नवसंकल्पकांच्या प्रयत्नांना ‘कोल्हापूर स्टार्टअप मिशन’चे पाठबळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2021 04:29 AM2021-01-16T04:29:30+5:302021-01-16T04:29:30+5:30

कोल्हापूर : देशाच्या विकासासाठी भरीव योगदान देऊ इच्छिणाऱ्या नवसंकल्पकांच्या प्रयत्नांना ‘कोल्हापूर स्टार्टअप मिशन’च्या माध्यमातून नक्की पाठबळ मिळेल. ...

Kolhapur Startup Mission's support to the innovators' efforts | नवसंकल्पकांच्या प्रयत्नांना ‘कोल्हापूर स्टार्टअप मिशन’चे पाठबळ

नवसंकल्पकांच्या प्रयत्नांना ‘कोल्हापूर स्टार्टअप मिशन’चे पाठबळ

googlenewsNext

कोल्हापूर : देशाच्या विकासासाठी भरीव योगदान देऊ इच्छिणाऱ्या नवसंकल्पकांच्या प्रयत्नांना ‘कोल्हापूर स्टार्टअप मिशन’च्या माध्यमातून नक्की पाठबळ मिळेल. नवसंकल्पकांच्या सहभागातून कोल्हापूरचा विकास साधण्यासाठी पालकमंत्री सतेज पाटील यांनी राबविलेला हा उपक्रम कौतुकास्पद असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर यांनी शुक्रवारी केले.

कोल्हापूर इनक्युबेशन सेंटर, आयआयटी कानपूर आणि डी.वाय. पाटील ग्रुप यांचा संयुक्त उपक्रम असलेल्या ‘कोल्हापूर स्टार्टअप मिशन’च्या ऑनलाइन उद्‌घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी पालकमंत्री सतेज पाटील, आमदार ऋतुराज पाटील, महापालिका आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे, आयआयटी कानपूरच्या इनोव्हेशन सेंटरचे डॉ. अमिताभ बंडोपाध्याय उपस्थित होते. कोणत्याही स्टार्टअपसाठी संकल्पना हेच खरे भांडवल असते. संकल्पना जर लोकांचे प्रश्न सोडविण्यासाठी उपयुक्त ठरली तर ती समाजाच्या विकासाठी पूरक ठरते. कोल्हापूरचा इतिहास पाहता, या शहराने जगाला खूप नव्या संकल्पना दिल्या आहेत. या उपक्रमाच्या माध्यमातून नवसंकल्पनांना मूर्त स्वरूप देण्यासाठी पाठबळ मिळणार असल्याचे डॉ. माशेलकर यांनी सांगितले. कोल्हापूर शहरातील स्थानिक प्रश्न सोडविताना येथील युवकांमध्ये संशोधन, उद्यमशीलता वाढविण्यासाठी स्टार्ट-अप आणि संशोधक यांना आवाहन करणे हा कोल्हापूर स्टार्टअप मिशनचा उद्देश आहे. या उपक्रमासाठी शहरातील विविध नागरी समस्यांवर लक्ष केंद्रित केले आहे. याअंतर्गत पाणीपुरवठा, कचरा व्यवस्थापन, हवा गुणवत्ता व्यवस्थापन, शिक्षण, सार्वजनिक आरोग्य, आदी विषयांवर नवसंकल्पकांनी उपाय सुचविणे अपेक्षित असल्याचे पालकमंत्री पाटील यांनी सांगितले. कोरोनानंतर डिजिटल शिक्षण आणि वर्क फ्रॉम होम या नव्या गोष्टी पुढे आल्या आहेत. युवा पिढीला रोजगारक्षम बनविण्यासाठी स्टार्ट अपला पाठबळ देण्याचा माझा प्रयत्न राहील. या उपक्रमातून निवड होणाऱ्या स्टार्ट अपना लागणाऱ्या पायाभूत सुविधा डी.वाय. पाटील ग्रुपच्या माध्यमातून देण्यात येतील, असे आमदार ऋतुराज पाटील यांनी सांगितले. महानगरपालिकेच्या माध्यमातून नागरिकांना मूलभूत सुविधा देणे आणि लोकांच्या अपेक्षा पूर्ण करताना योग्य नियोजन करावे लागते. कोल्हापूर स्टार्ट अप मिशनसारख्या उपक्रमातून शहराच्या समस्यांसाठी आधुनिक तांत्रिक सहकार्य नक्की मिळेल, असे आयुक्त कादंबरी बलकवडे यांनी सांगितले.

चौकट

नवउद्योजकांसाठी पाच टक्के रक्कम

कोल्हापुरात लवकरच आयटी पार्क सुरू होईल. देशभरात वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या कोल्हापुरातील युवा पिढीला आपल्या शहरातच संधी देण्याचा हा प्रयत्न आहे. जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून एकूण वार्षिक निधीच्या पाच टक्के रक्कम नवउद्योजकांना पाठबळ देण्यासाठी उपलब्ध करणार असल्याचे पालकमंत्री पाटील यांनी सांगितले.

Web Title: Kolhapur Startup Mission's support to the innovators' efforts

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.