कोल्हापूर : राज्यस्तर शालेय हॉकी स्पर्धेत ‘क्रीडा प्रबोधिनी’चाच वरचष्मा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 14, 2018 05:44 PM2018-11-14T17:44:03+5:302018-11-14T17:52:42+5:30
कोल्हापूर जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालयातर्फे घेण्यात आलेल्या राज्यस्तर शालेय हॉकी स्पर्धेत १७ वर्षांखालील मुले व मुलींमध्ये पुण्याच्या क्रीडा प्रबोधिनी संघाने कोल्हापूर विभाग संघावर मात करीत बुधवारी विजेतेपदावर आपले नाव कोरले.
कोल्हापूर : जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालयातर्फे घेण्यात आलेल्या राज्यस्तर शालेय हॉकी स्पर्धेत १७ वर्षांखालील मुले व मुलींमध्ये पुण्याच्या क्रीडा प्रबोधिनी संघाने कोल्हापूर विभाग संघावर मात करीत बुधवारी विजेतेपदावर आपले नाव कोरले.
मेजर ध्यानचंद हॉकी स्टेडियम येथे सकाळच्या सत्रात मुलांमध्ये झालेल्या अंतिम सामन्यात क्रीडा प्रबोधिनी संघाने कोल्हापूर विभाग (विद्यामंदिर हायस्कूल ज्युनिअर कॉलेज, इस्लामपूर) संघाचा टायब्रेकरवर ४-३ असा पराभव करीत विजेतेपद पटकाविले.
क्रीडा प्रबोधिनी, पुणे विजयी संघ
संपूर्ण वेळेत अटीतटीच्या लढतीत सामना गोलशून्य बरोबरीत राहिला. त्यामुळे सामन्यांचा निकाल टायब्रेकरवर लावण्यात आला. यात क्रीडा प्रबोधिनीकडून सचिन कोळेकर, कुणाल धुमाळ, धैर्यशील जाधव, अर्जुन भोसले यांनी; तर कोल्हापूरकडून तेजस महाडिक, यश उरणकर, प्रज्ज्वल कांबळे यांनी गोलची नोंद केली.
🖕कोल्हापूर विभाग उपविजय संघ
क्रीडा प्रबोधिनीच्या विजयी संघात आदित्य भिसणे, मयूर भांडवडे, महेश पाटील, कुणाल धुमाळ, सचिन कोळेकर, धैर्यशील जाधव, अनिल कोळेकर, सागर शिनगाडे, संतोष भोसले, आदित्य लाळगे, योगेश थत्ते, अर्जुन भोसले, तुषार देसाई, प्रशिक्षक अजित लाक्रा यांचा समावेश आहे.
सतरा वर्षांखालील मुलींच्या अंतिम सामन्यात क्रीडा प्रबोधिनी, पुणे संघाने कोल्हापूर विभागा (न्यू इंग्लिश स्कूल, नूल) वर २-० अशी एकतर्फी मात केली. यात क्रीडा प्रबोधिनीकडून काजोल आटपाडकर, ओशिनी बनसोडे यांनी प्रत्येकी एक गोलची नोंद करीत संघाला विजेतेपदाला गवसणी घालण्यास मदत केली.
कोल्हापूर विभाग मुली उपविजय संघ
या विजयी संघात आचल क्षीरसागर, निर्जला शिंदे, प्रज्ञा बनसोडे, वैशाली लांजेवार, काजोल आटपाडकर, निशा भोळे, उत्कर्षा काळे, मनश्री शेडगे, भाग्यश्री शिंदे, शालिनी साकुरे, ओशिनी बनसोडे, दीपाली आगाशे, कीर्ती ढेपे, ऋतुजा पिसाळ, अश्विनी कोळेकर, गौरी मुकणे, स्नेहल चव्हाण, आकांक्षा बनसोडे यांचा समावेश होता.
विजेत्या संघास कोल्हापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल व राष्ट्रीय फुटबॉलपटू संदीप नरके यांच्या हस्ते चषक वितरण करण्यात आला. यावेळी जिल्हा क्रीडाधिकारी चंद्रशेखर साखरे, हॉकी संघटक कुमार आगळगावकर, विकास माने, उदय पवार, विजय साळोखे-सरदार, सागर जाधव, नजीर मुल्ला, मोहन भांडवले, महेश सूर्यवंशी, आंतरराष्ट्रीय पंच श्वेता पाटील, रमा पोतनीस, आदी उपस्थित होते.