कोल्हापूर शिवाजी पेठेतील ‘पद्माराजे’त युद्धकला केंद्र नकोच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 10, 2017 12:55 AM2017-11-10T00:55:49+5:302017-11-10T00:57:24+5:30
कोल्हापूर : शिवाजी पेठेतील पद्माराजे उद्यानात युद्धकला प्रशिक्षण केंद्र उभारण्याचा घाट घातला जात असून, त्याला आमचा विरोधच राहील. उद्यान हे उद्यानच राहू दे. उलट मिळणारा निधी हा उद्यानाच्या विकासावर करण्यात यावा, अशा मागणीचे निवेदन राजे संभाजी तरुण मंडळाच्यावतीने गुरुवारी महानगरपालिका महापौर हसिना फरास व आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांना देण्यात आले.
मोठ्या संख्येने महिला व लहान मुलांचा समावेश असलेले शिवाजी पेठेतील नागरिकांचे एक शिष्टमंडळ गुरुवारी सायंकाळी महानगरपालिका आयुक्त चौधरी यांना भेटले. त्यानंतर त्यांनी महापौर फरास यांचीही स्वतंत्र भेट घेतली. लहान मुलांनी निवेदन व गुलाबपुष्प आयुक्तांना दिले.
रंकाळा तलावाला लागून असलेले पद्माराजे उद्यान गेल्या ७२ वर्षांपासून आहे. तलावावर होणाºया स्थलांतरित व स्थानिक पक्ष्यांची घरे या उद्यानात आहेत. बागेत जुने वृक्ष पर्यावरणाचा समतोल साधत आहेत. भागातील नागरिकांना फिरण्यासाठी उद्यानाचा उपयोग होतो. उद्यानाचा वापर हास्य क्लब, योगासने, ओपन जीम याबरोबरच खेळण्यासाठी लहान मुले वापर करतात.
नागरिकांच्या आरोग्याच्यादृष्टीने हे उद्यान जपणे जरुरीचे आहे. उद्यानाच्या स्वरूपात बदल करून युद्धकला प्रशिक्षण केंद्र उभारणे म्हणजे शांततामय जीवनाशी प्रतारणा केल्यासारखे आहे. नवीन उद्याने जागेअभावी व निधीअभावी होऊ शकत नाहीत, किमान जुनी उद्याने तरी राहू देत, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.नागरिकांचे म्हणणे ऐकून घेतल्याशिवाय कोणताही निर्णय घेतला जाणार नाही, अशी ग्वाही चौधरी यांनी शिष्टमंडळाला दिली.
शिष्टमंडळात माजी नगरसेवक इंद्रजित बोंद्रे, विकास जाधव, दिलीप कदम, शरद तांबट, रसिका तांबट, मीनाक्षी सरनाईक, शकुंतला सरनाईक, आनंदीबाई चव्हाण, सुप्रिया सासने, प्रियांका सासने, माधुरी चव्हाण, शीला हराळे, अर्चना पोवार, सविता जाधव, माधुरी तांबट, दीपा गवळी, सारिका सुतार, मीना सासने, अश्विनी सासने, जयश्री चव्हाण, मुरलीधर चव्हाण, सुवर्णा चव्हाण, संपदा पाटील, दीपा जाधव, मिलिंद चव्हाण, सोनाबाई पोवार, वैशाली जाधव यांचा समावेश होता.
कोल्हापुरातील शिवाजी पेठेतील पद्माराजे उद्यानाची जपणूक केली जावी, अशा मागणीचे निवेदन गुलाबपुष्पासह महिला व लहान मुलांनी महापालिका आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांना गुरुवारी दिले.