(राज्यासह कोल्हापूरसाठी) कोल्हापुरात कोव्हॅक्सिन लस देण्यास प्रारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2020 04:21 AM2020-12-23T04:21:25+5:302020-12-23T04:21:25+5:30
कोल्हापूर : राज्य शासनाकडून लस देण्यास परवानगी मिळाल्याने मंगळवारी येथील राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात या प्रक्रियेला ...
कोल्हापूर : राज्य शासनाकडून लस देण्यास परवानगी मिळाल्याने मंगळवारी येथील राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात या प्रक्रियेला प्रारंभ करण्यात आला. दिवसभरामध्ये सहाजणांना लस टोचण्यात आली आहे. अशा पद्धतीने एक हजार स्वयंसेवकांना लस टोचण्यात येणार आहे.
गेले चार दिवस वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाच्या परवानगीसाठी वाट पाहिली जात होती. त्यामुळे रोज लसचाचणी होणार असे वातावरण होते. मात्र प्रत्यक्षात परवानगी मिळत नव्हती. अखेर मंगळवारी सकाळी या परवानगीचा मेल महाविद्यालयाच्या प्रशासन विभागाला प्राप्त झाला.
त्यानुसार मंगळवारी दुपारी या प्रक्रियेला प्रारंभ झाला. जिल्हाधिकारी दौलत देसाई आणि अधिष्ठाता डॉ. एस. एस. मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली औषधशास्त्र विभागाच्या प्रमुख डॉ. सुनीता रामानंद आणि क्रोम या स्वयंसेवी संस्थेचे प्रमुख डॉ. धनंजय लाड, औषधवैद्यकशास्त्र विषयाचे प्रा. बरगे, यांनी ही प्रक्रिया पूर्ण केली. ‘सीपीआर’मध्ये या संस्थेला जागा देण्यात आली आहे. याच ठिकाणी ही प्रक्रिया पार पडली.
यासाठी भारत बायोटेककडून १०० स्वयंसेवकांना देण्यासाठी लस उपलब्ध करून देण्यात आली. संस्थेने सुरू केलेल्या पोर्टलवर स्वयंसेवकांची नोंदणी करण्यात आली होती. ती अजूनही सुरू आहे. या सर्व स्वयंसेवकांचे लसीकरण झाल्यानंतर पुन्हा त्यांची आरोग्य तपासणी केली जाईल आणि मग तुलनात्मक अभ्यासानंतर निष्कर्ष काढण्यात येतील.
चौकट
३१ डिसेंबरपर्यंतचे नियोजन
वास्तविक ही प्रक्रिया ३१ डिसेंबरपर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात आले होते. मात्र शासनाच्या आरोग्य विभागाकडून वेळेत परवानगी न मिळाल्याने आता हा कालावधी वाढविण्याची गरज निर्माण झाली आहे. दिवसाला १०० जणांना लस देण्यासाठीचे नियोजन करण्यात आले आहे. यासाठी आवश्यक प्रशिक्षित डॉक्टर आणि अन्य कर्मचारी वृंदही तयार ठेवण्यात आला आहे.
चौकट
लसटोचणीची प्रक्रिया
१. संबंधित स्वयंसेवकांची आरोग्य तपासणी केली जाते.
२. लसीबाबतची सर्व प्रक्रिया सांगितली जाते.
३. संबधिताचे लेखी संमतीपत्र घेण्यात येते.
४. घशातील स्राव आणि रक्ताचा नमुना घेण्यात येतो.
५ यानंतर लस दिली जाते.
६ अर्धा तास निरीक्षणाखाली थांबवून घेण्यात येते. काही वेगळा परिणाम जाणवल्यास त्यांना संपर्कासाठी नंबर दिले जातात किंवा आणखी अडचण जाणवल्यास पुन्हा ‘सीपीआर’ला येण्यास सांगण्यात येते.
२२१२२०२० कोल कोव्हॅक्सिन
कोल्हापूर येथील राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात कोव्हॅक्सिन लसचाचणीस प्रारंभ झाला. यावेळी डॉ. सुनीता रामानंद, डॉ. धनंजय लाड यांच्यासह अन्य डॉक्टर उपस्थित होते.