ऑलिम्पिक स्पर्धेसाठी कोल्हापूरचा नेमबाज स्वप्नील कुसाळे पात्र
By संदीप आडनाईक | Published: June 11, 2024 11:17 PM2024-06-11T23:17:57+5:302024-06-11T23:18:07+5:30
स्वप्नील हा राधानगरी तालुक्यातील कांबळवाडीचा सुपुत्र आहे.
कोल्हापूर : पॅरिस येथे होणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धेसाठी रायफल शूटिंग प्रकारात पात्रता फेरीत कोल्हापूरचा नेमबाज स्वप्नील सुरेश कुसाळे पात्र ठरला आहे. राज्य, राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेत त्याने यापूर्वीच चमकदार कामगिरी केली होती. २०२० मध्ये झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत राखीव कोट्यातून त्याची संधी थोडक्यात हुकली होती. यावर्षी होणाऱ्या पॅरिसच्या ऑलिम्पिक स्पर्धेसाठी स्वप्नील पात्र ठरल्यामुळे त्याचे या स्पर्धेत खेळण्याचे स्वप्न पूर्ण होत आहे.
स्वप्नील हा राधानगरी तालुक्यातील कांबळवाडीचा सुपुत्र आहे. यापूर्वी त्याने विश्वचषक नेमबाजी स्पर्धेत रौप्यपदकांची कमाई केली आहे. आंतरराष्ट्रीय नेमबाज असलेला स्वप्नील प्राथमिक शिक्षक सुरेश कुसाळे यांचा पुत्र आहे. सध्या तो पुण्यात रेल्वेमध्ये टीसी म्हणून कार्यरत आहे. विश्वचषक स्पर्धेतील त्याच्या कामगिरीचा २०२४च्या पॅरिस येथे होणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धेसाठी पात्रता फेरीतील निवडीसाठी फायदा झाला. स्वप्नीलच्या या निवडीमुळे कांबळवाडी गाव आता जगाच्या नकाशावर आले आहे.
स्वप्नीलचे प्राथमिक शिक्षण कांबळवाडी गावातील प्राथमिक शाळेत आणि पाचवी ते सातवीपर्यंतचे शिक्षण भोगावती साखर कारखान्याच्या पब्लिक स्कूलमध्ये इंग्रजी माध्यमातून झाले. नाशिकच्या भोसला मिलिटरी अकॅडमीत शिक्षण घेताना स्वप्नीलने तेथेच नेमबाजीचा सराव केला. त्याने राज्यासह, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील अनेक नेमबाजी स्पर्धेत पदक मिळविले आहे.