सहा जिल्ह्यांची सैन्य भरती ६ डिसेंबरपासून कोल्हापूरात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 13, 2018 04:26 PM2018-11-13T16:26:37+5:302018-11-13T16:28:53+5:30
कोल्हापूरसह सांगली, सातारा, सोलापूर, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी या सहा जिल्हे व गोवा राज्यातील पणजी आणि मडगावसाठी ६ते १६ डिसेंबर या कालावधीत शिवाजी विद्यापीठाच्या मैदानावर सैन्य भरती मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.या भरतीच्या अनुषंगाने सर्व शासकीय-निमशासकीय यंत्रणांनी समन्वयाने काम करावे, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे यांनी मंगळवारी येथे केले.
कोल्हापूर : कोल्हापूरसह सांगली, सातारा, सोलापूर, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी या सहा जिल्हे व गोवा राज्यातील पणजी आणि मडगावसाठी ६ते १६ डिसेंबर या कालावधीत शिवाजी विद्यापीठाच्या मैदानावर सैन्य भरती मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.या भरतीच्या अनुषंगाने सर्व शासकीय-निमशासकीय यंत्रणांनी समन्वयाने काम करावे, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे यांनी मंगळवारी येथे केले.
जिल्हाधिकारी कार्यालयात सैन्य भरती मेळाव्याच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी आयोजित बैठकीत ते अध्यक्षस्थानावरुन बोलत होते. यावेळी सैन्य भरती अधिकारी कर्नल अनुराग सक्सेना, डॉ.मेजर गौरव, शिवाजी विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. विलास नांदिवडेकर,तहसिलदार गुरू बिराजदार,जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मेजर सुभाष सासणे,पोलीस निरीक्षक औंदुबर पाटील, महापालिका आरोग्य विभागाचे मुख्य आरोग्य निरीक्षक डॉ. विजय पाटील आदी प्रमुख उपस्थित होते.
निवासी उपजिल्हाधिकारी शिंदे यांनी या भरतीमध्ये आतापर्यंत ३८ हजार तरुणांनी आॅनलाईन नोंदणी केली असून नोंदणीची २० नोव्हेंबर ही अंतिम तारीख आहे. सैन्य भरतीची प्रक्रीया सुरळीत, शांततेत आणि सुव्यवस्थेत पार पडावी, यादृष्टीने सर्व संबंधित यंत्रणांनी परस्पर समन्वय ठेवून, त्यांना दिलेल्या जबाबदाऱ्या चोखपणे पार पाडाव्यात, यामध्ये कसल्याही प्रकारे हयगय होणार नाही याची दक्षता घ्या, असा इशारा दिला.
भरती मेळाव्याच्या ठिकाणी बॅरेकेटींग, पोलीस बंदोबस्त, वाहतूक व्यवस्था, आरोग्य, स्वच्छता, वीज पुरवठा, पिण्याचे पाणी, शौचालये, भरती उमेदवारांसाठी अधिकाऱ्यांची निवास व्यवस्था तसेच याप्रसंगी उपस्थित राहणाऱ्या उमेदवारांसाठी आवश्यकतेनुसार एस. टी. तसेच के. एम. टीची बस सुविधा उपलब्ध करुन देण्याची सूचनाही त्यांनी केली. सैन्य भरतीसाठी येणाऱ्यांसाठी फुड पॅकेटस, बिस्किटे, शामियाना उभारणी, बॅरेकेटींग अशा आवश्यक व्यवस्थेसाठी दानशूर व्यक्ती व संस्थांनी मदत करावी , असे आवाहन सुभाष सासने यांनी केले.