कोल्हापुरात ‘तारे जमीं पर’
By Admin | Published: December 17, 2015 12:20 AM2015-12-17T00:20:29+5:302015-12-17T01:21:07+5:30
उल्का वर्षाव : अनेक खगोलप्रेमींनी अनुभवला अद्भुत सोहळा
कोल्हापूर : डिसेंबर महिन्यातील १२ ते १५ या तारखा खगोलीय घटनेच्याबाबतीत विशेष होत्या. पृथ्वीच्या भ्रमणकक्षेत प्रवेश केलेल्या धुमकेतूच्या अवशेषांमुळे असंख्य ताऱ्यांची बरसात होत आहे, असे भासवणारा उल्का वर्षाव यादिवशी कोल्हापूरकरांना पाहावयास मिळाला. सोमवारी ताशी पन्नास ते शंभरच्या संख्येने उल्का पडताना पाहण्याची संधी मिळाली. क्वचितच घडणाऱ्या या खगोलीय घटनांची खगोलप्रेमी व निरीक्षक आतुरतेने वाट पाहत असतात. निसर्गाचा हा अद्भुत सोहळा अनुभवण्यासाठी व कॅमेराबद्ध करण्यासाठी कोल्हापुरातील हौशी खगोलप्रेमी व छायाचित्रकार सागर वासुदेवन, अमृता वासुदेवन, सचिन जिल्हेदार, सागर बकरे, देवदत्त नाईक व आनंद आगळगावकर यांनी कळंबा परिसरात विशेष उपक्रम राबविला. सारिका बकरे, सरोज जिल्हेदार, गौरव कोळेकर, वासुमित्र बकरे, गौरी वासुदेवन व सुमेध जिल्हेदार यांनी या मोहिमेत सहभाग घेतला.
काय आहे उल्कापात...
मिथुन म्हणजेच जेमिनी आणि जेमिनीमधून होणाऱ्या या उल्का वर्षावास जेमिनाईडस म्हटले जाते. दरवर्षी सामान्यत: या तारखांना हा अवकाशीय नजराना पाहावयास मिळतो. कधी काळी पृथ्वीच्या भ्रमणकक्षेला छेदून गेलेला ३२०० पायथोन या धुमकेतूने पुढे जाता-जाता आपल्या शेपटातील मागे सोडलेले खडकांचे अवशेष अंतराळात तरंगत राहिले. पृथ्वीच्या गुरुत्वामुळे हे अवशेष पृथ्वीकडे खेचले जातात. त्यावेळी वातावरणातील आॅक्सिजन व हवेच्या घर्षणामुळे हे अवशेष पृथ्वीवर पडण्याआधीच जळतात. आपल्याला मात्र आकाशातून तारे पडल्याचा भास होतो.