कोल्हापूर दक्षिण मतदारसंघातूनमहाडिकांच्या घरात चार झेंडे

By admin | Published: September 20, 2014 12:14 AM2014-09-20T00:14:12+5:302014-09-20T00:26:23+5:30

राजकारण नव्या वळणावर : महाडिकांंची उमेदवारी ही काँग्रेसची डोकेदुखी

Kolhapur South constituency has four flags in the house of mahadis | कोल्हापूर दक्षिण मतदारसंघातूनमहाडिकांच्या घरात चार झेंडे

कोल्हापूर दक्षिण मतदारसंघातूनमहाडिकांच्या घरात चार झेंडे

Next

विश्वास पाटील - कोल्हापूर -कोल्हापूर दक्षिण मतदारसंघातून भाजपतर्फे अमल महाडिक रिंगणात उतरल्यास जिल्ह्याच्या राजकारणात पुन्हा उलथापालथ होण्याची चिन्हे आहेत. त्यांच्या उमेदवारीने काँग्रेसच्या उमेदवारांची डोकेदुखी वाढू शकते. त्याचे पडसाद कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध संघाच्या (गोकुळ) निवडणुकीतही उमटू शकतात. महाराष्ट्रात यापूर्वी १९९५ला जेव्हा शिवसेना-भाजपची लाट आली तेव्हाही आमदार महादेवराव महाडिक यांनी शिवसेनेला पाठिंबा दिला होता व जिल्ह्यातून काँग्रेस नेस्तनाबूत करण्याची घोषणा केली होती. वीस वर्षांनंतर राजकारण पुन्हा त्याच वळणावर आले आहे.
आमदार महाडिक यांच्या राजकारणाला कधीच निष्ठेचा पाया नसतो. ‘पक्षामुळे मी नव्हे तर माझ्यामुळे पक्ष आहे’ असा त्यांचा अविर्भाव असतो. त्यांना जे वाटते तसे राजकारण ते करत आले आहेत. त्यामुळेच त्यांनीच ज्यांना राजकारणात मोठे केले, असे नेते पदावरून दूर झाल्यावर त्यांच्या विरोधात गेल्याची अनेक उदाहरणे आहेत. काल आपण काय राजकारण केले हे ते आज लक्षात ठेवत नाहीत व त्याचा उद्यावर काय परिणाम होईल याची फिकीर ते बाळगत नाहीत. त्यामुळेच लोकसभेला सतेज पाटील गटाची मदत घेऊन कसेबसे शंभर-सव्वाशे दिवस होण्याच्या आतच त्यांनी आता त्यांच्याच विरोधात दंड थोपटले आहेत.
अमल महाडिक यांची भाजपची उमेदवारी निश्चित झाल्यास ‘कोल्हापूर उत्तर’चे राजकारण बदलणार आहे. कारण तिथे काँग्रेसकडून महाडिक यांचे भाचे नगरसेवक सत्यजित कदम यांच्या उमेदवारीचा गुंता वाढू शकतो. शिवसेना-भाजप, स्वाभिमानी शेतकरी संघटना व महाडिक गट एकत्रित आल्यास त्याचा जिल्ह्यातील इतर मतदारसंघांतील राजकारणावरही परिणाम होणार आहे. केंद्रात भाजपचे सरकार आल्यानंतर राज्यातही महायुतीच्या बाजूने वारे वाहू लागले आहे. भाजपचे अध्यक्ष अमित शहा व नितीन गडकरी यांना भेटण्यासाठी विमानतळावर भाजपशिवाय इतर पक्षातील नेत्यांची जी गर्दी उसळली हे त्याचेच द्योतक आहे. राज्यातील काँग्रेस आघाडीच्या सरकारबद्दलची नाराजी लोकांत आहे. त्या नाराजीला व्यक्तिगत कामाच्या बळावर दूर करण्याचे आव्हान काँग्रेस उमेदवारांसमोर आहे. अशा स्थितीत वेगळीच राजकीय मोट आकारास आल्यास काँग्रेसच्या अडचणी वाढतील.
