कोल्हापूर : हृदयविकार, मधुमेह, कर्करोग निदानासाठी विशेष शिबिरे, राज्यातील उर्वरित १७ जिल्ह्यांसाठी योजना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 1, 2018 07:28 PM2018-01-01T19:28:23+5:302018-01-01T19:31:46+5:30
समीर देशपांडे
कोल्हापूर : हृदयविकार, मधुमेह आणि कर्करोगाचे वेळीच निदान व्हावे यासाठी आता प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावर तीस वर्षांवरील नागरिकांसाठी वर्षांतून दोन शिबिरे घेण्यात येणार आहेत. राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानांतर्गत सध्या राज्यातील १७ जिल्ह्यांत ही योजना राबविली जात असून, आता उर्वरित १७ जिल्ह्यांतही ही योजना राबविण्यात येणार आहे.
याआधी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या स्तरावर अशी शिबिरे घेण्यासाठी आर्थिक तरतुदीचा मुद्दा पुढे येत असे. मग जिल्हा परिषदेच्या स्वनिधीतून किंवा जिल्हा नियोजन मंडळाकडून निधी उपलब्ध झाल्यासच अशी शिबिरे घेता येत असत. मात्र, याला खूप मर्यादा पडत होत्या. मात्र, आता राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानांतर्गतच या योजनेचा समावेश करण्यात आल्याने त्यासाठी आर्थिक तरतूदही करण्यात आली आहे.
या तीनही आजारांचे निदान करणारे तज्ज्ञ डॉक्टर यासाठी नियुक्त करण्यात येणार असून, त्यांच्याकडूनच या शिबिरांमध्ये तपासणी केली जाणार आहे. या शिबिरांमध्ये जर काही या आजारांची लक्षणे असलेले नागरिक आढळले, तर त्यांना पुढील तपासणीसाठी जिल्हास्तरावर स्थापन करण्यात येणाऱ्या राष्ट्रीय असंसर्गीय रुग्ण कक्षाकडे पाठविण्यात येणार आहे. गरज पडल्यास पुढच्या उपचाराचीही सोय शासनामार्फत केली जाणार आहे. यासाठी आवश्यक ते डॉक्टर्स आणि अन्य मनुष्यबळ भरण्याच्याही सूचना देण्यात आल्या आहेत.
प्रत्येक जिल्ह्यासाठी १७ लाख ५१ हजार रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून, यातून प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी दहा हजार रुपये देण्यात येणार आहेत. १७ जिल्ह्यांमध्ये ही प्रक्रिया आता सुरू झाली असून मार्च २0१८ अखेर ही दोन शिबीरे घेण्यात येणार आहेत.
उर्वरित या जिल्ह्यांत सुरू होणार ही योजना
रायगड, पालघर, धुळे, जळगाव, अहमदनगर, सोलापूर, कोल्हापूर, सांगली, औरंगाबाद, हिंगोली, लातूर, बीड, अकोला, बुलढाणा, यवतमाळ, नागपूर, गोंदिया
ही योजना कशासाठी?
वयाच्या तिशीनंतर हृदयविकार, मधुमेह आणि कर्करोगाची लक्षणे दिसत असल्याचे चित्र विविध सर्वेक्षणांमधून पुढे आले आहे. बदललेली जीवनशैली, धूम्रपान, वाढत्या खतांचा वापर अशा अनेक कारणांमुळे आरोग्याचे प्रश्न निर्माण होऊ लागले आहेत. मात्र, ग्रामीण भागात आर्थिक कारणासह दुर्लक्षामुळे याबाबत लवकर निदान होत नाही व शेवटच्या टप्प्यात हे रोग झाल्याचे निष्पन्न होते. वेळीच निदान व्हावे आणि पुढे उपचार व्हावेत यासाठी ही योजना सुरू करण्यात आली आहे.