कोल्हापूरने राष्ट्रीय ‘रोल मॉडेल’ बनावे : भूषण पटवर्धन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 7, 2020 01:30 AM2020-02-07T01:30:00+5:302020-02-07T01:32:45+5:30
डॉ. पटवर्धन म्हणाले, कोल्हापूर हे शहर माझ्या दृष्टीने भारतातील रोल मॉडेल शहर आहे. मला या शहराबद्दल खूप प्रेम आहे. कोल्हापूर म्हटले की, अंबाबाई, कुस्ती, दूधदुभतं, रंकाळा आणि दिलदार माणसे आठवतात.
कोल्हापूर : तथाकथित विकासाच्या गदारोळात मोठ्या-मोठ्या शहरांनी आपली ओळख हरविली आहे. मात्र, कोल्हापूरकरांनी आपल्या शहराची ओळख कायम राखली आहे. खरा भारत हा खेड्यांत आणि कोल्हापूरसारख्या शहरांमध्ये वसला आहे. त्यामुळे कोल्हापूर हे राष्ट्रीय स्तरावर एक रोल मॉडेल म्हणून पुढे यायला पाहिजे. अन्य शहरांनी विकासासाठी कोल्हापूरचे अनुकरण केले पाहिजे, असे प्रतिपादन विद्यापीठ अनुदान आयोगाचे (युजीसी) उपाध्यक्ष डॉ. भूषण पटवर्धन यांनी गुरुवारी येथे केले. उत्साही वातावरणात शिवाजी विद्यापीठाचा ५६ व्या दीक्षान्त समारंभ उत्साहात पार पडला. त्यामध्ये यंदा सर्वाधिक ६० हजार स्नातकांना पदव्या प्रदान करण्यात आल्या.
विद्यापीठाच्या दीक्षान्त समारंभामध्ये प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. राजमाता जिजाऊसाहेब बहुउद्देशीय सभागृहातील या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी होते. त्यांच्या हस्ते विद्यापीठाच्या सर्वसाधारण कौशल्यासाठीचे सन २०१९-२०२० चे राष्ट्रपती सुवर्णपदक कोल्हापूरच्या अभिषेक दादासाहेब श्रीराम याला आणि एम. ए. संस्कृत विषयात सर्वाधिक गुण मिळविल्याबद्दल कुलपती पदक हे सातारा येथील कीर्ती दत्तात्रय ननवरे हिला प्रदान करण्यात आले. डॉ. पटवर्धन म्हणाले, कोल्हापूर हे शहर माझ्या दृष्टीने भारतातील रोल मॉडेल शहर आहे. मला या शहराबद्दल खूप प्रेम आहे. कोल्हापूर म्हटले की, अंबाबाई, कुस्ती, दूधदुभतं, रंकाळा आणि दिलदार माणसे आठवतात.
ही कोल्हापूरची परंपरा असून येथील लोकांनी या शहराची ओळख दमदारपणे टिकवून ठेवली आहे. नवा भारत घडविण्यासाठी नव्या शिक्षणप्रणालीची, पद्धतीची गरज आहे. मॅकॉलिझमची ‘कुलगुरू’ नव्हे, तर गुरुकुल व्यवस्थेकडे पुन्हा जाण्याची, आणि सध्याच्या शैक्षणिक प्रणालीच्या पुनर्विचाराची आवश्यकता आहे. महात्मा गांधी यांची ‘बुनियादी शिक्षण’प्रणाली घेऊन भविष्यातील शिक्षण दिले पाहिजे. शिक्षकांनी शिक्षण देणे ही आपली मक्तेदारी मानू नये. त्यांनी विद्यार्थिकेंद्रित शिक्षणाचा ध्यास घ्यावा. भविष्यातील शिक्षण हे नवीन रोजगार, नोकरीच्या संधी निर्माण करणारे असावे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी म्हणाले, आई, मातृभाषा, भारतमाता आणि प्रकृतिमाता (पर्यावरण) यांचा प्रत्येकाने आदर राखावा. विद्यार्थ्यांनी जीवनात उच्च ध्येय ठेवून ते साध्य करण्यासाठी जिद्द, कष्टांनी कार्यरत राहावे.
या कार्यक्रमाच्या प्रारंभी परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे प्रभारी संचालक जी. आर. पळसे हे दीक्षान्त मिरवणुकीने ज्ञानदंड घेऊन कार्यक्रमस्थळी आले. यावेळी जिल्हाधिकारी दौलत देसाई, महापालिकेचे आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ डॉ. शिवराम भोजे, अर्थतज्ज्ञ जे. एफ. पाटील, बी. पी. साबळे, डॉ. शिंपा शर्मा, आदी उपस्थित होते. कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांनी वार्षिक अहवाल वाचन केले. प्र-कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के यांनी पाहुण्यांची ओळख करून दिली. तृप्ती करेकट्टी, नंदिनी पाटील, सुस्मिता खुराळे, श्रद्धा निर्मळे, धैर्यशील यादव यांनी सूत्रसंचालन केले. कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर यांनी आभार मानले.
राष्ट्रपतिपदापर्यंतची संधी, प्रयत्न तर करा : राज्यपाल
हायस्कूलला जाईपर्यंत पायांत चप्पल नसलेली, स्वयंपाकही स्वत: करणारी माझ्यासारखी व्यक्ती राज्यपाल; तर चहा विकणारी व्यक्ती पंतप्रधान होते; ते केवळ शिक्षण, कष्ट आणि चांगल्या मार्गामुळे शक्य झाले. तुम्ही तर आता चहाही विकत नाही आणि विनाचप्पल चालत नाही. त्यामुळे तुम्हाला तर राष्ट्रपतिपदापर्यंतची संधी आहे. प्रयत्न करून तरी बघा, असे आवाहन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी विद्यार्थ्यांना केले.
भूषण पटवर्धन म्हणाले
- जीसीकडून नॅशनल अकॅडेमिक क्रेडिट बँक, सेमिस्टर आउटरिच प्रोग्रॅमचे पाऊल.
- च्ष्ट्रीय शैक्षणिक धोरणात एक भारतकेंद्रित शिक्षणप्रणालीची कल्पना.
- शिक्षकांनी स्वत:ला आदर्श व्यक्तिमत्त्व म्हणून सादर करावे.
- शैक्षणिक परिसराचे रूपांतर बौद्धिक अथवा राजकीय कारणासाठी होऊ नये.
- शिक्षकांनी विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी प्रेरित करावे. त्यांना राजकारण्यांच्या हातातील कठपुतळ्या बनण्यापासून रोखावे.