कोल्हापूर : ‘रुग्णवाहिकेला वाट करून द्या’ मोहिमेस सुरुवात, विविध स्वयंसेवी संस्थांचा सहभाग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2018 05:26 PM2018-05-12T17:26:57+5:302018-05-12T17:26:57+5:30

वाहनधारकांमध्ये स्वयंशिस्त येऊन त्यांनी वाहतुकीच्या नियमांचे तंतोतंत पालन करावे व ‘रुग्णवाहिकेला वाट करून द्या’ यासाठी कावळा नाका येथे आयोजित केलेल्या जनजागृती मोहिमेची सुरुवात महापौर स्वाती यवलुजे व जिल्हा पोलीस अधीक्षक संजय मोहिते यांच्या उपस्थितीत झाली.

Kolhapur: 'Spare the Ambulance' campaign started, with the participation of various NGOs | कोल्हापूर : ‘रुग्णवाहिकेला वाट करून द्या’ मोहिमेस सुरुवात, विविध स्वयंसेवी संस्थांचा सहभाग

कोल्हापूर : ‘रुग्णवाहिकेला वाट करून द्या’ मोहिमेस सुरुवात, विविध स्वयंसेवी संस्थांचा सहभाग

Next
ठळक मुद्दे‘रुग्णवाहिकेला वाट करून द्या’ मोहिमेस सुरुवातविविध स्वयंसेवी संस्थांचा सहभाग

कोल्हापूर : वाहनधारकांमध्ये स्वयंशिस्त येऊन त्यांनी वाहतुकीच्या नियमांचे तंतोतंत पालन करावे व ‘रुग्णवाहिकेला वाट करून द्या’ यासाठी कावळा नाका येथे आयोजित केलेल्या जनजागृती मोहिमेची सुरुवात महापौर स्वाती यवलुजे व जिल्हा पोलीस अधीक्षक संजय मोहिते यांच्या उपस्थितीत झाली.

यावेळी वाहतुकीच्या नियमांचे फलक घेऊन वाहनधारकांना माहितीपत्रकांचे वाटप करण्यात आले. या मोहिमेत वाहतूक पोलिसांसह स्वयंसेवी संस्थांनीही सहभाग घेतला. ‘शपथ घेऊ, वाहतुकीचे नियम पाळू’, असे आवाहन वाहनधारकांना केले.

वाहतुकीच्या नियमांकडे दुर्लक्ष करणाऱ्या वाहनधारकांमुळे शहरात वाहतुकीची कोंडी होते. वाहनधारकांनी स्वयंशिस्त पाळावी. प्रथम रुग्णवाहिकेला रस्ता मोकळा करून द्यावा. यासह वाहतुकीच्या नियमांचे पालन करावे, यासाठी पोलिसांसह स्वयंसेवी संस्थांकडून प्रबोधनाची मोहीम सुरू केली आहे. यात युनिक आॅटोमोबाईल, नृत्यदिग्दर्शक सागर बगाडे, कोडोली येथील गनिमी कावा ग्रुपचे तरुण आणि पोलिसांनी यात सहभाग घेतला.

यावेळी पोलीस अधीक्षक मोहिते म्हणाले, ‘वाहतुकीच्या शिस्तीसाठी पोलिसांकडून नियमित प्रयत्न सुरू असतात. मात्र, वाहनधारकांमध्ये स्वयंशिस्तीचा अभाव असल्याने नियमांचे पालन होत नाही. आपल्याला वाहतुकीची शिस्त हवी असेल, तर नियम पाळणे हे आपले कर्तव्य आहे.

आपल्यामुळे कोणाची अडवणूक होऊ नये, याची दक्षता प्रत्येकाने घेतली तर, वाहतुकीच्या कोंडीचा प्रश्नच निर्माण होणार नाही. पोलिसांसह काही स्वयंसेवी संस्थादेखील यासाठी रस्त्यावर उतरत आहेत, ही स्वागतार्ह बाब आहे. महापौर स्वाती यवलुजे यांनी प्रबोधन मोहिमेचे स्वागत करून शहरातील मार्गदर्शक फलक, झेब्रा क्रॉसिंग, स्पीडब्रेकर, ट्रॅफिक सिग्नल सुसज्ज ठेवण्यासाठी महापालिका प्रयत्न करील, असे आश्वासन दिले.

झेब्रा क्रॉसिंगवर थांबू नये, सीट बेल्टचा वापर करावा, रस्त्याची डावी बाजू रिकामी ठेवावी, रुग्णवाहिकांना पुढे जाण्यास जागा द्यावी, ट्रिपलसीट प्रवास करू नये, दुचाकीस्वारांनी हेल्मेट वापरावे असे सांगत, ‘शपथ घेऊ, वाहतुकीचे नियम पाळू,’ असे आवाहन केले. यानिमित्त पोलीस व्हॅनमधून वाहतूक नियमांची चित्रफीतही दाखविण्यात आली.

यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक तिरूपती काकडे, नगरसेवक संजय मोहिते, युनिक आॅटोमोबाईलचे सुधर्म वाझे, वाहतूक निरीक्षक अशोक धुमाळ, शाहूपुरी पोलीस ठाण्याचे निरीक्षक संजय मोरे, प्रा. किरण पाटील, बिपीन मिरजकर, अभय देशपांडे, राहुल देसाई, ‘गनिमी कावा ग्रुप’चे संतोष हुजरे, अशोक पाटील, अमोल कुलकर्णी, आदी मान्यवर उपस्थित होते.

विविध चौकांत पथनाट्ये

नृत्यदिग्दर्शक सागर बगाडे हे ‘केवायफोरएस’ या संस्थेच्या माध्यमातून गुरुवारी (दि. १७) पासून वाहतुकीच्या नियमांची माहिती वाहनधारकांपर्यंत पथनाट्याद्वारे पोहोचविणार आहेत. शहरातील विविध चौकांत पथनाट्ये सादर करून वाहतुकीच्या नियमांचे पालन करावे, याकरिता प्रबोधन केले जाणार आहे. विशेष म्हणजे यात अंध विद्यार्थीही सहभाग घेणार आहेत.

 

Web Title: Kolhapur: 'Spare the Ambulance' campaign started, with the participation of various NGOs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.