कोल्हापूर : एक मुखानं बोला, बोला, जय हनुमान ! हनुमान जन्मोत्सव भजन, कीर्तनाने उत्साहात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2018 07:20 PM2018-03-31T19:20:32+5:302018-03-31T19:20:32+5:30
‘अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान, एक मुखानं बोला, बोला जय हनुमान’अशा गजरात कोल्हापूर शहरात हनुमान जन्मोत्सव शनिवारी विविध ठिकाणी भक्तिपूर्ण वातावरणात साजरा झाला.
कोल्हापूर : ‘अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान, एक मुखानं बोला, बोला जय हनुमान’अशा गजरात कोल्हापूर शहरात हनुमान जन्मोत्सव शनिवारी विविध ठिकाणी भक्तिपूर्ण वातावरणात साजरा झाला.
शनिवार पेठ, उभा मारुती चौक, राजारामपुरी, संभाजीनगरसह तुळजाभवानी कॉलनी आदी उपनगरात यानिमित्त सकाळी जन्मोत्सव, भजन-कीर्तनाच्या कार्यक्रमांसह भक्तांना सुठंवडा, महाप्रसाद वाटप करण्यात आले. यावेळी हनुमान भक्तांनी मंदिरात मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.
कोल्हापूरातील राजारामपुरीतील मंदिरात हनुमान जयंती निमित्त शनिवारी आकर्षक पूजा बांधण्यात आली होती.
(छाया : दीपक जाधव)
संभाजीनगर शहाजी वसाहत परिसरातील सद्गुरु श्री तोडकर महाराज आश्रमात द्रोणागिरी ट्र्स्टतर्फे द्रोणागिरी आश्रमात सकाळी सहा वाजून ३६ मिनिटांनी शंख, तुतारीच्या गजरात हनुमान जन्मकाळ झाला. यावेळी सोनाली पाटील , सुनीता बोळाज, शरयु बोळाज, श्रावणी पाटील व उमा तोडकर यांनी हनुमंतरायाची पारंपारिक गीते म्हटली.
द्रोणागिरी कला सांस्कृतिक विकास मंचतर्फे रक्तदान शिबीर व आयुर्वेदिक तज्ज्ञ डॉ. गणेश पालकर यांचे रोग निदान तपासणी व नाडी परिक्षण शिबीर झाले. यावेळी भाविकांना महाप्रसाद तर कुष्ठरोग्यांना अन्नदान करण्यात आले. सायंकाळी हनुमंताची आरती होऊन पालखी सोहळ्याला सुरुवात झाली. पारंपारिक लवाजम्यासह शाही थाटात निघाली.
राजारामपुरीतील मारुती मंदिरात आकर्षक विद्युत रोषणाईसह फुलांची सजावट करण्यात आली होती. हनुमानच्या मुर्तिस फुलांची आकर्षक पूजा पुजारी धनपाल साठे व किरण साठे यांनी बांधली होती. पहाटे अभिषेक, जन्मकाळ सोहळा आरती असे धार्मिक कार्यक्रम झाले. जोतिबा यात्रेवरून येणारे भाविक याठिकाणी दर्शन घेत होते.
शनिवारी रात्री उशिरापर्यंत दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली होती. यावेळी महाप्रसादाचा लाभ भाविकांनी घेतला.
याचबरोबर शनिवार पेठेतील सोन्यामारुती चौक सेवा मंडळातर्फे सकाळी जन्मकाळ व त्यानंतर दुपारी महाप्रसाद वाटप करण्यात आले.
महापालिकेजवळील समस्त दैव नामदेव शिंपी समाजातील हनुमान मंदिरात महाभिषेक पूजा, त्यानंतर गजाननबुवा वाठारकर यांचे कीर्तन तर दुपारी शिरा वाटप करण्यात आला. तसेच श्री शनैश्वर मंदिरामध्ये चैत्रयातेनिमित्त श्री जोतिबा रुपात पूजा खालकर बंधू व अभिजीत सुर्यवंशी यांनी बांधली.
उभा मारुती चौकातील मारुती मंदिरामध्ये सकाळी जन्मकाळ झाला. यानिमित्त आठ एप्रिलला महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. सानेगुरुजी वसाहत तुळजाभवानी कॉलनीतील स्वरराज चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून अपक्ष नगरसेवक राजू दिंडोर्ले यांच्या उपस्थितीत मारुती मंदिराजवळ महाप्रसाद वाटप करण्यात आला.
यावेळी विशाल दिंडोर्ले यांच्यासह भागातील नागरिक उपस्थितीत होते. शनिवार पेठेतील काळाईमाम तालीम प्रणित सचिन ढणाल युवा मंचतर्फे सकाळी शिरा वाटप करण्यात आला. यावेळी चंद्रगुप्त खालकर, राहूल ससे, सुधीर झगडे, विजय नावणे, गजानन राचूरे, मिलिंद सांगवडेकर, अमोल नचणे, दिलीप अस्वले आदी उपस्थित होते.