कोल्हापूर : ‘सर्व्हर’ची गती मंद, तरीही दस्तांवर परिणाम नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2018 12:11 PM2018-12-28T12:11:33+5:302018-12-28T12:18:53+5:30
जमीन अभिलेखच्या सर्व्हरची गती अजूनही मंदच आहे. काही प्रमाणात त्यामध्ये सुधारणा झाली असून, काहीवेळा पूर्ण क्षमतेने तर काहीवेळा मंद गतीने सर्व्हर सुरू आहे. याचा फार मोठा असा परिणाम दस्त नोंदणीवर झालेला दिसत नाही.
कोल्हापूर : जमीन अभिलेखच्या सर्व्हरची गती अजूनही मंदच आहे. काही प्रमाणात त्यामध्ये सुधारणा झाली असून, काहीवेळा पूर्ण क्षमतेने तर काहीवेळा मंद गतीने सर्व्हर सुरू आहे. याचा फार मोठा असा परिणाम दस्त नोंदणीवर झालेला दिसत नाही.
गेल्या १५ दिवसांत सर्व्हरच्या अडचणींना जमीन अभिलेख विभागाला सामोरे जावे लागत आहे. जिल्ह्यातील विविध कार्यालयांमध्ये दस्त नोंदणीच्या कामात वेळ लागत आहे. असे असले तरी वेळोवेळी डाटा क्षमता वाढविण्याचा प्रयत्न माहिती व तंत्रज्ञान विभागाकडून करण्यात आला; त्यामुळे काहीवेळा हा सर्व्हर पूर्ण क्षमतेने काम करत आहे. तर काहीवेळा मंद गतीने काम करत आहे. त्याचा परिणाम दस्तांच्या संख्येवर झाला नसला, तरी तो तयार करण्यासाठी नेहमीपेक्षा २0 ते २५ मिनिटे जादा वेळ लागत आहे.
जिल्ह्यातील विविध कार्यालयांमधून दिवसाला सरासरी २०० दस्त केले जातात. गेल्या नोव्हेंबर महिन्यात ४ हजार ६७९ इतके दस्त झाले होते. या महिन्यात २६ डिसेंबरपर्यंत ४ हजार ५८२ इतकी दस्तनोंदणी झाली आहे. यामुळे दस्तांच्या संख्येत फार मोठा फरक पडलेला दिसत नाही; परंतु एखाद्या दस्ताला पूर्वी अर्धा तास लागत होता. तर आता सर्व्हर मंद असल्यामुळे यासाठी पाऊण तास वेळ लागत आहे.
गेल्या १५ दिवसांत सर्व्हर स्लोच्या अडचणीला सामोरे जावे लागत आहे. सर्व्हर बंद नसला, तरी तो अद्याप पूर्ण क्षमतेने सुरू झालेला नाही. दस्त तयार होताना थोडा वेळ लागत असला, तरी याचा दस्ताच्या संख्येवर फारसा फरक पडलेला नाही.
- सुंदर जाधव,
मुद्रांक जिल्हाधिकारी, कोल्हापूर