कोल्हापूर : शाळेच्या नावाखाली चोऱ्या : चार अल्पवयीन मुले ताब्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2018 07:15 PM2018-03-23T19:15:25+5:302018-03-23T19:15:25+5:30
शाळेच्या नावाखाली घरातून बाहेर पडत राजारामपुरी परिसरात सायकली, मोबाईल आणि दुचाकीच्या डिकीतून वस्तू चोरणाऱ्या चौघा अल्पवयीन मुलांच्या टोळीला राजारामपुरी पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांच्या ताब्यातून आठ सायकली, पाच मोबाईल, मोपेडच्या डिकीतून चोरलेला कॅमेरा, असा सुमारे दीड लाख किमतीचा मुद्देमाल जप्त केला.
कोल्हापूर : शाळेच्या नावाखाली घरातून बाहेर पडत राजारामपुरी परिसरात सायकली, मोबाईल आणि दुचाकीच्या डिकीतून वस्तू चोरणाऱ्या चौघा अल्पवयीन मुलांच्या टोळीला राजारामपुरी पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांच्या ताब्यातून आठ सायकली, पाच मोबाईल, मोपेडच्या डिकीतून चोरलेला कॅमेरा, असा सुमारे दीड लाख किमतीचा मुद्देमाल जप्त केला. चौघे दौलतनगर, राजारामपुरी, तिसरी गल्ली येथील राहणारे आहेत.
याबाबतची अधिक माहिती अशी, राजारामपुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत किरकोळ चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली होती. सायकल चोरीच्या घटनांमुळे पोलीस हैराण झाले होते. नागरिकांतून याबाबत राजारामपुरी पोलिसांत तक्रारीही दाखल केल्या होत्या. गुरुवारी (दि. २२) राजारामपुरी दुसऱ्या गल्लीत चार अल्पवयीन मुले रात्रीच्या सुमारास दंगामस्ती करीत निघाली होती.
गस्त घालताना संशयावरून चौघा मुलांना पोलिसांनी ताब्यात घेतले. ते आपल्या घरचा पत्ता व नाव सांगण्यास तयार नव्हते, त्यामुळे त्यांच्यावर संशय बळावला. त्यांचेकडे कसून चौकशी केली असता त्यांनी चोरीची कबुली दिली. शाळेच्या नावाखाली घरातून बाहेर पडत हे चौघेही एकत्र येत असत.
दिवसभर सायकली, मोबाईल, मोपेडच्या डिकीतून बॅगा, वस्तू चोरत असत. सायकलीवरून फिरत रात्रीच्या वेळी त्या राजारामपुरी परिसरातील एका बोळात लावत असत. या सर्वांना सुधारगृहात पाठविले आहे. ही कारवाई सहायक पोलीस निरीक्षक गजेंद्र लोहार यांच्यासह शांतिनाथ हुंडुरके, अशोक पाटील, प्रकाश पाटील, निवास पाटील, अमोल अवघडे, गौरव चौगले यांनी केली.
कुटुंबाच्या डोळ्याआड चोऱ्या
दौलतनगरमध्ये राहणाऱ्या दोघा मुलांना वडील नाहीत. त्यांची आई मजुरीची काम करते. राजारामपुरी तिसऱ्या गल्लीत राहणारे दोघेजण मध्यमवर्गीय आहेत. आई घरकाम, तर वडील नोकरी करतात. त्यांना आपली मुले चोरी करतात याची कल्पनाही नव्हती. पोलीस ठाण्यातून फोन येताच काय झाले म्हणून घाईगडबडीने ते गेले असता मुले चोर असल्याचे ऐकून तयांना मानसिक धक्काच बसला. कुटुंबाच्या डोळ्याआड हे चौघेजण चोऱ्या करीत असल्याचे निष्पन्न झाले.