गृहराज्यमंत्री सतेज पाटील विरुद्ध आमदार महाडिक यांच्यातील वाद हा राजकीय वर्चस्वाचा आहे. जिल्ह्याचा नेता कोण, ही महत्त्वाकांक्षाही त्यामागे आहे. लोकसभा निवडणुकीवेळी गृहराज्यमंत्री पाटील व ‘राष्ट्रवादी’चे खासदार धनंजय महाडिक यांच्यात समझोता झाला.
हा समझोता या दोन नेत्यांपुरताच मर्यादित राहिला. आमदार महाडिक यांचा हा समझोता करण्यास अखेरपर्यंत विरोध राहिला. तो झाला नसता तर कदाचित निकाल बदललाही असता. परंतु आताही त्यांना मानणाऱ्या कार्यकर्त्यांकडून त्या दोघांचे (सतेज पाटील-धनंजय महाडिक) मिटले, आमचे मिटलेले नाही, अशी भाषा करण्यात येत आहे. आता अमल महाडिक हे भाजपचे उमेदवार झाल्यास खासदार महाडिक यांची दुहेरी कोंडी होणार आहे. त्यांचे सगळे राजकारण आमदार महाडिक यांच्या पाठबळावर आकारास आले आहे आणि दुसरे म्हणजे ते काँग्रेस आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेसचे अधिकृत खासदार आहेत. आमदार महाडिक काँग्रेसचे, त्यांचा मुलगा अमल हे देखील काँग्रेसच्याच चिन्हावर जिल्हा परिषदेत निवडून आलेले, खासदार महाडिक राष्ट्रवादीचे, तर भाऊ नाना महाडिक शिवसेनेच्या वाटेवर म्हणजे एकाच कुटुंबात सर्व पक्षाचे झेंडे फडकणार.
सतेज पाटील यांची सोपी झालेली लढत अमल महाडिक यांच्या उमेदवारीने अटीतटीची होणार हे स्पष्टच आहे. परंतु त्याच वेळेला महाडिक यांच्यासमोरही अनेक अडथळे आहेत. अमल यांनी भाजपचा झेंडा हातात घेतल्यास महाडिक यांच्या काँग्रेसच्या आमदारकीवरही प्रश्नचिन्ह लागू शकते. महाडिक गटाच्यादृष्टीने सगळ््यात महत्त्वाचे सत्ताकेंद्र असलेल्या कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध संघाच्या (गोकुळ) निवडणुकीत त्याचे पडसाद उमटतील. परंतु त्याचे काय करायचे ते पुढचे पुढे बघू, अशी काहीशी महाडिक गटाची सध्याची भूमिका आहे. सतेज पाटील हे जर महाडिक गटाचे राजकारण संपविणार असतील, तर आपणही गप्प बसायचे नाही, हा या संघर्षातील खरा केंद्रबिंदू आहे आणि हा संघर्ष असाच पुढे गेला, तर त्याचा शेवटही कुणाच्या तरी राजकारणाचा प्रभाव संपविणाराच ठरणारा आहे.
गेल्या विधानसभा निवडणुकीत जनसुराज्य पक्षाचे नेते प्रा. जयंत पाटील हे सतेज पाटील यांच्याबरोबर होते. त्याचा सतेज पाटील यांना फायदा झाला. त्यावेळी जयंत पाटील यांना महाडिक यांचे वर्चस्व संपवायचे होते. पुढे महापालिकेच्या राजकारणात सतेज पाटील व जयंत पाटील यांच्यातील संघर्ष टोकाला गेला. सतेज पाटील यांनी मंजूर करून आणलेल्या काळम्मावाडी थेट पाईपलाईन योजनेमध्ये जयंत पाटील यांनी केलेल्या तक्रारी या याच कुरघोडीच्या राजकारणाचा भाग होता. आता पाच वर्षांनंतर पुन्हा दक्षिणमधील लढतीमुळे महाडिक-जयंत पाटील या राजकीय गुरू-शिष्यांत मनोमीलन होत आहे.

Web Title: Kolhapur South constituency has four flags in the house of mahadis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.