कोल्हापूर : अतिक्रमणविरोधी कारवाई थांबवा, शिवसेनेची मोर्चाद्वारे महापालिकेकडे मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2017 06:07 PM2017-12-26T18:07:27+5:302017-12-26T18:17:00+5:30
राष्ट्रीय फेरीवाला धोरणांनुसार आधी सर्व फेरीवाले, विक्रेते, केबिनधारक या सर्वांचे योग्य पुनर्वसन करावे, मगच अतिक्रमण विरोधी कारवाई राबवावी. सध्या ‘अतिक्रमणा’च्या नावाखाली जी फेरीवाल्यांना उद्ध्वस्त करण्याची कारवाई सुरू आहे ती त्वरित थांबवावी, अशी मागणी शिवसेनेच्यावतीने मंगळवारी फेरीवाल्यांच्या मोर्चाद्वारे केली.
कोल्हापूर : राष्ट्रीय फेरीवाला धोरणांनुसार आधी सर्व फेरीवाले, विक्रेते, केबिनधारक या सर्वांचे योग्य पुनर्वसन करावे, मगच अतिक्रमण विरोधी कारवाई राबवावी. सध्या ‘अतिक्रमणा’च्या नावाखाली जी फेरीवाल्यांना उद्ध्वस्त करण्याची कारवाई सुरू आहे ती त्वरित थांबवावी, अशी मागणी शिवसेनेच्यावतीने मंगळवारी फेरीवाल्यांच्या मोर्चाद्वारे केली.
शिवसेनेने फेरीवाल्यांच्या प्रश्नावर मंगळवारी महानगरपालिकेवर मोर्चा काढून निदर्शने करण्यात आली. सकाळी साडेअकरा वाजता शिवाजी पेठेतील उभा मारुती चौक येथून शिवसेनेने हा फेरीवाल्यांचा मोर्चा काढला.
मोर्चा निवृत्ती चौक, बिनखांबी गणेश मंदिर, महाद्वार रोड, पापाची तिकटीमार्गे महानगरपालिकेसमोर आला. त्यावेळी आमदार राजेश क्षीरसागरही मोर्चात सहभागी झाले. यावेळी महापालिकेसमोर जोरदार निदर्शने करण्यात आली.
महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त श्रीधर पाटणकर, इस्टेट विभाग प्रमुख प्रमोद बराले हे मोर्चाला सामोरे गेले. आमदार क्षीरसागर यांनी पाटणकर यांना निवेदन देऊन अतिक्रमणविरोधी कारवाई आधी थांबवा, अशी मागणी केली.
कोल्हापूरसह महाराष्ट्रातून आलेल्या विक्रेत्यांना, फेरीवाल्यांना आधी जागा द्या, नंतरच बिहार, उत्तर प्रदेश येथून आलेल्यांना जागा द्यावी, अशीही त्यांनी मागणी केली.
महानगरपालिका करत असलेल्या अतिक्रमण विरोधी कारवाईमुळे शहरातील अनेकांच्या रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला आहे.
उपासमारीची वेळ त्यांच्यावर येत आहे. सर्वाेच्च न्यायालयाच्या आदेशानुसार आधी राष्ट्रीय फेरीवाला धोरणाची अंमलबजावणी करणे आवश्यक असताना कायद्याचा बडगा दाखवत फेरीवाल्यांवर केलेला अन्याय अत्यंत जुलमी आहे.
हातावरचे पोट असलेल्या फेरीवाल्यांवरील कारवाई त्वरित थांबवावी, असे निवेदन मोर्चेकऱ्यांनी अतिरिक्त आयुक्तांना दिले.
ताराबाई रोड, महाद्वार रोड परिसरातील फेरीवाल्यांचे पुनर्वसन आहे त्याच जागी करण्यात यावे, अन्यथा सरस्वती चित्रमंदिरजवळील मोकळ्या जागेत संकुल उभे करून त्या ठिकाणी फेरीवाल्यांना जागा उपलब्ध करून द्यावी, असा पर्यायसुद्धा निवेदनात देण्यात आला आहे.
मोर्चाचे नेतृत्व आमदार क्षीरसागर यांच्यासह धनाजी दळवी, दीपक गौड, किशोर घाटगे, रमेश खाडे, तुकाराम साळोखे, सुनील जाधव, शामराव जाधव यांनी केले.