कोल्हापूरकरांनी मोर्चात भाग घ्यावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2017 12:51 AM2017-02-13T00:51:57+5:302017-02-13T00:51:57+5:30

येल्लूरकरांचे आवाहन : मराठा महासंघातर्फे गुरुवारी बेळगावात मराठा क्रांती मोर्चा

Kolhapur should participate in the march | कोल्हापूरकरांनी मोर्चात भाग घ्यावा

कोल्हापूरकरांनी मोर्चात भाग घ्यावा

Next



कोल्हापूर : ज्या-ज्या वेळी बेळगावमधील मराठी माणसांवर अत्याचार झाला, त्या-त्या वेळी कोल्हापूरवासीय मराठ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहिले. त्यामुळे गुरुवारी (दि. १६) होणाऱ्या बेळगाव मराठा क्रांती (मूक) मोर्चामध्ये कोल्हापूरकरांनी मोठ्या प्रमाणात सहभागी होऊन साथ द्यावी, असे आवाहन बेळगावचे माजी नगरसेवक अ‍ॅड. अमर यल्लूरकर यांनी रविवारी कोल्हापुरात केले.
ते बेळगाव मराठा क्रांती (मूक) मोर्चाच्या पार्श्वभूमीवर अखिल भारतीय मराठा महासंघातर्फे आयोजित केलेल्या मराठा मेळाव्यात बोलत होते. अध्यक्षस्थानी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे माजी अध्यक्ष अ‍ॅड. गुलाबराव घोरपडे होते.
यावेळी अखिल भारतीय मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष वसंतराव मुळीक, बेळगावचे माजी नगरसेवक नेताजी जाधव, मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे सदस्य जयराम मिरजकर, कोल्हापूर महापालिकेच्या स्थायी समितीचे नूतन सभापती डॉ. संदीप नेजदार, आदींची प्रमुख उपस्थिती होती. शाहू स्मारक भवनात हा मेळावा झाला.
अ‍ॅड. अमर यल्लूरकर म्हणाले, भारतीय राज्यघटनेने प्रत्येक नागरिकाला मूलभूत अधिकार दिले आहेत; पण या मूलभूत अधिकारांची अंमलबजावणी कर्नाटक सरकार करीत नाही. या मूलभूत अधिकारांपासून बेळगावमधील नागरिकांना सातत्याने वंचित ठेवले जाते. सीमाप्रश्नात तर विशेषत: कोल्हापूरकरांनी चांगली साथ दिली आहे. तरी पण कर्नाटक सरकारकडून जुलूमशाही पद्धतीने मराठा बांधवांवर अत्याचार सुरू आहेत. ‘मी बेळगावचा, बेळगाव महाराष्ट्राचे’ अशी टोपी परिधान करून एक मराठा बांधव व्यवसाय करीत बसला होता. या प्रकाराबद्दल येथील पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन अटक केली. अशा प्रकारे मराठी माणसांवर अत्याचार होत आहेत. तसेच शिक्षण व नोकरीत मराठ्यांना आरक्षण मिळण्यासाठी बेळगाव मराठा क्रांती (मूक) मोर्चात कोल्हापूरकरांनी सहभागी व्हावे. जयराम मिरजकर म्हणाले, कोल्हापूरकरांनी महाराष्ट्र-कर्नाटक सीमालढ्यात चांगली भूमिका निभावली आहे. त्यामुळे मराठा मोर्चात सहभागी व्हावे. व्इणासंतराव मुळीक म्हणाले, मराठा भवन जागेसाठी महापालिकेकडे प्रस्ताव पाठविला आहे. तो मंजूर करावा. बेळगाव व कोल्हापूर हे दोघे सख्खे भाऊ आहेत; त्यामुळे शिस्तबद्ध व स्वयंशिस्त होणाऱ्या मोर्चात सर्वांनी सहभागी व्हावे. मेळाव्यास डॉ. संदीप नेजदार, कोल्हापूर चेंबर आॅफ इंडस्ट्रीज अ‍ॅँड कॉमर्सचे संचालक रमेश कार्वेकर, ‘स्मॅक’चे संचालक उदय साळोखे, सुजित चव्हाण, अजित राऊत, शैलजा भोसले, शंकरराव शेळके, चंद्रकांत चव्हाण, माजी नगरसेवक उदय जगताप, सुनीलकुमार सरनाईक, संभाजी जगदाळे, महादेव पाटील, प्रकाश पाटील उपस्थित होते. दरम्यान, या मेळाव्यानंतर वधू-वर मेळावा झाला. (प्रतिनिधी)
चंद्रकांतदादांनी
लक्ष घालावे
महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नात समिती समन्वयक व कोल्हापूरचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी, स्वत: लक्ष घालून हा प्रश्न सोडवावा व मराठा बांधवांना न्याय द्यावा, अशी भावना व्यक्त करण्यात आली.

Web Title: Kolhapur should participate in the march

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.