कोल्हापूर : चोरीच्या दुचाकीवर ‘पोलीस’ लिहून फिरणाऱ्यास अटक, संशयित देवाळेतील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 6, 2018 12:21 PM2018-07-06T12:21:17+5:302018-07-06T12:23:45+5:30
चोरीच्या दुचाकीवर ‘पोलीस’असे लिहून शहरात फिरणाऱ्या दुचाकी चोरट्यास ताराबाई पार्क येथील सदर बाजार चौकात स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी पकडले. त्याच्याकडील ४० हजार रुपये किमतीची दुचाकी पोलिसांनी जप्त केली.
कोल्हापूर : चोरीच्या दुचाकीवर ‘पोलीस’असे लिहून शहरात फिरणाऱ्या दुचाकी चोरट्यास ताराबाई पार्क येथील सदर बाजार चौकात स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी पकडले. त्याच्याकडील ४० हजार रुपये किमतीची दुचाकी पोलिसांनी जप्त केली.
सतीश दिगंबर कांबळे (वय ३३, देवाळे, ता. करवीर) असे दुचाकी चोरट्याचे नाव आहे. त्याने या दुचाकीवर ‘पोलीस’ असे लिहिले होते. त्याने चोरीच्या दुचाकीवर पुढील बाजूच्या हेडलाईटवर व पाठीमागील पंख्यावर ‘पोलीस’ असे लिहिले आहे.
त्यामुळे त्याने पोलीस असल्याचा बहाणा करून लोकांची फसवणूक केली असल्याची शक्यता नाकारता येत नाही. तरी कोणाची अशा प्रकारे फसवणूक केली असल्यास संबंधितांनी या संशयिताविरोधात पोलिसांत तक्रार द्यावी, असे आवाहन कोल्हापूर पोलिसांनी केले आहे.
याबाबत पोलिसांनी सांगितले की, शहरात दुचाकी चोरीचे प्रमाण वाढले आहे. या पार्श्वभूमीवर पोलीस गस्त घालत होते. यावेळी एकजण दुचाकीवर ‘पोलीस’ असे लिहून कावळा नाका चौकाकडून धैर्यप्रसाद चौकाकडे जात होता. पोलिसांनी त्याचा पाठलाग करून सदर बझार येथे पकडले. त्याने सतीश कांबळे असे नाव सांगितले. त्याच्याकडील दुचाकीचा नंबर खोटा असल्याचे निदर्शनास आले.
संशयित सतीश कांबळेने जानेवारी २०१८ मध्ये महालक्ष्मी चेंबर्ससमोरील रस्त्यावर लावलेली दुचाकी बनावट चावी वापरून चोरली होती. त्यानंतर त्याने खरी नंबरप्लेट काढून खोटी नंबरप्लेट लावून फिरत असल्याची कबुली दिली. हा चोरीचा गुन्हा शाहूपुरी पोलिसांत दाखल आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक संजय मोहिते, अतिरिक्त पोलीस अधीक्षक तिरूपती काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक तानाजी सावंत, उपनिरीक्षक युवराज आठरे, सचिन पंडित, राजेंद्र सानप, हेडकॉन्स्टेबल राजेश आडूळकर, राजेंद्र हांडे, संजय हुंबे, संजय काशीद, संजय कुंभार, रामचंद्र कोळी, सुरेश पाटील, रवींद्र कांबळे, प्रकाश संकपाळ, रमेश डोईफोडे, आदींनी केली.