कोल्हापूर : शिवाजी पूल ‘पुरातत्त्व’च्या कचाट्यातून सोडवणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2018 01:51 PM2018-05-29T13:51:24+5:302018-05-29T13:51:24+5:30

पर्यायी शिवाजी पूल पूर्णत्वासाठी वरिष्ठ पातळीवर हालचाली वेगवान झाल्या असून राज्य पुरातत्त्व विभागाच्या अधिकाऱ्यांनी ऐतिहासिक ब्रह्मपुरी टेकडीची तसेच तेथे पूर्वी उत्खनन झालेल्या जागेची पाहणी केली.

Kolhapur: Shivaji bridge will solve the problem of 'archaeologist' | कोल्हापूर : शिवाजी पूल ‘पुरातत्त्व’च्या कचाट्यातून सोडवणार

कोल्हापूर : शिवाजी पूल ‘पुरातत्त्व’च्या कचाट्यातून सोडवणार

Next
ठळक मुद्दे शिवाजी पूल ‘पुरातत्त्व’च्या कचाट्यातून सोडवणारअधिकाऱ्यांनी दिली भेट ‘ब्रह्मपुरी’ टेकडीची केली पाहणी

कोल्हापूर : पर्यायी शिवाजी पूल पूर्णत्वासाठी वरिष्ठ पातळीवर हालचाली वेगवान झाल्या असून सोमवारी राज्य पुरातत्त्व विभागाच्या अधिकाऱ्यांनी ऐतिहासिक ब्रह्मपुरी टेकडीची तसेच तेथे पूर्वी उत्खनन झालेल्या जागेची पाहणी केली.

ब्रह्मपुरी टेकडीपासून पर्यायी शिवाजी पुलाचे अंतर याचा नकाशाद्वारे अभ्यास करून तो अहवाल केंद्रीय पुरातत्त्व विभागाकडे देण्यात येणार आहे, त्यानंतरच पर्यायी पुलाच्या उर्वरित कामाला चालना मिळण्याची अपेक्षा आहे.

ब्रम्हपुरी टेकडीपासून हा पुल शंभर मीटरच्या आत येत असल्याने कायद्याने बांधकामास अडचणी आल्या आहेत परंतू प्रत्यक्षात हे अंतर शंभर मीटर पेक्षा जास्त असल्याने मुळ कायद्याच्या कचाट्यातूनच पूल बाहेर काढण्याच्या दृष्टीने हालचाली सुरु झाल्या आहेत.

पर्यायी शिवाजी पुलाचे बांधकाम पूर्ण करताना ‘पुरातत्त्व’अडचण आल्याने पुलाचे उर्वरित २० टक्के काम गेली तीन वर्षे रेंगाळले आहे. ‘प्राचीन कोल्हापूरचा इतिहास’ या ब्रह्मपुरी टेकडीखाली असल्याने त्या ठिकाणी उत्खननात पुरातत्त्व अवशेष आढळून आले आहेत.

त्यामुळे या ब्रह्मपुरी टेकडीला विशेष महत्व आहे. त्यामुळे टेकडीपासून सुमारे १०० मीटर परिसरात उत्खननास बंदी आहे. त्याचा आधार घेत ८० टक्के काम पूर्ण झालेल्या पर्यायी शिवाजी पुलास ‘पुरातत्त्व’च्या नियमाचा अडथळा आला आहे.

पूल पूर्ण करण्यासाठी पुरातत्त्व कायद्यात काहीअंशी बदल करण्याबाबत लोकसभेत विधेयक मंजूर झाले, पण ते राज्यसभेत अडकल्याने पुलाचे काम पुन्हा रेंगाळले.

याबाबत पोलीस अधीक्षक संजय मोहिते, निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे यांनी ‘पुरातत्त्व’ विभागाच्या मुंबई कार्यालयाशी पाठपुरावा सुरू ठेवला आहे. त्या पार्श्वभूमीवर सोमवारी सकाळी राज्य पुरातत्त्व विभागाच्या मुंबई कार्यालयातील दोन अधिकारी कोल्हापुरात दाखल झाले.

सकाळी १० वाजता शासकीय विश्रामगृहावर पोलीस अधीक्षक मोहिते, निवासी उपजिल्हाधिकारी शिंदे, राष्ट्रीय  महामार्ग विभागाचे कार्यकारी अभियंता व्ही. आर. कांडगावे, कोल्हापूर जिल्हा पुरातत्त्व जतन समितीच्या अध्यक्ष अमरजा निंबाळकर तसेच राज्य पुरातत्त्व विभागाचे दोन अधिकारी यांची एकत्रित सुमारे तासभर बंद खोलीत बैठक झाली.

त्यावेळी पुरातन ब्रह्मपुरी टेकडीचे पुरातन महत्त्व, पर्यायी शिवाजी पुलाच्या बांधकामाचे अंतर यांची नकाशाद्वारे तपासणी केली. त्यानंतर हे पथक पुरातन ब्रह्मपुरी टेकडीवर जाऊन सन १९४५-४६ मध्ये पुण्याच्या डेक्कन कॉलेजच्यावतीने उत्खनन केलेल्या जागेची पाहणी केली.

सुमारे तासभर पाहणी व चर्चेनंतर या पथकाने महापालिकेत जाऊन आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला, पण आयुक्त उपस्थित नसल्याने विनाचर्चा ते पुन्हा ब्रह्मपुरी टेकडीवर येऊन त्यांनी टेकडीच्या पुरातन वास्तूचा अभ्यास केला. प्राचीन ब्रह्मपुरी टेकडीचे नकाशाद्वारे पुलापासूनचे अंतर हे १०० मीटरपेक्षा जादा असल्याचे अमरजा निंबाळकर यांनी पुरातत्त्व विभागाच्या अधिकाऱ्याच्या निदर्शनास आणून दिले.

दोन दिवसांत अहवाल केंद्रीय पुरातत्त्वकडे

राज्य पुरातत्त्व विभागाच्या अधिकाऱ्यानी केलेल्या पाहणीनंतर तातडीने त्याचा अहवाल करून तो दोनच दिवसांत केंद्रीय पुरातत्त्व विभाग कार्यालयाकडे पाठविण्यात येणार आहे. त्यानंतर पर्यायी पुलासाठी मार्ग निघण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

पाहणी दौऱ्यात कमालीची गोपनीयता

राज्य पुरातत्त्व विभागाच्या अधिकाऱ्याच्या कोल्हापूर दौऱ्याबाबत कमालीची गोपनीयता बाळगण्यात आली होती. पुरातत्व विभागाच्या पाहणी केलेल्या दोन अधिकाऱ्यांच्या नावाबाबतही गुप्तता पाळली होती. पुलाचे बांधकाम गतीने सुरु असताना त्यामध्ये कोणी विघ्न आणू नये यासाठी ही गोपनीयता बाळगण्यात आली.

 

Web Title: Kolhapur: Shivaji bridge will solve the problem of 'archaeologist'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.