कोल्हापुरात अजूनही आहे संसद भवनात स्थापित होणाऱ्या राजदंडाचा नमुना
By संदीप आडनाईक | Published: May 25, 2023 07:19 PM2023-05-25T19:19:49+5:302023-05-25T19:20:24+5:30
नव्या संसद भवनात प्रतिष्ठापना होणारा सेंगोल अर्थात राजदंडाचा इतिहास रोमांचकारी आहे.
कोल्हापूर : नव्या संसद भवनात प्रतिष्ठापना होणारा सेंगोल अर्थात राजदंडाचे कोल्हापूरचे कनेक्शन मूर्ती अभ्यासक उमाकांत राणिंगा आणि ॲड. प्रसन्न मालेकर यांनी उघड केला आहे. हा राजदंड सत्ता हस्तांतरणाचे प्रतीक होता, मात्र असा राजदंड धारण करण्याची पध्दत प्राचीन काळापासून भारतात होती, याचा उत्तम पुरावा कोल्हापूरजवळील चक्रेश्वरवाडी गावातील चक्रेश्वर मंदिरात उपलब्ध आहे.
नंदी अंकित असलेला नवा राजदंड नव्या संसद भवनात स्थापित करण्यात येणार आहे. स्वातंत्र्यप्राप्तीच्या वेळेला सत्ता हस्तांतरणाचे प्रतीक म्हणून हा राजदंड पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या हातामध्ये सुपूर्द करण्यात आला होता. हा राजदंड कित्येक वर्ष प्रयागराज येतील वस्तू संग्रहालयामध्ये होता. आता नव्या संसद भवनाच्या उद्घाटनप्रसंगी हा राजदंड सभापतींच्या जवळ स्थापित करण्यात येणार आहे. मात्र, असा राजदंड धारण करण्याची पद्धत प्राचीन काळापासून भारतात होती, याचा उत्तम पुरावा कोल्हापूरच्या दक्षिणेला राधानगरी तालुक्यात असलेल्या चक्रेश्वर वाडी या गावात श्री चक्रेश्वर मंदिरात दिसून येतो. संसद भवनात स्थापित होणाऱ्या राजदंडांच्या निमित्ताने यांच्या चक्रेश्वर वाडी येथील मंदिरातील या सुरसुंदरीच्या मूर्तीचे आणि तिच्या हातातील राजदंडाचे छायाचित्र उमाकांत राणिंगा यांच्या संग्रहात आहे.
श्री चक्रेश्वर मंदिरातील सूरसुंदरीच्या भग्न मूर्तीच्या हातात हा छातीजवळ धरलेला राजदंड आहे. राजदंड बाराव्या शतकाच्या असल्याचे पुरावे प्राचीन शिलालेखांमधून मिळून येतात. -उमाकांत राणिंगा, मूर्ती अभ्यासक.
कोल्हापूर भागातही सार्वभौम सत्तेची स्थापना करणारी राज्यसत्ता प्रचलित होती, याचा हा उत्तम नमुना म्हणावा लागेल. यानिमित्ताने प्राचीन राजदंडाच्या आठवणींना उजाळा मिळाला. -ॲड. प्रसन्न विश्वंभर मालेकर, कोल्हापूर.
राजदंडाचा इतिहास रोमांचकारी
नव्या संसद भवनात प्रतिष्ठापना होणारा सेंगोल अर्थात राजदंडाचा इतिहास रोमांचकारी आहे. हा सिंघल भारतीय परंपरेतील सम्राट चोल यांचा राजदंड आहे. १४ ऑगस्ट १९४७ रोजी तमिळ पंडितांकडून स्वतः पंडित नेहरूंनी स्वीकारलेला हा सेंगोल राजदंड वुम्मीडी बंगारू शेट्टी यांनी घडविला आहे. या सेंगोलवर सुवर्णाचा नंदी प्रस्थापित असून तो कष्ट आणि समृद्धीचे प्रतिक आहे.