधानसभेवर लक्ष केंद्रित करावे लागेल. ते मुश्रीफ यांच्या अडचणीचे ठरेल.
विधानसभेचे गणित
जिल्ह्यांत शिवसेनेचे सहा आमदार निवडून आले. त्यामध्ये त्या पक्षाबद्दल असलेली वैचारिक बांधीलकी किंवा प्रेमापेक्षा तत्कालीन परिस्थितीत विरोधातील उमेदवारास पराभूत करायचे म्हणून जो चांगला पर्याय उपलब्ध होता तो जनतेने निवडल्याने शिवसेनेला एवढे घवघवीत यश मिळाले; परंतु ही स्थिती बदलली आहेच शिवाय भाजपही अधिक भक्कम झाला आहे. त्याचा त्रास शिवसेनेच्या विद्यमान आमदारांना होणार आहे.
राजू शेट्टी विरोधात कोण
हातकणंगले मतदार संघात सध्यातरी खासदार राजू शेट्टी यांच्या विरोधात कोण लढणार हे स्पष्ट झालेले नाही. विनय कोरेसह, कृषीराज्यमंत्री सदाभाऊ खोत, महाडिक गट,आमदार उल्हास पाटील व माजी खासदार निवेदिता माने त्यांच्या विरोधात असणार हे नक्की. आता परराष्ट्र सचिव ज्ञानेश्वर मुळे यांनाही भाजपने गळ घातली आहे परंतू ते कितपत धाडस करतात हा प्रश्र्न आहे. सगळे नेते एकत्र येवून शेट्टी यांना विरोध करतात तेव्हा त्यांचे मताधिक्य वाढते हा इतिहास व वर्तमान राहील हे स्पष्टच आहे.