कोल्हापूर : सोळा हजार माध्यमिक शिक्षक उद्यापासून संपावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 6, 2018 01:55 PM2018-08-06T13:55:18+5:302018-08-06T14:01:16+5:30
राज्य सरकारी, निमसरकारी कर्मचारी संघटना समन्वय समितीच्या वतीने उद्या, मंगळवारपासून पुकारलेल्या संपात जिल्ह्यातील सरकारी अनुदान घेणाऱ्या सर्व प्रकारच्या माध्यमिक शाळांनी पाठिंबा दिला आहे.
कोल्हापूर : राज्य सरकारी, निमसरकारी कर्मचारी संघटना समन्वय समितीच्या वतीने उद्या, मंगळवारपासून पुकारलेल्या संपात जिल्ह्यातील सरकारी अनुदान घेणाऱ्या सर्व प्रकारच्या माध्यमिक शाळांनी पाठिंबा दिला आहे. जिल्ह्यातील ८३० माध्यमिक शाळांतील सुमारे सोळा हजार शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी संपात सहभागी होणार असल्याची माहिती शिक्षक नेते दादासाहेब लाड यांनी दिली.
दादासाहेब लाड म्हणाले, केवळ सातव्या वेतन आयोगासाठी आमचे आंदोलन नाही. त्याशिवाय अनेक प्रश्नांनी माध्यमिक शिक्षण क्षेत्राला ग्रासले आहे. त्यांच्या सोडवणुकीसाठी संपात सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत प्रत्येक शाळेत जागृती करणार आहे.
मुख्याध्यापक संघाचे सचिव दत्ता पाटील म्हणाले, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना निवडणुकीच्या संदर्भातील बी. एल. ओ. किंवा तत्सम कामे लावू नयेत, २० टक्के अनुदानावरील शाळांना १०० टक्के अनुदान तत्काळ द्यावे, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची भरती करण्यास पूर्वीप्रमाणे परवानगी द्यावी, १२ टक्के वेतनेतर अनुदान शाळांना मिळावे, अंशदायी पेन्शन योजना रद्द करून जुनी योजना लागू करावी, कला व क्रीडाशिक्षकांची भरती सुरू करावी, अशा विविध मागण्यांसाठी शिक्षक रस्त्यांवर उतरणार आहेत.
विलास साठे म्हणाले, १९७८ ला अशा प्रकारचा संप झाला होता. सरकार संप फोडायचा प्रयत्न करीत आहे; पण आता नाही तर कधीच मिळणार नसल्याने शिक्षकांनी ताकदीने या संपात सहभागी व्हावे. बाबा पाटील, बी. एस. खामकर, सुरेश खोत, पंडित पोवार, बी. डी. पाटील, राजेंद्र रानमाळे, बी. डी. पाटील, आदी उपस्थित होते.
टाऊन हॉल येथून फेरी
कोल्हापूर शहर व करवीर तालुक्यातील शिक्षक टाऊन हॉल येथून शिवाजी चौकमार्गे बिंदू चौकापर्यंत फेरी काढणार आहेत. जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देणार असून प्रत्येक तालुक्यात अशा प्रकारे तहसीलदारांना निवेदन दिले जाईल, असे राजेश वरक यांनी सांगितले.