कोल्हापूर : राजेंद्र नगरमधील सराईत महिला चोरट्यांना अटक, पावणेदोन लाख किमतीचा ऐवज जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 7, 2018 11:24 AM2018-08-07T11:24:51+5:302018-08-07T11:27:25+5:30
मिरजकर तिकटी येथील एका इमारतीच्या तळमजल्यावरील कार्यालयाच्या दरवाजाचे कुलूप तोडून सोन्या-चांदीचे दागिने व रोकड लंपास करणाऱ्या राजेंद्रनगर झोपडपट्टीतील सराईत दोन महिला चोरट्यांना पोलिसांनी अटक केली.
कोल्हापूर : मिरजकर तिकटी येथील एका इमारतीच्या तळमजल्यावरील कार्यालयाच्या दरवाजाचे कुलूप तोडून सोन्या-चांदीचे दागिने व रोकड लंपास करणाऱ्या राजेंद्रनगर झोपडपट्टीतील सराईत दोन महिला चोरट्यांना पोलिसांनी अटक केली. संशयित अश्विनी दत्ता नाईक (वय २६), बायडी सागर रसाळ (३०) अशी त्यांची नावे आहेत. त्यांच्या ताब्यातून १ लाख ६८ हजार किमतीचा ऐवज जप्त केला.
अश्विनी नाईक (आरोपी)
अधिक माहिती अशी, शहर पोलीस उपअधीक्षक डॉ. प्रशांत अमृतकर यांना खबऱ्याकडून माहिती मिळाली की, शहरामध्ये चोऱ्या करणाऱ्या अश्विनी नाईक व बायडी रसाळ या दोघींनी आठ दिवसांपूर्वी मिरजकर तिकटी येथे घरफोडी केली आहे. चोरीतील सोन्या-चांदीचे दागिने त्यांच्या घरी आहेत. त्यानुसार डॉ. अमृतकर यांनी पथकातील पोलीस उपनिरीक्षक किशोर डोंगरे, कॉन्स्टेबल अमर आडुळकर, समीर मुल्ला, दीपाली इंगवले, स्वप्नाली खोत यांना कारवाईचे आदेश दिले.
बायडी रसाळ (आरोपी)
या पथकाने सोमवारी दुपारी राजेंद्रनगर झोपडपट्टी येथील अश्विनी नाईक हिच्या घरी छापा टाकून झडती घेतली. तिच्याकडे विचारपूस करताना तिने सुरुवातीस उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यानंतर मात्र साथीदार बायडी रसाळ हिच्या मदतीने चोरीची कबुली दिली. या दोघींनी घरात लपवलेले चोरीचे दागिने हस्तगत केले. सध्या त्या पोलीस कोठडीत असून त्यांच्याकडून आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.