कोल्हापूर: भारनियमन बंद करा अन्यथा कोल्हापुरी हिसका दाखवू :चंद्रदीप नरके, सतेज पाटील यांचा दम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 11, 2018 04:25 PM2018-10-11T16:25:45+5:302018-10-11T16:30:27+5:30
ट्रान्सफॉर्मर जळाले तर जोडण्यासाठी बिले भरायला सांगा असे तुमचे कर्मचारी थेट आमदारांनाच सांगतात. तुमची बिले गोळा करायला काय आम्ही महावितरणचे नोकर नाही, अशा शब्दात आमदार चंद्रदीप नरके व आमदार सतेज पाटील यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना फैलावर घेतले.
कोल्हापूर: ट्रान्सफॉर्मर जळाले तर जोडण्यासाठी बिले भरायला सांगा असे तुमचे कर्मचारी थेट आमदारांनाच सांगतात. तुमची बिले गोळा करायला काय आम्ही महावितरणचे नोकर नाही, अशा शब्दात आमदार चंद्रदीप नरके व आमदार सतेज पाटील यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना फैलावर घेतले.
येत्या चार दिवसात शेतीपंपासाठी सुरु केलेले दोन तासांचे भारनियमन रद ्द नाही केले तर कार्यालयाला तर कुलूप ठोकणारच शिवाय उध्दट कर्मचाऱ्यांबरोबर अधिकाऱ्यांनाही कोल्हापुरी भाषेत हिसका दाखवू असा इशाराही दिला. एन.डी.पाटील यांच्या नेतृत्वाखाली महावितरणच्या दारात ठिय्या ठोकू असेही सुनावले.
शेतीपंपासाठी सध्या महावितरणकडून दोन तासाचे भारनियमन सुरु करण्यात आले आहे. त्यामुळे दिवसा ८ ऐवजी ६ तर रात्री १0 ऐवजी ८ तास वीज मिळत आहे. शिवाय ही वीज वारंवार खंडीत होत असल्याने पाण्याचे फेर पूर्ण होणे अवघड झाले आहे. १२ तास वीजेची मागणी असताना ती आता निम्म्यावर आल्याने शेतकरी अक्षरशा वैतागला आहे.
हा सर्व असंतोष इरिगेशन फेडरेशनने संघटीत करुन आमदार चंद्रदीप नरके व आमदार सतेज पाटील यांच्या ने तृत्वाखाली शेतकऱ्यांनी गुरुवारी दुपारी ताराबाई पार्कातील महावितरण कार्यालयावर धडक दिली. त्यांनी मुख्य अभियंता अनिल भोसले व अधिक्षक अभियंता शैलेंद्र राठोर यांच्यासमोर महावितरणच्या कारभाराविरोधात तक्रारीचे पाढेच वाचले.
इरिगेशन फेडरेशनचे विक्रांत पाटील यांनी विषयाला तोंड फोडत बिलांच्या वसूलीची जबाबदारी आमची आहे, का असा थेट सवाल अभियत्यांना विचारला. आमदार पाटील यांनी कोल्हापूरात वीज गळती नाही, थकबाकी नाही, वीज चोरीही नाही तरीदेखील येथे भारनियमन का असा सवाल करत कुठल्या फिडरवर किती वीज देताय ते माहितीच्या अधिकारातच मागवून घेतो असे सुनावले.
लाईनमन, वायरमन यांना मस्ती आली आहे. ते शेतकऱ्यांशी उध्दट वागतात, एकाचे बिल भरायचे चुकले तर लगेच जाउन सर्वांचे कनेक्शन तोडता. तुमचा एक कर्मचारी काम करत नाही म्हटल्यावर सगळ्यांचे पगार थांबवता का, वाहन नाही म्हणून स्वत:चे पगार कमी केले का असा सवालही आमदार पाटील यांनी केला . येथून पुढे आकडे टाकूनच वीज घ्यावी लागेल, काय भांडणे होतात ती होउ दे. महावितरण परिस्थिती सुधारत नसेल तर वीजेची बिलेच भरणे बंद करा असे आवाहनही आमदार पाटील यांनी केले.
आमदार नरके म्हणाले, पावसाने आधीच पिके उध्वस्त झाली आहेत. उरल्या सुरल्या पिकांना पाणी देउ म्हटले तर भारनियमनामुळे तेही शक्य नसल्याने शेतकऱ्यावर जीव देण्याची वेळ आली आहे. ट्रान्सफॉर्मर जळाले तरी व ायरमन तिकडे फिरकत नाहीत. स्वत: माझ्या पाणीपुरवठा संस्थेचा ट्रान्सफॉर्मर जळाला तर महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी बिल भरल्याशिवाय दुरुस्त करणार नसल्याचे सांगितले.
एप्रिल ते सप्टेबरची वीज बिलेच आलेले नाहीत तर बिल कुठले आणि कसे भरणार असे सांगत नरके यांनी आमदार असताना माझी ही परिस्थिती तर इतर शेतकऱ्यांची काय किंमत ठेवत असतील याचा विचार करा असे मुख्य अभियंत्याच्या निदर्शनास आणून दिले.
यावेळी करवीर पंचायत समिती सभापती राजेंद्र सुर्यवंशी, बाबासाहेब पाटील भूयेकर, चंद्रकांत पाटील, मारुती पाटील, शशिकांत खोत, प्रदीप झांबरे, आर.के.पाटील, सखाराम पाटील, आनंदराव नलवडे, रणजित जाधव यांच्यासह शेतीपंपधारक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
भारनियमन तात्पुरते, मुख्य कार्यालयाकडे भावना कळवू: अनिल भोसले
सध्या सुरु असलेले हे भारनियमन तात्पुरते व आपत्कालीन आहे. अचानक उष्णता वाढल्याने शेती व घरगुतीची मागणी वाढली आहे. तरीदेखील हे प्रमाण कमी करण्यासाठी मुख्य कार्यालयास कळवू. कर्मचाऱ्यांच्या उध्दट वर्तवणूकीसह वीज पुरवठ्याबाबत आलेल्या तक्रारीचे निवारण करण्यासाठी दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी प्रत्येक विभाग तक्रार निवारण बैठक घेण्यात येईल.
स्ट्रीटलाईट व वाढीव गावठाणचे वीज मागणीचे प्रस्ताव निधी मिळूनही गेल्या वर्षभरापासून महावितरणकडे पडून असल्याचे आमदार नरके यांनी निदर्शनास आणून दिले. डीपीडीसीमध्ये भांडून निधी आणायचा आणि तुम्ही त्याला मंजूरी देत नाही. स्वत: उर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी थकबाकीचा संबंध नसल्याचे सांगितले आहे, तरीही तुम्ही ऐकत नाही, अशा शब्दात अधिक्षक अभियंता राठोड यांना आमदार नरके यांनी धारेवर धरत चार दिवसात मंजूरी नाही मिळाली नाही तर गप्प बसणार नाही असे सुनावले.