कोल्हापूर : प्लास्टिकपासून होणारे प्रदूषण रोखा, एकटी संस्थेचे प्रदूषण नियंत्रण मंडळास निवेदन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2018 05:53 PM2018-02-28T17:53:40+5:302018-02-28T17:53:40+5:30
कोल्हापूर शहरात खूप मोठ्या प्रमाणात प्लास्टिकमुळे कचऱ्यांची समस्या निर्माण होत आहे. डंपिग ग्राउंडवर सध्या जात असलेल्या कचऱ्यांचे वर्गीकरण केले जात नसून त्यामुळे डंपिग ग्राउंडवर कचऱ्यांचे ढीग झाले आहेत. हा कचरा प्लास्टिकसह जाळला जात असल्याने मोठ्या प्रमाणात वायूप्रदूषण होत आहे.
कोल्हापूर : शहरात खूप मोठ्या प्रमाणात प्लास्टिकमुळे कचऱ्यांची समस्या निर्माण होत आहे. डंपिग ग्राउंडवर सध्या जात असलेल्या कचऱ्यांचे वर्गीकरण केले जात नसून त्यामुळे डंपिग ग्राउंडवर कचऱ्यांचे ढीग झाले आहेत. हा कचरा प्लास्टिकसह जाळला जात असल्याने मोठ्या प्रमाणात वायूप्रदूषण होत आहे. कचऱ्यांचे वर्गीकरण आवश्यक आहे. त्याबाबत संबंधित शासकीय विभागांना सूचना देऊन त्यानुसार अंमलबजावणी करावी, अशी मागणी एकटी संस्थेच्यावतीने निवेदनाद्वारे प्रदूषण नियंत्रण महामंडळाचे प्रभारी उपप्रादेशिक अधिकारी रा. सा. कामत यांना दिले.
निवेदनात म्हटले आहे की, कोल्हापूर महापालिका व एकटी संस्थेच्या समन्वयाने गेल्या सात महिन्यांपासून शहरातील कमर्शियल आस्थापनांमधील कचरा विलगीकरणाचे काम सातत्यपूर्ण सुरू आहे. प्रभागातील काम करताना सुक्या कचऱ्यांमध्ये ७५ टक्के प्रमाण हे निरूपयोगी प्लास्टिकचे असून या प्लास्टिकचा पुर्नवापर होत नाही, त्यामुळे प्रदूषणाचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे.
दि. ८ एप्रिल २०१६ च्या घनकचरा व्यवस्थापन कायद्यातील तरतुदीनुसार ओला व सुका कचरा तसेच इतर घटकांचे विलगीकरण करून शास्त्रीय पद्धतीने वर्गीकरण आवश्यक आहे; परंतु शहरात तसे होत नसल्याने डंपिंग ग्राउंडवर कचऱ्यांचे ढीग बनत आहेत. त्यातून मोठ्या प्रमाणात प्रदूषण होत आहे.
यावेळी संस्थेच्या अध्यक्षा अनुराधा भोसले, मीरा माने, पुष्पा सुतार, अनुसया शिंदे, पार्वती कांबळे, शालाबाई शिंदे, सारिका भोरे, सोनाबाई शिंदे, जैनुद्दीन पन्हाळकर, सविता कांबळे, वनिता कांबळे, राहुल संकपाळ, मनिषा कुरणे, मनिषा पोटे आदी उपस्थित होते.